पुणे - परदेशी महिलेच्या अधिवृक्क (ॲड्रीनल) ग्रंथीतून सुमारे २३ सेंटिमीटर आकाराची गाठ यशस्वीरीत्या काढल्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नुकतीच करण्यात आली आहे. शरीरातील ग्रंथीच्या म्हणजेच अधिवृक्क ग्रंथीतील सर्वांत मोठी गाठ काढण्यासाठी पुण्यातील एस हॉस्पिटलमधील मूत्रविकार तज्ज्ञांच्या पथकाने यशस्वीरीत्या ‘थ्रीडी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली होती.
भारतामध्ये आतापर्यंत २० सेंटिमीटरपर्यंत गाठ दुर्बिणीने काढण्यात आली होती, तर सर्व जगामध्ये आतापर्यंत पर्यंत २२ सेंटिमीटरपर्यंतची गाठ काढल्याची नोंद आहे. मात्र आता एस हॉस्पिटलमध्ये थ्रीडी लॅप्रोस्कोपीद्वारे काढल्या गेलेल्या या २३ सेंटीमीटर गाठीची नोंद ही आतापर्यंत काढलेली सर्वात मोठी गाठ अशी झाली आहे.
शस्त्रक्रिया करणाऱ्या या मूत्रविकार तज्ज्ञांच्या पथकामध्ये प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, वरिष्ठ युरॉलॉजी तज्ज्ञ डॉ. गुरुराज पडसलगी, युरोलॉजिस्ट डॉ. मयूर नारखेडे व डॉ. काशिनाथ ठाकरे यांचा समावेश होता. तसेच भूलतज्ज्ञांमध्ये डॉ. सोनाली वस्ते होत्या. सहाय्यक परिचारिका सुनीता बांगर, उषा बावधने, सविता कोकरे, मंदा बहिर, बापू कांबळे आणि राहुल साबळे यांचा समावेश होता.
अधिवृक्क ग्रंथीचे कार्य
शरीरामध्ये एक साधारणत: चार ते आठ ग्रॅम या वजनाची ४ बाय ३ सेंटिमीटर आकाराची असलेली अधिवृक्क ग्रंथी दोन्ही मूत्रपिंडावर असते. या ग्रंथीला शरीराच्या कार्यक्षमतेमध्ये फारच महत्त्वाचे स्थान आहे. ऍड्रिनॅलिन व स्टेरॉइड ही अत्यंत जीवनावश्यक असे संप्रेरक स्राव या ग्रंथीमध्ये तयार केले जातात.
अशी वाढली गाठ
५८ वर्षीय परदेशी महिलेला सतत पाठदुखी आणि उलट्या होत होत्या. मायदेशात केलेल्या पहिल्या सीटी स्कॅन तपासणीमध्ये साधारणत: १५ सेंटिमीटरची गाठ ॲड्रीनल ग्रंथीच्या डाव्या बाजूस दिसली. तेथील डॉक्टरांनी रुग्णावर तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. परंतु शस्त्रक्रियेच्या भीतीने रुग्णाने पुढील उपचार करण्याचे टाळले. पुढे तक्रारी कमी न झाल्यामुळे शेवटी त्यांनी भारतात वैद्यकीय उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी त्या पुण्यातील एस हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. पुन्हा सीटी स्कॅनची तपासणी केल्यानंतर हीच गाठ आता २३ सेंटिमीटरपर्यंत वाढल्याचे दिसले. या गाठीने रुग्णाच्या शरीरातील पोटामध्ये जवळजवळ अर्ध्यावर अधिक भाग व्यापला होता. ही गाठ डाव्या भागात असल्यामुळे डावे मूत्रपिंड, प्लिहा व स्वादुपिंड आणि मोठे आतडे यांना घट्ट चिटकून बसली होती.
अशा परिस्थितीत पोटावर छेद घेऊन शस्त्रक्रिया करणे जास्त सुरक्षित होते. परंतु, रुग्णाला दुर्बिणीतूनच शस्त्रक्रिया करायची होती. त्यामुळे थ्रीडी लॅप्रोस्कोपी या आधुनिक दुर्बिणीच्या तंत्राने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. गाठीतून तीन लिटर फ्लूइडही काढण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांत रुग्ण पूर्ववत झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.