बिटकॉइन' या आभासी चलनाच्या (क्रिप्टो करन्सी) फसवणुक प्रकरणाची सुरूवात दत्तवाडी पोलिस ठाणे, पुणे शहर पोलिस दलातील तसे जरा जास्तच व्यस्त असणारे पोलिस ठाणे. जनता वसाहत या शहरातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा परिसर याच पोलिस ठाण्याच्या हद्दित येत असल्याने गंभीर गुन्हे इथे दिवसागणिक चालत येतात. दरम्यान, 2018 हे वर्ष सुरु झाले आणि एक वेगळाच गुन्हा या पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी काही व्यक्ती आल्या. आर्थिक फसवणुकीचाच हा प्रकार असला तरीही, हा गुन्हा मात्र काहीसा वेगळा होता, कारण यात फसवणूक झालेल्या लोकांची गुंतवणूक कुठल्याही कंपनी, बॅंक, पतसंस्था, खासगी बॅंक अशा कुठल्याच नावाने झाली नव्हती, तर हि फसवणूक होती, "आभासी चलना'ची म्हणजेच क्रिप्टोकरन्सीमधील एक असलेल्या "बिटकॉईन' (Bitcoin)ची. पोलिसांच्या दृष्टीनेही हा प्रकार नवीनच होता आणि नुकतेच बाळसे धरलेल्याल्या सायबर पोलिसांसाठीही हा प्रकार तितकाच नवीन होता.