पुणे शहर परिसरात श्वानदंशाच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. दरमहा सुमारे दीड हजाराच्यावर अशा घटना समोर येत आहेत.
हडपसर - शहर परिसरात श्वानदंशाच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. दरमहा सुमारे दीड हजाराच्यावर अशा घटना समोर येत आहेत. गेल्या वर्षभरात पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात श्वानदंशाच्या १६ हजार ५६९ घटनांची नोंद झाली आहे. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात भटक्या श्वानांसह पाळीव श्वानांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. या वाढत्या संख्येमुळे शहरभर नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. कचरा संकलन ठिकाणे, फिडींग स्पॉट व विविध अंतर्गत रस्त्यांच्या परिसरात भटकी श्वाने कळपाने वावरताना दिसत आहेत. रस्त्यावरील पादचारी व दुचाकी चालकांच्या अंगावर ही श्वाने अचानकपणे येत असतात. अनेकदा ही श्वाने थेट चावा घेत असतात. याशिवाय श्वाने अंगावर येत असल्याचे पाहून त्यांच्यापासून बचाव करताना छोटेमोठे अपघातही घडत आहेत.
ठिकठिकाणी प्राणीप्रेमी व्यक्ती या श्वानांना अन्नपदार्थ देत असतात. सवयीप्रमाणे ही श्वाने त्या त्या वेळी संबंधीत ठिकाणी जमा होत आहेत. त्यामध्ये नवीन श्वान आल्यास ही श्वाने एकमेकांवर भूंकत धावून जातात. त्यावेळी तेथून प्रवास करणारे नागरिक श्वानांच्या भांडणात सापडून धोका निर्माण होत असतो. पालिकेकडे तक्रार केल्यानंतरच पथकाचे कर्मचारी येत असतात. अनेकदा तक्रार करूनही अशा श्वानांवर कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
"नागरिकांची तक्रार मिळताच श्वानपथकाकडून कारवाई केली जात आहे. युनिव्हर्सलसारख्या संस्थांच्या मदतीने श्वानांची नसबंदी करून त्यांच्या पैदासीवर नियंत्रण केले जात आहे. शहरात फिडींग स्पॉट ठरविण्याचे काम सुरू आहे.'
- विजय ओव्हाळ, श्वानपथक समन्वयक, महानगरपालिका
शहरातील वर्षभरातील श्वानांची आकडेवारी
भटकी - ३ लाख १५ हजार
पाळीव - ४ हजार
नसबंदी केलेली - २७ हजार २५४
निर्जंतुकीकरण केंद्र - वडकी, मुंढवा, कात्रज
२०२२ मधील श्वानदंशाच्या दरमहाच्या घटना
जानेवारी - १९२०
फेब्रुवारी - १२९६
मार्च - १२९०
एप्रिल - ८५२
मे - १५०५
जून - १३७३
जुलै - १०५०
ऑगस्ट - १२७८
सप्टेंबर - १४९९
ऑक्टोबर - १५६३
नोव्हेंबर - १४००
डिसेंबर -१५४३
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.