Sumit Antil : लहानपणी वडील गेले, मोठेपणी पाय गेला; पण, एका पायावर तो जिद्दीने उभा राहिला अन् 'Golden Boy' बनला!

Paralympic 2024 Sumit Antil Inspirational Journey सुमित अंतिलने ३ वर्षांपूर्वी टोकियोत नोंदवलेला स्वतःचाच विक्रम मोडला आणि सुवर्ण ही कायम राखले. नीरजची डबल सुवर्ण संधी हुकल्याचे दुःख सुमितने अद्भूत कामगिरी करून विसरायला लावली.
Sumit Antil Motivational Journey
Sumit Antil Motivational Journeyesakal
Updated on

पॅरिसमध्ये काल भारताच्या सुमित अंतिलने ऐतिहासिक कामगिरी केली. एक पाय कृत्रिम असूनही अंतिलने भारताला सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले, परंतु हे यश त्याने सहज मिळवलेले नाही. १६ व्या वर्षी पाय गमावल्यावर तो कसा उभा राहिला, हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे...

ऑस्कर पिस्टोरिअस हे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असेलही, नसेलही. जग 'ब्लेड रनर' म्हणून त्याला ओळखतं. जन्मतः दोन्ही पायांच्या गुडघ्याखालील भाग नसलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूने पॅरालिम्पिक स्पर्धेतील एक काळ गाजवला. तब्बल ८ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी पदकं या 'धावपटू'ने आपल्या नावावर केली आहेत. दोन्ही पाय नसूनही केवळ धातूंच्या पायावर उभं राहणं, नुसतं उभं राहणं नव्हे तर वाऱ्याची स्पर्धा करणं ही साधीसोपी गोष्ट नक्कीच नाही. ऑस्करला आठवण्याचं कारण की, असाच एक आपला खेळाडू 'ब्लेड'च्या टेकूवर पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवतोय.

पॅरिसच्या Athalets स्टेडियमवर सुमित अंतिलने पुन्हा एकदा अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. एका कृत्रिम पायावर आपलं शरीर बॅलन्स करून काही मीटर धावणे आणि त्यानंतर खांद्यापासून हाताची सर्व ताकद पणाला लावून भाला फेकणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. सुमितने ती स्वतः साठी सोपी करून घेतली आहे. सुमित जेव्हा त्याच्या टोकियोतील सुवर्णपदकाचा बचाव करण्यासाठी ट्रॅकवर आला तेव्हा तमाम भारतीयांना नीरज चोप्राची नक्की आठवण झाली असेल.

भाईसाब वर्ल्ड रेकॉर्ड कितना है?... साधारण वीसेक वर्षांचा समित जेव्हा पहिल्यांदा प्रशिक्षक वीरेंदर धनकर यांना भेटला, तेव्हा त्याचा पहिला प्रश्न हा होता. जिल्हास्तरीय, राज्य किंवा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी त्याला त्या स्पर्धेतील रेकॉर्ड्सची माहिती मिळवायची होती आणि आज २६ वर्षांच्या समितच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड, पॅरालिम्पिक रेकॉर्ड्स आहेत. त्याने स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड एक नव्हे तर चार वेळा मोडला आणि काल पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक रेकॉर्ड्ससह सुवर्णपदक जिंकले... भारतात भालाफेकीत नीरज चोप्रा याच्यानंतर कोणाचे नाव असेल तर ते सुमित अंतिल याचेच... अंतिलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक पॅरिसमध्ये कायम राखून इतिहास रचला...

टोकियोनंतर नीरज पॅरिसमध्ये ही सुवर्ण नक्की जिंकेल असेच आपल्याला वाटत होते. पण, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९० मीटरच्या पार भाला फेकला अन् नीरजसह आपल्याही स्वप्नांचा चुराडा झाला. त्यामुळे काल मध्यरात्री जेव्हा सुमित भालाफेक करायला आला तेव्हा आधीच जल्लोषाचा पवित्रा घेणे अनेकांनी टाळले. पण सुमितने मैदान मारले.. दुसऱ्याच प्रयत्नात त्याने ७०.९० मीटर भाला फेकला आणि पॅरालिम्पिक विक्रमाची नोंद झाली. सुमितने ३ वर्षांपूर्वी टोकियोत नोंदवलेला स्वतःचाच विक्रम मोडला आणि सुवर्ण ही कायम राखले. नीरजची डबल सुवर्ण संधी हुकल्याचे दुःख सुमितने अद्भूत कामगिरी करून विसरायला लावले.

नीरजच्या खांद्याला खांदा लावून ऑलिम्पिक स्पर्धा गाजवायचीय...
पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत सलग दोन सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. २६ वर्षीय सुमितने २०२० मध्ये सलग तीन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड मोडून सुवर्णपदक जिंकले होते आणि काल पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक रेकॉर्ड मोडून 'गोल्ड' नावावर केले. आता त्याचे लक्ष्य २०२८ च्या लॉस एजिलीस ऑलिम्पिक आहे.. नीरज चोप्रासोबत त्याला खांद्याला खांदा लावून भारतासाठी भालाफेकीत पदक जिंकायचे आहे. तो २०२८ साठी पात्र ठरल्यास पॅरालिम्पिक आणि ऑलिम्पिक खेळणारा तो पहिला भारतीय ठरेल.

पॅरालिम्पिकमध्ये २ सुवर्णपदक जिंकणारे भारतीय खेळाडू...

  • देवेंद्र झाझरिया ( पुरुषांचा F46 भालाफेक) - २००४, २०१६

  • अवनी लेखरा ( महिला १० मी एअर स्टँडिंग SH1 ) - २०२०, २०२४

  • सुमित अंतिल ( पुरुषांचा F64 भालाफेक) - २०२०, २०२४

सुमितचा संघर्षपूर्ण प्रवास

हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यातील खेवरा येथील सुमितचा जन्म. त्याचे वडील राम कुमार अंतिल हे भारतीय वायू दलात होते. पण, वयाच्या ७व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्याचे दुःख सुमितला सहन करावे लागले. त्यातून कुठे सावरतोय तेच ५ जानेवारी २०१५ मध्ये त्याचा जीव थोडक्यात वाचला. १६ वर्षांचा असताना बाईकवरून फेरफटका मारताना त्याचा गंभीर अपघात झाला. मोटारसायकल वेगाने येणाऱ्या ट्रकवर आदळली आणि आता काय वाचत नाही, असे त्याला क्षणात वाटले होते.

पण जीवावर आलेले पायावर बेतलं.. डाव्या पायाच्या गुडघ्याखालच्या भागाला अपंगत्व आले. त्याला तातडीने इंडियन एअर फोर्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याचं limb आता काही कामाचे नाही असे डॉक्टरांनी ओळखले आणि तो भाग काढून टाकला. आता पुढील आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न सुमितसमोर होताच. पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला पुण्यातील आर्टिफिशियल limb सेंटरमध्ये आणले गेले. तिथे त्याला कृत्रिम पाय लावला गेला..

२०१७ मध्ये त्याला पॅरा खेळाडू बनण्याचा सल्ला मिळाला आणि त्याने नवी दिल्लीत नितीन जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली भालाफेकीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये त्याने भालाफेकीचे गुरू नवल सिंग यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. २०१९ पासून त्याने भालाफेकीच्या स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरूवात केली. २०१९ मध्ये World Para Athletics Grand Prix मध्ये त्याने F64 गटात वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आणि मिश्र स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. त्याचवर्षी दुबईत पार पडलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा वर्ल्ड रेकॉर्डसह रौप्यपदक जिंकले.

samit antil Motivational Journey
samit antil Motivational Journeyesakal

पुरस्कार

  • २०२१ - खेलरत्न पुरस्कार

  • २०२२- पद्म श्री पुरस्कार

  • २०२४ - स्पोर्टस्टार Aces पुरस्कार

  • २०२४ - फोर्ब्सच्या ३० वर्षांखालील भारतीयांमध्ये स्थान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.