डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ३२ ग्रामपंचायतींचे मतदान ५ नोव्हेंबरला होत आहे. सध्या सर्व गावात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून उमेदवार चाचपणी,पॅनल तयार करण्यास सुरुवात झाली आहे.थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने प्रत्येक मतदारास महत्व आले आहे.त्यामुळे यंदा दिवाळीपूर्वीच मतदारांची दिवाळी व विजयी उमेदवारांचे फटाके फुटणार आहेत.
माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे. बारामती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या काटेवाडी, गुणवडी, डोर्लेवाडी, पारवडी, शिर्सुफळ सह साबळेवाडी, गाडीखेल, वंजारवाडी, सायंबाचीवाडी, सुपा, दंडवाडी, कुतवळवाडी,
भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, मेडद, कऱ्हावागज, पवईमाळ, धुमाळवाडी,आंबी.बु., कोऱ्हाळेखुर्द, करंजेपूल, करंजे, मगरवाडी, चौधरवाडी, निंबोडी, मुढाळे, उंडवडी.क.प., जराडवाडी, म्हसोबानगर, मानाप्पावस्ती या ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सरपंचपदाची निवडणुक पुन्हा एकदा थेट जनतेतून होणार असल्याने सदस्यांपेक्षा प्रत्येक मतदाराला महत्व येणार आहे.
१६ ते २० ऑक्टोबर पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे.२३ ऑक्टोबर छाननी होणार आहे.२५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे.माघार घेण्यापासून निवडणूक दिवशीपर्यंत फक्त १० दिवस प्रचाराला मिळणार असल्याने या दिवसांत प्रचाराचा धुराळा निघणार आहे.शिवाय मतदान दिवाळीपूर्वी होणार असल्याने मतदारांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार
सध्या निवडणुकीमुळे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये थकबाकी नसल्याचे व इतर दाखले घेण्यासाठी इच्छूक उमेदवारांची गर्दी झालेली दिसून येत आहे. अनेक राजकीय पदाधिकारी हे निवडणुकीला उभे राहण्यासाठी घरपट्टी पाणीपट्टी कराची रक्कम जमा करतात त्यानंतर पुढील पाच वर्ष कसलीही कर बाकी भरत नाहीत,आता निवडणुकीला उभे राहण्यासाठी या इच्छुक उमेदवारांना ग्रामपंचायतीची सर्व करबाकी भरावीच लागणार असल्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणार आहे .त्याचबरोबर यंदा निवडणूक असलेल्या गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.