विशेषतः कोविड १९ नंतर आरोग्यविषयक जागरूकतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. प्रत्येक जण स्वतःची व कुटुंबांची विशेष काळजी घेताना दिसून येतो.
त्यामुळेच, आरोग्यविषयक खर्चामध्येही स्वाभाविकच वाढ झाली आहे.
म्हणूनच, प्रत्येकाला कुतूहल असते, की मला यातून करसवलती कशा मिळतील. आरोग्यविषयक खर्च आणि त्यातील करसवलती याविषयी घेतलेला हा आढावा.
या कलमाअंतर्गत स्वतःच्या व कुटुंबासाठी केलेल्या मेडिक्लेम खर्चाची वजावट मिळते, हे आपण जाणतोच. परंतु, ती वजावट किती आणि त्यातील अटी कोणत्या ते पाहू या.
ही वजावट केवळ व्यक्ति किंवा हिंदू अविभक्त कुटुंब यांनाच मिळू शकते.
पॉलिसीमध्ये समाविष्ट होणाऱ्या भारतातील रहिवासी व्यक्ती वय वर्ष ६० पर्यंत असल्यास रु. २५,००० रुपयांपर्यंत वजावट मिळते. त्यामध्ये पती, पत्नी व मुले समाविष्ट होऊ शकतात. पॉलिसीमध्ये ६० वर्षांखालील आई-वडील समाविष्ट असल्यास अतिरिक्त रु. २५,००० ची वजावट मिळते. तसेच, पॉलिसीमध्ये ६० वर्षांवरील (ज्येष्ठ नागरिक) आई-वडील किंवा दोघेही समाविष्ट असल्यास अतिरिक्त रु. ५०,००० ची वजावट मिळू शकते.
वजावट मिळण्यासाठी पत्नी आणि मुले अवलंबून असणे, ही अट आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी एक मुभा म्हणजे औषधोपचारांवरील झालेल्या खर्चासदेखील रु. ५०,००० इतकी वजावट मिळते. उदा. रमेश हा एक कमावता ३४ वर्षांचा तरुण आहे. त्याने त्याची मुलगी व पत्नीसाठी रु. २४,००० रुपये मेडिक्लेममध्ये गुंतवले. तसेच ५९ वर्षांच्या आई-वडिलांसाठी रु. २८,००० गुंतवले, तर त्याला स्वतःचे रु. २४,००० व आई-वडिलांचे २५,००० असे मिळून रु. ४९,००० रुपयांची वजावट मिळेल.
आई किंवा वडील ६० किंवा जास्त वयाचे असल्यास स्वतःचे २४,००० व आई-वडिलांचे २८,००० अशी एकूण रु. ५२,००० वजावट मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःवर केलेल्या औषधोपचारावरील खर्चासाठी देखील रु. ५०,००० पर्यंतची वजावट मिळते. त्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांना मेडिक्लेम पॉलिसी नसतानाही वजावट मिळू शकते.