अॅड. सायली गानू-दाबके
एखादी फ्रँचाइझ पद्धती राबविण्यासाठी फ्रँचायझर भौगोलिक क्षेत्राची व्याप्ती त्याच्या सोयीनुसार ठरवू शकतो. अनेकदा छोटेखानी स्वरूपाच्या व्यवसायांसाठी एकाच शहरात अनेक शाखा किंवा केंद्र उघडणे हे योग्य धोरण ठरू शकते. एकाच शहरातील बहुतांश शाखा यशस्वीपणे चालल्या आणि त्यातून फायदा मिळवता आला, तर फ्रँचायझर अशाच शाखा इतर शहरात उघडण्याचे पाऊल उचलू शकतो.
मग कधी एका वेळी एक शहर आणि त्यात अनेक शाखा अशा प्रकारे व्यवसाय वाढवला जातो, तर कधी विविध शहरांमध्ये एकतरी शाखा अशा प्रकारेही व्यवसायवाढीचे धोरण असू शकते. स्वतःच्या राज्यात आणि देशात यश मिळाले, की आंतरराष्ट्रीय बाजारात पाऊल टाकण्याची इच्छा होणे हे साहजिकच असते.
मात्र, स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवर यश मिळाले म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरही सर्व व्यवसाय यशस्वी होतातच असे नाही. आंतरराष्ट्रीय फ्रँचायझिंग करताना काही मुद्दे हे विशेष महत्त्वाचे ठरतात. अशा मुद्द्यांबद्दल या लेखात चर्चा करणार आहोत.