IPO
IPOSakal

आयपीओं’च्या पावसात भिजताना...

Published on

यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये आजपर्यंत २८ ‘आयपीओ’ (प्राथमिक समभाग विक्री) आले आणि त्यातील ८५ टक्के ‘आयपीओं’मधील शेअर नोंदणीनंतर आजही उत्तम भाव दाखवत आहेत. बहुचर्चित ‘झोमॅटो’च्या ‘आयपीओ’नंतर त्याची शेअरनोंदणी ५२ टक्क्यांहून अधिक भावाने झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण ‘आयपीओं’च्या या मुसळधार पावसात भिजताना काय काळजी घेतली पाहिजे, ते यानिमित्ताने पाहूया.

कोरोनाच्या महासाथीमुळे मार्च २०२० मध्ये जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी उलथापालथ झाली. बाजार बराच कोसळला, मंदीत गेला, मग आता पुढे काय, याचा विचार करत असतानाच जूनच्या तिमाहीचे निकाल बरेच आशादायी आले. कोरोना महासाथीच्या संकटात देखील कंपन्या चांगले काम करतात, हे समजले आणि ‘सेन्सेक्स’ने गती पकडली. मागील एका वर्षात ‘सेन्सेक्स’ ४० टक्क्यांनी वाढला आहे आणि त्यामुळे सध्या शेअर बाजार चांगलाच तेजीत आहे.

शेअर बाजारातील तेजी साहजिकच प्राथमिक बाजारासाठी दरवाजे अधिक खुले करते आणि त्याचाच परिणाम म्हणून मागील वर्षात एका पाठोपाठ आयपीओ येत गेले. यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ चा विचार करायचा झाला, तर आजपर्यंत २८ ‘आयपीओं’ची (प्राथमिक समभाग विक्री) बाजारात नोंदणी झाली आणि त्यातील ८५ टक्के ‘आयपीओं’मधील शेअर नोंदणीनंतर आजही उत्तम भाव दाखवत आहेत. नुकत्याच २८ व्या बहुचर्चित ‘झोमॅटो’च्या ‘आयपीओ’नंतरची शेअरनोंदणी ५२ टक्क्यांहून अधिक भावाने झाली आणि ‘आयपीओं’च्या बाजारपेठेला पुन्हा नवचैतन्य प्राप्त झालेले दिसते.

‘आयपीओं’च्या यशस्वीतेमुळे गुंतवणूकदार सध्या भलतेच खूष आहेत. कारण अवघ्या १५ दिवसांत त्यांच्या गुंतवणुकीवर ३०-४० टक्क्यांहून अधिक परतावा मिळताना दिसत आहे. शेअर बाजाराकडे नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ही उत्तमच घटना आहे. पण सावधान... हीच ती वेळ आहे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी “step back and think” करण्याची! त्यामुळे आता what to think हेच समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सर्वसाधारणपणे बघितले तर असे दिसते, की जेव्हा बाजारात तेजी असते, तेव्हाच कंपन्या ‘आयपीओं’ची घाई करताना दिसतात. कारण तेजीच्या लाटेत पितळेही सोन्याच्या भावात विकले जाऊ शकते. अजून एक बाब म्हणजे ‘फोमो’ (फिअर ऑफ मिसिंग आउट) म्हणजे आधीचे ‘आयपीओ’ खूप वर जातात आणि ज्या गुंतवणूकदारांनी त्याला नोंदणी केलेली नसते, ते संधी जाऊ नये म्हणून येणाऱ्या ‘आयपीओं’ना काही न बघता अर्ज करायला लागतात, केवळ त्यासाठी डी-मॅट खाती काढतात. पण २००८ चा ‘रिलायन्स पॉवर’चा पब्लिक इश्यू आठवा! तो याचाच निदर्शक! तेजी अगदी वरच्या स्तरावर असताना आलेला हा ‘आयपीओ’... पण त्याच्या शेअरची नोंदणी होईपर्यंत बाजार कोसळला आणि ‘रिलायन्स पॉवर’चा शेअरही! यामागे प्रामुख्याने कारण होते ते म्हणजे कंपनीची आर्थिक दुर्बलता.

त्यामुळे कोणत्याही ‘आयपीओ’ला अर्ज करण्यासाठी काही प्राथमिक बाबी तपासूनच घेतल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे...

१) ‘आयपीओ’ आणत असलेल्या कंपनीचे आधीच बाजारात असणाऱ्या कंपन्यांपेक्षा काही वेगळेपण आहे का? उदा. सीडीएसएल, एमसीएक्स, कॅम्स यांचे एक व्यवसाय म्हणून वेगळेपण आहे.

२) बाहेरून पैसे गोळा करण्यात कंपनीचा अंतस्थ हेतू काय आहे?

३) या भांडवलावर अधिक परतावा मिळवून देण्याची प्रवर्तकांची क्षमता आहे का?

४) मागील ३-५ वर्षे कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?

५) शेअरला अर्ज केल्यापासून नोंदणीपर्यंत बाजार खूप पडला आणि शेअर खालच्या भावाला नोंदला गेला तर पुढील काही वर्षे तो शेअर आपण बाळवावा, अशी त्याची स्थिती आहे का?

६) आपण ‘आयपीओ’ला अर्ज केला आणि कित्येक पट त्याला मागणी आली, तर नक्की आपल्याला किती शेअर मिळतील अथवा नाही आणि मिळाले तरी किती कमी मिळतील, या सर्वांचा एकूण आपल्या पोर्टफोलिओच्या परताव्यावर असा किती परिणाम होईल, याचा विचार आधीच करून ठेवावा. त्यामुळे जर शेअर मिळाले नाहीत तरी मनात चुटपुट राहणार नाही.

या सर्व बाबींचा शांतपणे विचार केला तर एकूण आपला निर्णय चुकण्याची शक्यता बरीच कमी होऊन आपल्याला फक्त प्राथमिक (प्रायमरी) बाजारावर अवलंबून न राहता दुय्यम (सेकंडरी) बाजारात मिळत असलेल्या संधींचा लाभ देखील करून घेता येऊ शकेल. त्यामुळे ‘आयपीओं’च्या बाजारपेठेत जरी जोरदार पाऊस पडत असला तरी आपण आपली छत्री आणि रेनकोट जवळ बाळगूनच पावसाची मजा घेणे अधिक उत्तम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...