तरुणांची पावले वळतायेत ‘डेटा सायन्स’ क्षेत्राकडे!!
गेल्या साधारणत: काही दशकांपासून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग क्षेत्र मोठ्या संधी म्हणून अधिराज्य गाजवत आहे. आता या क्षेत्राबरोबरच माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रानेही मोठ्या संधी तरुणांना दिल्या आहेत. म्हणूनच प्रत्येक दहा घरांमधील किमान तीन ते चार घरांमध्ये (शहरी भागात) कोणी-ना-कोणी या क्षेत्रात गेलेले आहे. किंवा या क्षेत्रात जाण्यासाठी धडपडत आहे, किंवा या क्षेत्राशी निगडित नोकऱ्या मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान याबरोबरच आता कृत्रिम बुद्धिमत्ता (म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स) आणि ‘डेटा सायन्स’ या क्षेत्राकडे तरुणांची पावले वळू लागली आहेत. नेमकं हे क्षेत्र काय आहे आणि त्यातील संधी काय हे जाणून घेऊ यात.
डेटा सायन्स म्हणजे थोडक्यात, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या ‘डेटा’वर म्हणजेच माहितीवर वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून काम करणे. मग नेमकं हे काम कशासाठी करायचे, तर एखाद्या व्यवसायावर होणारा परिणाम तपासण्यासाठी संकलित, संचित केला जातो आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या ‘डेटा’चे विश्लेषण केले जाते, हेच ते डेटा सायन्स क्षेत्र. आजकाल मोठा गाजावाजा होत असलेले ‘डेटा सायन्स’ हे क्षेत्र नक्की आहे तरी काय? हे समजून घेऊ यात.
डेटा सायन्स म्हणजे?
मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या डेटाचे विविध माध्यमातून, विविध प्रकारे निष्कर्ष समोर आणणे त्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करणे, हे ‘डेटा सायन्स’ आहे. यामध्ये डेटा शुद्धीकरण, त्याचे विश्लेषण आणि तयारीशी संबंधित गोष्टींचा समावेश डेटा सायन्समध्ये आहे. उपलब्ध असलेल्या कच्च्या डेटापासून छुपे नमुने शोधण्यासाठी विविध साधने, अल्गोरिदम आणि मशिन लर्निंगचे बहुविद्याशाखीय मिश्रण वापरले जात आहे. विविध तंत्रे आणि साधनांचा वापर करून डेटा बदलण्याची आणि गोळा करण्याची आणि तिचे विश्लेषण करण्याची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. कच्च्या डेटापासून व्यावसायिक इनसाइट मिळविण्याची ही वैज्ञानिक प्रक्रिया असून व्यवसायात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त ठरते.