Credit Card Use: अमेरिकी ‘मॅड’गिरीचे अनुकरण नको

क्रेडिट कार्ड आहे, म्हणून खरेदी करत सुटायचं ही अमेरिकी मॅडगिरी आपल्याकडेपण बोकाळत आहे. मात्र लगेच नाही तरी नंतर आपल्याला हे पैसे भरायचे आहेत, हे लक्षात घेऊन खरेदी केलेली बरी.
Credit Card shopping
Credit Card shoppingE sakal
Updated on

कौस्तुभ केळकर

सणासुदीच्या काळात सर्वांच्या आवडीचे एक काम असते, ते म्हणजे खरेदी. कपडे, दागिने, वाहने, विविध वस्तू यासह पर्यटन करण्यासही अनेकांची पसंती असते.

त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना खरेदीसाठी उद्युक्त करण्याच्या उद्देशाने अनेक आकर्षक सवलतींचा वर्षाव केला जातो. यामध्ये मासिक हप्त्यावर खरेदीची सुविधा, क्रेडिट कार्ड वापरल्यास मोठी सवलत, बिनव्याजी कर्जाची सुविधा, आकर्षक बक्षीसे अशा अनेक लाभांचा समावेश असतो.

त्यामुळे भारतीय ग्राहकही आता क्रेडिट कार्डचा बेसुमार वापर करत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील ‘मॅड’गिरी आपल्याकडेही बोकाळायला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. याचा वापर करण्याबाबत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

श्रीगणेशाच्या आगमनानंतर पुढील काळात सणासुदीचे उत्साहाचे दिवस येतात. हे उत्सवी वातावरण दिवाळी आणि त्यापुढेसुद्धा टिकते. या काळात लोकांच्या हातामध्ये बोनसची रक्कम येते. अनेक ऑनलाइन सेल, ऑफलाइन ऑफर सुरू असतात.

विविध कंपन्यांच्या वस्तू, सेवा यांच्या जाहिरातींचा विविध माध्यमांतून भडिमार होत असतो. या सर्वांतून मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी होते.

पर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध असतात, याचा लाभ घेऊन अनेकजण देशात; तसेच देशाबाहेर सहलींना जातात. एक अंदाजानुसार, या सणासुदीच्या काळात विविध वस्तू, वाहने आदी यांची एकूण वर्षातील सुमारे ४० टक्के विक्री होते.

याचे महत्त्व जाणून विविध कंपन्या ग्राहकांना आकर्षित करून आपली विक्री वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात.

या मंगलपर्वाच्या काळात होणारी बाजारपेठातील उलाढाल, खरेदी, पर्यटन यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते.

वस्तूंची खरेदी; तसेच सेवांचा लाभ घेण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम विविध पर्यायातून देता येते. उदा. रोखीने, डेबिट कार्ड, ‘यूपीआय’, सुलभ हप्ते (ईएमआय) पद्धतीने, क्रेडिट कार्डद्वारे आदी. सर्वत्र खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत असतो. ग्राहकांचा उत्साह आणि

खरेदीचे ठळक उदाहरण म्हणजे पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील या काळात होणारी गर्दी. ई-कॉमर्स कंपन्या या काळात वस्तू ग्राहकांना वेळेत घरपोच करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमतात.

सप्टेंबरमधील गणेशोत्सवाचे दहा दिवस, ऑक्टोबर महिन्यात येणारा दसरा, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असलेली दिवाळी पाहता, अनेक कंपन्या त्यांची विविध उत्पादने बाजारपेठेत सादर करून ग्राहकांना खरेदीसाठी उद्युक्त करतील, यात शंका नाही.

एक अहवालानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांनी या सणासुदीच्या काळात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ३५ टक्के जास्त विक्री होईल, असा अंदाज बांधला आहे .

क्रेडिट कार्डवरील खरेदी करा सावधपणे !

या एकंदर आनंदी वातावरणामध्ये खिशामध्ये बोनस, बक्षीस याद्वारे जादा रक्कम आलेली असते. विविध वस्तूंच्या जाहिरातीच्या भडिमारातून खरेदीचे विचार डोक्यामध्ये घोळू लागतात. उदा. फ्रीझ उत्तम सुरू असला, तरी तो जुना झाला आहे.

नवी मॉडेल्स बाजारात आलेली आहेत. जुन्या फ्रीझसाठी चांगली किंमत देत आहेत, तर नवा डबल डोअर फ्रीझ घेऊ या. असा विचारविमर्श होऊन नवा फ्रीझ घेतला जातो. मोबाईल फोन जुना झाला आहे, आता आयफोन घेऊ या, असा निर्णय घेतला जातो.

खरेदीला उद्युक्त करणारी अशी हजार कारणे मिळतील. त्यातही आता या खरेदीसाठी संपूर्ण रक्कम नसली, तरी क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करू; पण ऑफर गमवायची नाही, अशी चर्चा घरोघरी रंगलेली दिसते आणि क्रेडिट कार्डवर किंवा कर्ज घेऊन ‘ईएमआय’ने पैसे फेडू अशा नियोजनाने नवी वस्तू घरी येते.

‘मॅड’गिरीचे अनुकरण आणि व्यसन टाळावे

क्रेडिट कार्ड ही फार मोठी सोय आहे.परंतु, त्याचा योग्य आणि आवश्यक तेव्हाच वापर करणे महत्त्वाचे असते. क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास काही काळ उदा. ४५ ते ५२ दिवसांपर्यंत पैसे द्यावे लागत नाहीत.

परंतु, हा कालावधी पूर्ण झाल्यावर म्हणजे कार्डाची बिलिंग सायकल पूर्ण झाल्यावर ग्राहकाला कार्डवरील खरेदीचा तपशील देणारे स्टेटमेंट येते आणि ठराविक दिवसात रक्कम द्यावी लागते.

यामध्ये दोन पद्धतीने प्रकारे रक्कम देता येतात. एक म्हणजे ‘टोटल अमाउंट ड्यू’ म्हणजे पूर्ण देय रक्कम देणे किंवा ‘मिनिमम अमाउंट ड्यू’ म्हणजे किमान रक्कम देणे.

एखाद्या व्यक्तीने पूर्ण देय रक्कम अंतिम देय तारखेच्या आत देऊन टाकली, तर कोणताही दंड, व्याज, कर, जीएसटी द्यावा लागत नाही.

परंतु, एखाद्या व्यक्तीने केवळ ‘मिनिमम अमाऊंट ड्यू’ म्हणजे किमान रक्कम दिली, तर उर्वरित रक्कम; तसेच पुढील खरेदी रकमेवर व्याज, कर, जीएसटी द्यावे लागते आणि महत्त्वाचे म्हणजे हे व्याज ३ ते ३.५ टक्के महिना इतके भरमसाठ असते.

अमेरिकी नागरिक खरेदीसाठी रोख रक्कम क्वचितच वापरतात. बहुतांश वेळा प्लॅस्टिक मनी म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर केला जातो.

दुर्दैवाने हे लोण आपल्या देशातही येऊ पाहात आहे. आजच्या काळात आपल्या देशातील क्रेडिट कार्डवरील एकंदर देय रक्कम सुमारे दोन लाख कोटी रुपये इतकी प्रचंड आहे आणि रिझर्व्ह बँकेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे क्रेडिट कार्डवरील देय रक्कम हे असुरक्षित कर्ज असते. रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका, वित्तीय संस्था, बिगरबँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) सतर्क राहण्यास सांगितले असून, यांची वसुली आणि कालावधी मर्यादेत आहे, याची खात्री बाळगण्यास सांगितले आहे.

थोडक्यात, क्रेडिट कार्डवर मिळणारे क्रेडिट (एक मर्यादेपर्यंत खर्च करण्याची मुभा) हे प्रकारचे कर्ज असते आणि ते संपूर्णपणे वेळेअगोदर देणे योग्य ठरते. केवळ मिनिमम अमाउंट ड्यू देऊन क्रेडिट कार्ड वापरले, (‘मॅड’गिरी सुरू ठेवली) एखादी व्यक्ती खरेदी करत राहिली, तर देय रकमेचा आकडा एवढा प्रचंड वाढत जातो, की रक्कम देणे दुरापास्त होते.

क्रेडिट कार्डवरील किमान देय रक्कम दिल्यास काय होते, किती आणि कसा भुर्दंड पडतो, हे जाणून घेऊ या.

महत्त्वाचे मुद्दे

१) क्रेडिट कार्डची बिलिंग सायकल पाच ते पाच तारीख आहे. किमान देय रक्कम (मिनिमम अमाउंट ड्यू) ही पूर्ण देय रकमेच्या (टोटल अमाउंट ड्यू) पाच टक्के असते.

२) कार्डवरील खर्चाचे स्टेटमेंट दर महिन्याच्या पाच तारखेला जारी केले जाते आणि त्याचे पेमेंट त्याच महिन्यातील २६ तारखेपर्यंत करावे लागते.

३) केवळ ‘मिनिमम अमाउंट ड्यू’चे पेमेंट केले, तर उर्वरित रकमेवर दरमहा तीन टक्के व्याज पडते.

४) पेमेंटमध्ये दिरंगाई झाल्यास १५०० रुपये दंड (लेट फी) आकारली जाते.

५) ‘जीएसटी’ १८ टक्के आहे.

महत्त्वाच्या बाबी

१) क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट आल्यावर पूर्ण देय रकमेचे २६ तारखेच्या आत पेमेंट केले, तर कोणताही दंड ( लेट फी), व्याज, जीएसटी द्यावे लागत नाही. थोडक्यात, कोणताही जादा भुर्दंड पडत नाही. पूर्ण देय रकमेचे निर्धारित तारखेआधी पेमेंट करणे चांगले ठरते.

२) वरील उदाहरणे माहितीसाठी दिली आहेत. क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेनुसार यातील बिलिंग सायकल, पेमेंट स्टेटमेंट जारी करण्याची तारीख, दंड, व्याजदर यात बदल होऊ शकतो.

तात्पर्य : हे सर्व पाहता कोणी म्हणेल, की मौजमजा, खरेदी करायची नाही का? असे बिलकूल नाही ! खरेदी जरूर करावी आणि सणासुदीच्या काळात आपला आनंद द्विगुणित करावा.

परंतु, खर्चाचे भान राखूनच. नाहीतर खर्च हाताबाहेर जातो आणि मग आर्थिक गणित कोलमडू शकते. वरील सर्व मुद्दे पाहाता ‘अंथरूण पाहून हातपाय पसरावेत’ ही म्हण अगदी समर्पक ठरेल.

(लेखक आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.