Manjari News : पंचवीस कोटींचा महादेवनगर-मांजरी रस्ता सुरक्षित वाहतूक की वाहनतळासाठी ?

वाहतूक पोलिस मात्र नागरिकांकडून पार्किंगच्या मागणीची आणि पालिकेच्या कार्यवाहीची वाट बघत कारवाईची टाळाटाळ करीत आहे.
25 crore mahadevnagar manjari road for transport or parking
25 crore mahadevnagar manjari road for transport or parkingSakal
Updated on

मांजरी : पुनावाला समुहाच्या सामाजिक दायित्व निधीतून काही वर्षांपूर्वी महादेवनगर- मांजरी रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र, सुमारे पंचवीस कोटी रूपये खर्चून बांधलेला हा रस्ता वाहतुकीसाठी कमी आणि पार्किंगसाठीच अधिक वापरला जात आहे.

वाहतूक पोलिस मात्र नागरिकांकडून पार्किंगच्या मागणीची आणि पालिकेच्या कार्यवाहीची वाट बघत कारवाईची टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे रेल्वे उड्डाणपुलापर्यंतचा हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी, असा सवाल प्रवासी व नागरिकांकडून केला जात आहे.

तीन वर्षांपूर्वी मांजरी बुद्रुक गाव महापालिकेत समाविष्ट झाले आहे. त्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पुनावाला समुहाच्या सामाजिक दायित्व निधीतून अण्णासाहेब मगर महाविद्यालय ते रेल्वे उड्डाणपूल अशा दोन किलोमीटर रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.

मात्र, रस्ता तयार झाल्यापासून त्याच्या दुतर्फा थेट रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहने पार्क केली जात आहेत. दुचाकीपासून मोठमोठ्या कंटेनरसारखी वाहने दररोज येथे पार्क केली जात आहेत. त्यामुळे रूंदीकरण होऊनही हा रस्ता अरूंदच राहिला आहे. या वाहनांवर ना कधी सार्वजनिक बांधकाम विभागाने, ना पालिकेने, ना पोलिसांनी कारवाई केली.

त्यामुळे सर्रास वाहनचालक बिनधास्तपणे रस्त्यावर वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे या भागात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. रस्त्यालगतच्या सोसायट्या, कॉलनीमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांना व पादचारी नागरिकांना त्यामुळे जीव मुठीत घेऊन रस्त्यावर यावे लागते.

सोलापूर महामार्ग ते वाघोली येथील नगर महामार्ग जोडणारा हा जिल्हा प्रमुख मार्ग आहे. याच रस्त्यावर पुनावाला ग्रूपची सेझमधील मोठी कंपनी आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच या मार्गावर कायमच मोठी वाहतूक आहे.

महादेवनगर या मोठ्या लोकवस्तीतून येणारा या मार्गाचे सात वर्षांपूर्वी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रुंदीकरण करण्यात आले. मात्र, सध्या रस्त्याचा उपयोग चारचाकी, टेम्पो, टँकर, डंपर, स्कूल बस, प्रवासी आणि इतर अवजड वाहनधारकांकडून वाहनतळ म्हणून केला जात आहे.

मगर महाविद्यालय ते रेल्वे उड्डाणपूल या दोन किलोमीटर अंतरामध्ये रस्त्यावर दुतर्फा दररोज सुमारे पाचशेच्यावर चारचाकी व दुचाकी वाहने उभी असतात. त्यावर कोणत्याही प्रशासनाकडून कारवाई होत नाही. त्यामुळे रस्त्यावरील वाहन पार्किंगची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

"दोन्हीही बाजूने रांगेने वाहने पार्क होत आहेत. त्यामुळे रस्ता रूंदीकरण सुरळीत वाहतुकीसाठी की पार्किंगसाठी असा प्रश्न पडला आहे. रूंदीकरण होऊनही अपघात व कोंडी होतच आहे. पालिकेने येथे लवकरात लवकर पार्किंग झोन करावेत. वाहतूक पोलिसांनी अनाधिकृत पार्किंगवर कारवाई करावी. प्रवाशांना त्यामुळेच सुरळीत व सुरक्षित वाहतूक करता येईल.'

- भानुदास म्हस्के, स्थानिक नागरिक

"नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली पाहिजे. पार्किंगमुळे कोणकोणत्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होत आहे, ती ठिकाणे सांगितली पाहिजेत. त्यानंतर आम्ही तो अहवाल पालिकेला सादर करू. पालिकेकडून वाहनतळाची जागा निश्चित झाल्यावर इतर ठिकाणी होणाऱ्या अनाधिकृत पार्किंगवर कारवाई केली जाईल.'

- अर्जुन बोत्रे वाहतूक पोलिस निरिक्षक, हडपसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.