Driving in Rain:पावसाळ्यात ‘लाँग ड्राइव्ह’ला जाताना...

पावसाळ्यात सावधगिरी बाळगून वाहन चालविणे आवश्यक आहे. त्यात किती आधुनिक तंत्रज्ञान असले तरी ते शेवटी तंत्रज्ञान असून, त्यात बिघाड होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित प्रवास सर्वांसाठी आवश्यक आहे. पावसाळ्यात सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय केले पाहिजे, हे आपण जाणून घेऊ या
वाहन चालवताना काळजी घ्यायलाच हवी
वाहन चालवताना काळजी घ्यायलाच हवीE sakal
Updated on

ओंकार भिडे

पावसाळ्यात आपल्या वाहनाने ‘लाँग ड्राइव्ह’ला जाण्याची इच्छा नक्कीच होईल. पण, मित्र-मैत्रीण वा कुटुंबाबरोबर हा आनंद घेताना त्यात खंड न पडू देण्याची जबाबदारी आपली आहे. रस्त्यावरील परिस्थितीत ऐनवेळी काय होईल, हे सांगता येत नाही. पण, आपल्याकडून दक्षता घ्यायला हवी. त्यासाठी काय करायला हवे ते पाहू या...

पावसाळ्यात पुलावरून वाहणारे पाणी वा पाण्याच्या डोहात बुडालेला रस्ता असल्यास त्यातून गाडी नेण्याचे धाडस करावेसे वाटू शकते. पण, हे धाडस करू नये. यामुळे आपण स्वतःचा व सहप्रवाशांचा जीव धोक्यात टाकतो.

अनेकदा पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुचाकी वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तुलनेने चारचाकीत आपण सुरक्षित असतो. पाण्यात गाडी घालू, असा विचार करणे चुकीचे आहे. इंजिनाला पाणी लागल्यास इंजिन बंद पडू शकते, तसेच पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास वा अन्य कारणामुळे गाडी अडकल्यास सर्वांचेच जीव धोक्यात जातात.

त्यामुळे पाणी रस्त्यावर अधिक प्रमाणात साचले असल्यास त्यात गाडी नेऊ नये. पुढील गाडी गेली... मग आपलीही जाईल, असा विचार करून गाडी घालणेही योग्य नाही.

काय तपासावे?

  • पावसाळ्यात दुचाकीचे टायर प्राधान्याने तपासावे. त्यावरील ‘ग्रिप’ कमी झाली नाही ना, याची खात्री करणे आवश्यक आहे. कारण ग्रिप योग्य नसल्यास गाडी घसरण्याची शक्यता वाढते.

  • पावसाळ्यात टायरमधील हवेचा दाब तपासण्याकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्येक वाहनासाठी हवेचा दाब वेगळा असतो. त्यामुळे आपल्या वाहनासाठी हवेचा दाब किती आवश्यक आहे, हे जाणून घ्यावे, तसेच तेवढाच दाब टायरमध्ये आहे ना, याची तपासणी हवा भरताना स्वतः करावी.

  • प्रत्येक वाहन कंपन्यांकडून विशिष्ट मॉडेलच्या गाडीसाठी टायरमध्ये हवेचा दाब किती हवा, याचा उल्लेख करणारा स्टिकर वाहनावर लावलेला असतो, तसेच मॅन्युअलमध्येही दिलेले असते. त्यामुळे ते जाणून घेऊन त्यानुसारच हवेचा दाब टायरमध्ये ठेवावा.

  • वाहनास डिस्क ब्रेक्स असल्यास ब्रेक ऑइल लेव्हल तपासावी. यावरच ब्रेकची क्षमता अवलंबून असते, तसेच दुचाकी असल्यास पुढील आणि मागील ब्रेक व्यवस्थित लागतो ना, हे तपासावे. परिणामकारक ब्रेकसाठी दुचाकीचा पुढील व मागील ब्रेक एकाचवेळी लावणे आवश्यक असते. यामुळे वाहनावर नियंत्रण मिळविता येण्यास अधिक मदत होते.

  • नव्या दुचाकींना व चारचाकींना ऑटो हेडलॅम्पची सुविधा आहे. पण, जुन्या वाहनांना अशी सुविधा नाही. पावसात हेडलॅम्प लावण्यामुळे आपले वाहन दुसऱ्यांना दिसण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रवासाला जाण्यापूर्वी दिवे व्यवस्थित लागत आहेत ना, हे तपासावे तसेच पावसात फॉगलॅम्प वा हेडलॅम्प सुरू ठेवावेत.

  • पावसाळ्यात स्पार्कप्लगला पाणी लागल्याने वा आर्द्रतेमुळे वाहन सुरू होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळेच गाडी पुसण्याच्या कापडाव्यतिरिक्त आपल्याकडे आणखी एक कापड ठेवावे व ते भिजणार नाही, याची काळजी घ्यावी.

    याचा उपयोग स्पार्कप्लग कोरडा करण्यास होतो, तसेच टूल किटही बरोबर असावे.

  • मोटरसायकलना इंजिनच्या पुढील बाजूस लावण्यात येणारे प्लास्टिक कोटेड करोगेट बॉक्सचे आयताकृती कव्हर लावू नये. यामुळे इंजिनावर परिणाम होतो.

  • पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज पटकन येत नाही. त्यामुळेच वायपर रबर ब्लेड, वायपरचा स्पीड व्यवस्थित सुरू आहेत ना, याची खातरजमा ड्रायव्हिंग करण्यापूर्वी करावी.

  • पावसाळ्यात टॉप गिअरवर वाहन चालविण्याऐवजी एक गिअर कमी करून वाहन चालवावे. यामुळे टायरची रस्त्यावरील ग्रिप कमी होणार नाही आणि वेगही नियंत्रणात राहू शकतो.

हायड्रोप्लेनिंग म्हणजे काय?

कारही पाण्यामुळे घसरते आणि पावसाळ्यात असे प्रकार घडण्याची शक्यता बळावते. त्यामुळेच असे होऊ नये यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

पावसात वेगाने कार चालविणे धोकादायक असते. पावसामुळे साचलेल्या वा वाहत असलेल्या पाण्यामुळे चारचाकी घसरते.

रस्ता व टायर यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास रस्त्यावरील टायरची ग्रिप कमी होते आणि वाहन घसरते. हायड्रोप्लेनिंगमध्ये पुढील टायर खाली मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने टायरची रस्त्यावरील पकड कमी होते आणि ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटतो.

यालाच हायड्रोप्लेनिंग म्हणतात.

पावसाळ्यात कार चालविताना रस्त्यावर टायरची ग्रिप कमी होत असते. पावसात रस्त्यावर सांडलेले ऑइल आणि वाळलेले घटत पाण्याच्या प्रवाहात मिसळतात आणि यामुळे रस्त्यावर एक थर तयार होतो.

त्यामुळे रस्ता निसरडा होतो आणि अशा वेळेस वेगाने वाहन गेल्यास वाहन नियंत्रणाच्या बाहेर जाते. त्यामुळेच पावसात गाडी उलटी होते. त्यामुळेच असे होऊ नये यासाठी गाडीचा वेग नियंत्रितच ठेवणे आवश्यक आहे.

हे तपासा अन् करा!

  • हायड्रोप्लेनिंग होत असल्याचे जाणवल्यास स्टिअरिंग सरळच ठेवावे. कारण स्टिअरिंग वळविल्यास कार उलटण्याचा धोका वाढतो.

  • स्टिअरिंग सरळ ठेवल्याने मागील चाकांच्या तुलनेत पुढील चाकांची पकड परत मिळविता येऊ शकते.

  • साचलेल्या पाण्यातून ड्रायव्हिंग करणे टाळावे. कारण त्यामुळे हायड्रोप्लेनिंगची शक्यता वाढते. त्यामुळेच पाऊस पडायला लागल्यावर तयार होणाऱ्या डबक्यांपासून सावधान राहावे.

  • हायवेवर क्रूझ कंट्रोलचा वापर केला जातो. पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना क्रूझ कंट्रोल वापरू नये. यामुळे आपल्याला रत्यावरील ग्रिपचा अंदाज लावता येतो, तसेच वेग कमी करण्याची गरज आहे, हे कळते.

  • उतारावर वा नागमोडी वळणावर टॉप गिअरवर गाडी ठेवल्यास हायड्रोप्लेनिंगचा धोका कमी होतो.

  • त्यामुळे पावसाळ्यात नेहमीच एक गिअर कमी ठेवावा. पावसात शार्प टर्न घेऊ नयेत. यामुळे वाहन उलटू शकते.

  • कारला अँटी ब्रेकिंग सिस्टीम व ईबीडी नसल्यास हळू हळू ब्रेकचा वापर करावा. करकचून ब्रेक लावल्यास वाहनाची चाके एकदम लॉक होतात आणि वाहन घसरू शकते. त्यामुळे एकदम वेग वाढविणे आणि एकदम ब्रेक दाबणे टाळावे.

  • लक्झरी तसेच काही सेदान कार, एसयूव्हीमध्ये क्रूझ कंट्रोल दिले आहेत. क्रूझ कंट्रोलमध्ये कार एका विशिष्ट स्पीडला सेट केल्यावर तो स्पीड कायम राहतो. यामुळे ड्रायव्हरला अॅक्सिलेटरवर पाय देण्याची गरज नसते.

  • हायवेवर शहरातील रस्त्यांप्रमाणे ट्रॅफिक नसते. त्यामुळे हायवेवर क्रूझ कंट्रोलचा वापर केला जातो.

  • पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना क्रूझ कंट्रोल बंदच करावे. यामुळे आपल्याला रत्यावरील ग्रिपचा अंदाज लावता येतो, तसेच, वेग कमी करण्याची गरज आहे, हे कळते. यामुळे वाहनावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

  • पावसाळ्यात टॉप गिअरवर वाहन चालविण्याऐवजी एक गिअर कमी करून वाहन चालवावे. यामुळे टायरची रस्त्यावरील ग्रिप कमी होणार नाही आणि वेगही नियंत्रणात राहू शकतो. हायवेवर टॉप गिअरवर वाहन चालविण्याचा मोह आवरता येणार नाही, हे साहजिक आहे. अशा वेळी वाहनाचा वेग मर्यादेत असावा. यामुळे वाहनावर नियंत्रण ठेवता येईल.

  • पावसाळ्यात उतारावर वा नागमोडी वळणावर वाहन टॉप गिअरवर न ठेवल्यास हायड्रोप्लेनिंगचा धोका कमी होतो.

थोडक्यात, पावसाळ्यात सावधगिरी बाळगून वाहन चालविणे आवश्यक आहे. त्यात किती आधुनिक तंत्रज्ञान असले तरी ते शेवटी तंत्रज्ञान असून, त्यात बिघाड होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षित प्रवास सर्वांसाठी आवश्यक आहे.

(लेखक मुक्त पत्रकार व वाहन क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.