बेवारस मृतदेहांना आपुलकीने निरोप देणारे चाचा...
गणाधीश प्रभुदेसाई
आज काल मयतीला चार खांदे मिळणे अवघड झाले आहे. शववाहिनितून मृतदेह उतरवून घ्यायलाही बरोबर कोणी नसतो, हे दृश्य स्मशानभूमीत बऱ्याचदा पाहायला मिळते. पण अयोध्येतील महम्मद शरीफ ऊर्फ शरीफचाचा यांचे कार्य अनुकरणीय असून त्यांच्या सेवेच्या व कार्याचा गौरव भारत सरकारने २०२० मधील पद्मश्री देऊन केला आहे. तुम्हाला प्रश्न पडणार की असे काय केले आहे शरीफचाचांनी जेणेकरून त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे कार्य जाणून घेतले तर तुम्ही थक्क व्हाल. जगात समाजासाठी वेगळा विचार करणारी लोकं अजूनही आहेत हे पाहून बरं वाटतं. सायकल दुरुस्तीचे दुकान चालविणारा एक व्यक्ती एवढे उत्तुंग कार्य करू शकतो व त्याच्या कार्याची दखल भारत सरकारला घ्यावी लागते, हे पाहून आश्चर्य वाटते. ‘लावारिस लाशों के मसीहा’ असं शरीफचाचांना म्हटलं जातं. यावरून तुम्हाला त्यांच्या कार्याची जाणीव झाली असावी. त्यांनी अयोध्या येथे आत्तापर्यंत एक, दोन, नव्हे तर २५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. गेल्या २५ वर्षांत त्यांनी तब्बल २५ हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे. तीस वर्षांपूर्वी शरीफचाचांच्या मुलाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला व त्याच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली व तेव्हापासून बेवारस मृतदेहावर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले.