what went wrong in online education during Covid19 writers Samrat Phadnis
what went wrong in online education during Covid19 writers Samrat Phadnis

शाळा झाल्या बंद; मग कसा उडाला गोंधळ...?

Published on

कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद झाली. घरी राहून मोबाईलवर मुले-मुली शिकताहेत आणि त्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी शिक्षक धडपताहेत. डिजिटल शिक्षणाकडे अचानक फेकले गेल्याने साऱ्याच व्यवस्थेची त्रेधा उडालीय. डिजिटल माध्यमातून शिक्षण देताना नेमके काय चुकतेय आणि ते कसे दिले पाहिजे, यावर प्रकाश टाकणाऱ्या लेखमालेतील पहिला भागः 

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान होत आहे. औद्योगिक-व्यापारी नुकसान आकडेवारीमुळे नजरेत भरते. पटकन समजते. परवा देशाचा जीडीपी 23.9 टक्क्यांनी घसरल्याची बातमी होती. जीडीपी ठरविणाऱ्या सर्व क्षेत्रांमध्ये कशी घट झाली आहे, याची माहिती त्यातून समोर आली. शिक्षणाचे नुकसान आकडेवारीतून थेटपणे लगेचच समोर येत नाही. शिक्षण क्षेत्रातील नुकसानीमुळे होणारे परिणाम दीर्घकालीन असतात. केवळ एखाद्या शैक्षणिक वर्षातले काही महिने वाया गेले, इतक्या मर्यादित स्वरूपात शिक्षणातील नुकसानीचे मुल्यमापन करता येत नाही.

त्यामुळे, शिक्षणावर होत असलेले परिणाम समोर यायलाही वेळ लागणार आहे. आजअखेर भारतात, महाराष्ट्रात त्यावर ठोसपणाने भाष्य झालेले नाही. शिक्षण घेण्याच्या आणि शिकविण्याच्या मुलभूत ढाच्यामध्ये होत असलेले बदल समजून घेतले आणि त्या बदलांना अधिक टोकदार स्वरूप देता आले, तरच शिक्षण क्षेत्रात होऊ घातलेले अभूतूपूर्व नुकसान काही अंशी तरी भरून काढता येणार आहे. शिक्षण क्षेत्राच्या अभूतपूर्व नुकसानीचे कारण कोरोनामुळे बंद कराव्या लागलेली शाळा-महाविद्यालये हे आहे. शाळा-महाविद्यालये बंद करावी लागल्यामुळे पारंपरिक पद्धतीने वर्गात शिकविण्याची पद्धत एका रात्रीत बदलावी लागली.

वर्गात नोट्स देण्याच्या पद्धतीत बदल झाला. पारंपरिक पद्धतीने वर्गात बसून शिकण्याची पद्धत बदलावी लागली. शिकवलेल्या विषयाचे आकलन झाले आहे का, हे समजून घेण्यासाठी घ्यावयाच्या परीक्षा पद्धतीतही बदल झाला. या बदलांना सामोरे जाण्याचा अवधी अत्यंत कमी होता. परंपरेने चालत आलेली पद्धत अचानक बदलावी लागल्याचे परिणाम मोठे घडत आहेत. वर्गांची जागा ऑनलाईन क्लासरूमने घेणे, समोर एकही विद्यार्थी नसताना ऑनलाईन पद्धतीने डिजिटल माध्यमांमध्ये शिकविणे, विद्यार्थ्यांनी घरात बसून डिजिटल डिव्हाईसेसवर शिक्षण घेणे, प्रश्न विचारणे-प्रश्नांची उत्तरे देणे अशा क्रिया एकापाठोपाठ एक विलक्षण वेगाने घडत आहेत. या साऱ्यांचे परिणाम शिक्षण क्षेत्रावर होत आहेत आणि ते भले की बुरे हे अद्यापी पूर्णांशाने समोर आलेले नाही. 

देशपातळीवरील सर्वेक्षण सांगते

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), केंद्रीय विद्यालये आणि जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकताच प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये डिजिटल माध्यमांद्वारे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना काय अडचणी आल्या, याचा अभ्यास झाला आहे. हा अभ्यास गूगल फॉर्मद्वारे केला गेला. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या तपशीलानुसार, सर्वेक्षणात 18,188 विद्यार्थी, 3543 शिक्षक, 253 मुख्याध्यापक आणि 12614 पालकांचा समावेश होता. वरवर पाहता, डिजिटल माध्यमांद्वारे शिक्षण आनंदी आणि समाधानकारक असल्याचे बहुसंख्य पालक-विद्यार्थ्यांचे मत असल्याचे दिसते. तपशीलामध्ये गेल्यास गणित आणि विज्ञानाचे शिक्षण डिजिटल माध्यमांद्वारे घेताना मुलांना अडचण वाटल्याचे दिसते. सीबीएसईच्या मुलांना भाषा हा विषय डिजिटल माध्यमांद्वारे शिकताना अधिक अडचण आल्याचे सर्वेक्षणात समोर आले. तिन्ही प्रकारच्या शाळांमधील सर्वाधिक म्हणजे 80 टक्क्यांहून अधिक मुलांनी शिक्षणासाठी मोबाईल डिव्हाईसचा वापर केला, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. 

गणित, भाषा, विज्ञान घरात वाटे अवघड

सीबीएसईच्या शाळांची संख्या महाराष्ट्रातही वाढते आहे. त्यामुळे, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाकडे अधिक काळजीपूर्वक पाहायला हवे. सीबीएसईच्या 4857 मुलांपैकी 21.40 टक्के मुलांनी डिजिटल माध्यमांतील शिक्षण आनंदी असल्याचे नोंदविले. 39.70 टक्के मुलांनी शिक्षण समाधानकारक असल्याचे सांगितले. 18.90 टक्के पालकांनी शिक्षण आनंदी असल्याचे आणि 45.80 टक्के पालकांनी शिक्षण समाधानकारक असल्याचे सांगितले. गणित शिकण्यात 45.20 टक्के मुलांना आणि 45 टक्के पालकांना अडचणी वाटल्या. विज्ञान विषयात अडचण आल्याचे 20 टक्के मुलांनी आणि 18.30 टक्के पालकांनी सांगितले. भाषा विषयामध्ये 30.60 टक्के मुलांना आणि 26.30 टक्के पालकांना अडचणी आल्या. बहुसंख्य मुलांनी मोबाईलचाच वापर शिक्षणासाठी केला होता. सर्वेक्षण परिपूर्ण मानता येणार नाही, मात्र गणित, विज्ञान आणि भाषा हे विषय डिजिटल माध्यमांद्वारे शिकवणे आणि शिकलेले समजणे या दोन्ही क्रिया अवघड ठरल्या असल्याचा निष्कर्ष काढता येतो. 

शिक्षण देताना, घेताना अडचण

महाराष्ट्रामध्ये सीबीएसई शाळा प्रामुख्याने शहरी अथवा निमशहरी आहेत. त्याहून कित्येक पटींनी जास्त असलेल्या शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या अखत्यारित येतात. राज्यातील प्राथमिक शाळांची संख्या 1,06,237 असल्याचे यावर्षीच्या राज्य आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. माध्यमिक शाळांची संख्या 27,446 आहे. या दोन्हींमध्ये मिळून 64,978 शाळांना महाराष्ट्र सरकारने डिजिटल शाळा म्हणून दर्जा दिलेला आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोरोनामुळे डिजिटलकडे वळवावी लागताना सर्वाधिक पिसला गेलेला घटक आहे शिक्षक. राज्यातील 5,18, 714 शिक्षकांना डिजिटलचे प्रशिक्षण दिल्याची नोंद आर्थिक अहवालात आहे. राज्यातील शिक्षकांची संख्या सात लाखांवर आहे. याचा अर्थ 70 टक्क्यांहून अधिक शिक्षकांना डिजिटल माध्यमांद्वारे कसे शिकवायचे, याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. अशी आकडेवारी असेल, तर ती व्यवहारामध्ये दिसणे अपेक्षित होते. इतक्या मोठ्या संख्येने डिजिटल शाळा आहेत आणि डिजिटल प्रशिक्षित शिक्षक आहेत, म्हणून महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत वेगळी, देशाला आदर्शवत अशी हवी होती. ती तशी आहे का, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. प्रत्यक्षात आकडेवारी कागदावरच राहिली आहे. महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये कोरोनामुळे बंद ठेवावी लागलीच; शिवाय शिक्षण देताना आणि घेतानाही कमालीच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले. 

दृष्टिक्षेपात महाराष्ट्राची शैक्षणिक आकडेवारी (2018-19)

- प्राथमिक शिक्षणावरील खर्च 20,997 कोटी रूपये 
- प्राथमिक शाळांची एकूण संख्या 1,06,237
- संगणक असलेल्या प्राथमिक शाळा 58.9 टक्के
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावरील खर्च 17,585 कोटी रूपये
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या 24,446
- संगणक असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 80 टक्के
- संगणक व इंटरनेट असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 70.8 टक्के

का आले शिकताना अडथळे?

प्रचलित शिक्षण पद्धती कित्येक दशकांमध्ये उत्कांत झालेली व्यवस्था आहे. शाळा, शाळांमधील बंदिस्त वर्ग, वर्गामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसमोर शिकवणारे शिक्षक अशी ही रचना आहे. शिकवलेले समोरच्या विद्यार्थ्यांना समजते आहे का, हे तपासण्यासाठी वर्गामध्ये प्रश्न विचारण्यासारखा समोरासमोरील संवाद आहे. मूल्यमापन ठरविण्यासाठी परीक्षा पद्धत आहे. सामुहिकपणे शिक्षण हे या पद्धतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. शिक्षण एकत्रित बसून होते, हा आपल्या व्यवस्थेचा पाया आहे. या पायाला कोरोनाच्या काळात तडा गेला. घरात बसून मोबाईलसारख्या उपकरणावर एकट्याने बसून शिकण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. समोर शारीरिकदृष्ट्या एकही व्यक्ती नसताना शिकवायचे, अशी वेळ शिक्षकांवर आली. या दोन्ही घटकांना आतापर्यंत प्रायोगिक स्वरूपातही अशा घटनेचा सातत्याने अनुभव नव्हता.

परिणामी, संपूर्ण व्यवस्थाच प्रयोगशील अवस्थेत गेली. शिक्षणासारख्या क्षेत्रात प्रयोगांना महत्व आहेच; तथापि ते प्रयोग आधी कुठेतरी सिद्ध करून मग वापरात आणण्याची आवश्यकता असते. अचानक एकाचवेळी सर्वत्र फक्त प्रयोग सुरू झाले, की गोंधळाची स्थिती होते. ती स्थिती शिक्षण क्षेत्रात आली. परिस्थिती अचानक आली असली, तरी साऱ्या व्यवस्थेने बावचळून जाण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, पुरेशी तयारी नसल्याने गोंधळ जरूर झाला. शिक्षकांनी शिकवायचे कसे आणि विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे, याबद्दलचा गोंधळ कायम राहिला. 

(पुढील भागामध्ये वाचा : डिजिटल माध्यमातून शिकवण्यासाठी काय हवी तयारी...?)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()