ब्रिटिश राजवटीला टक्कर देण्याची हिंमत दाखविणाऱ्या उमाजी नाईकांनी एका अर्थाने त्या राजवटीविरद्ध युद्धच पुकारले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगत स्वराज्याची पुनःस्थापना करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद होता. उद्या (३ फेब्रुवारीला) त्यांचा हौतात्म्यदिन. त्यानिमित्त...
- शचि पाटणकर
ब्रिटिशांचे राज्य या देशात स्थिरस्थावर होऊन ते नष्ट होईपर्यंतच्या काळात जे ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक होऊन गेले, त्यांच्या चरित्राची मोहिनी विलक्षण आहे. ही परकी सत्ता अगदी प्रारंभापासून मराठी माणसाने कधी मान्य केली नाही.
मराठ्यांची बंडखोर प्रवृत्ती कदाचित याला कारणीभूत असावी. त्याच्याच परिणामस्वरूप ब्रिटिशांविरुद्ध पहिला संघटित सशस्त्र उठाव केला तो एका मराठी माणसाने. त्या नरवीराचे नाव होते उमाजी नाईक.
ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकून स्वकीयांची सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले त्यांचे नाव उमाजी नाईक. तळागाळातल्या सामान्य माणसाला ब्रिटिशांविरुद्ध लढायला ज्यांनी प्रवृत्त केले त्यांचे नाव उमाजी नाईक.
ज्यांच्या जाहीरनाम्याला इतिहासात ‘लाखमोलाचे’ असे मानले गेले, तो जाहीरनामा लिहिला उमाजी नाईक यांनी. त्यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात सात सप्टेंबर १७९१ रोजी झाला. भिवडी हे त्यांचं जन्मगाव.
उमाजी जन्मापासूनच चंचल, हुशार, शरीराने धिप्पाड, उंचापुरे, पण करारी स्वभावाचे होते. मोठा झाल्यावर त्यांनी वडिलांकडून दांडपट्टा, तीरकमठा, तलवार, भाला चालविण्याचे शिक्षण घेतले. रामोशी लोकांकडे असलेली गड संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिशांनी काढून घेतली होती.
त्यांचा हक्क काढून घेतला गेला. ब्रिटिशांनी आपल्या मर्जीतल्या लोकांची तेथे नेमणूक केली. त्यामुळे या गरीब जनतेने धीर सोडला. लोक घरदार सोडून देशांतराला लागले. उपासमारीपाठोपाठ रोगराई पाठीशी लागली. अत्याचार तर होतेच. अशा कठीण परिस्थितीत ब्रिटिशांविरुद्ध पहिला एल्गार केला तो उमाजी नाईकांनी.
‘उम्या’ नावाने ओळखले जाणारे उमाजी पुढे गटनेता झाल्यावर उमाजी नाईक झाले. पनवेलजवळच्या खालापूरवरील दरोड्याची लूट पुण्याला नेत असताना ते पकडले गेले अन् त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली. या सक्तीच्या एकांतवासात उमाजींनी कमालीचा सदुपयोग केला. उमाजी लिहायला-वाचायला शिकले. या काळात त्यांच्या प्रज्ञेचे कमळ चारी अंगांनी विकसित झाले.
आपल्या साथीदारांना बरोबर घेऊन त्यांनी जेजुरीच्या खंडोबापुढे शपथ घेतली अन् इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या बंडाची घोषणा केली. डोंगरदऱ्यात तो आपला दरबार भरवी आणि आपल्या लोकांना सूचना करी.
या सूचना म्हणजे प्रत्यक्ष त्याचे हुकूमच असत. उमाजी यांनी तळागाळातल्या लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. जाहीरनाम्यात ते म्हणतात, ‘‘लोकहो, इंग्रजांची चाकरी करू नका. त्यांना शेतसारा, पट्टी देऊ नका.
देशवासीयांनो, सगळ्यांनी एकत्र येऊन एकाच वेळी उठाव करावा म्हणजे अराजकता माजेल. आपले हे म्हणणे हिंदू समाजाने तर ऐकावेच; परंतु मुस्लिम बांधवांनीही त्याला साथ द्यावी.’’
उमाजींच्या या उद्योगाची ब्रिटिशांना प्रचंड दहशत बसली. त्याला पकडण्यासाठी मॅकिंटॉश या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यांना पकडण्यासाठी प्रथम शंभर ते दहा हजार व चार बिघा जमीन अशी चढत्या क्रमाने बक्षीसे लावण्यात आली.
विचार करा, त्या काळातील दहा हजार म्हणजे किती? डोंगरदऱ्यात, जंगलात लपून राहायच अन् एखाद्या गावात अचानक छापा घालून खंडणी वसूल करायची, ही त्यांची पद्धत. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांना या भागात १५० ठाणी उभारावी लागली. या गनिमीकाव्याच्या लढाईसाठी उमाजींचे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यावर उमाजींची गाढ श्रद्धा होती. आता राजा या नात्याने उमाजी ब्रिटिशांना हुकूम सोडू लागले.
उमाजी श्रीमंतांना लुटून तो पैसा गोरगरिबांना वाटी. स्त्रियांवर अत्याचार झाले तर भावासारखे धावून जात. त्यामुळे त्यांना जनतेचे साह्य मिळू लागले. कोकणातल्या मामलेदारांना तुम्ही ब्रिटिशांना महसूल देऊ नका, असे त्याने कळवले.
एखाद्या झंझावाताने चराचरसृष्टी हादरून जावी तसे ब्रिटिश सरकार या प्रकाराने हादरले. त्यांनी नव्याने बक्षीस जाहीर केले. उमाजीही आता माघारी फिरणार नव्हते. ब्रिटिश सरकार विरुद्ध उमाजी असे सरळसरळ युद्ध सुरू झाले. या वेळी उमाजींनी काढलेल्या जाहीरनाम्यात संपूर्ण हिंदूस्थानचा उल्लेख केलेला आढळतो.
पुणे, ठाणे, सांगली, सातारा कुठेही जा, उमाजींची माणसे इंग्रजांच्या ठाण्यावर हल्ला चढवू लागली. १८३१ या संपूर्ण वर्षभर उमाजींची तलवार तेजाने तळपत राहिली. लोकांच्या नजरेत ते हिरो ठरला.
ब्रिटिशांनी मॅकिंटॉश या अधिकाऱ्याजवळ मोठा फौजफाटा देऊन त्याला उमाजी यांना पकडण्याच्या कामगिरीवर पाठवले अन् द्रव्यलोभाने, फंदफितुरीने आपले काम चोख बजावले. इतिहासाची कितीतरी पाने या फंदफितुरीने डागाळलेली आहेत, त्यात आणखी एकाची भर पडली.
एका स्त्रीचे अपहरण केल्याबद्दल ज्याचा हात उमाजी नाईक यांनी कलम केला होता, त्यानेच उमाजींची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. नाना चव्हाणही फितूर झाला. एकेकाळच्या त्याच्या या सहकाऱ्यांनीच त्याला पकडून दिले.
१५ डिसेंबर १८३१ रोजी पुण्याजवळील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना ते पकडले गेले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला गेला. पुण्याला मामलेदार कचेरीत एका काळोख्या खोलीत त्यांना ठेवण्यात आले. तेथेच त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी मॅकिंटॉश त्याला रोज भेटत असे. त्यानेच उमाजींची सर्व माहिती नोंदवून ठेवली.
तीन फेब्रुवारी १८३४ रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथे उमाजी यांना वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी फाशी देण्यात आले. पारतंत्र्यातील भारतीयांचा आत्मा धगधगत ठेवण्याचे सामर्थ्य या हौतात्म्यात होते हेच खरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.