सासवड : पुरंदर तालुक्यातील राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल ९२ गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी ३३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली. यातील पारगाव - माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता.१२) होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार संजय जगताप नेतृत्वात त्यांच्या पाठपुराव्याने पाणी पुरवठा योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
सोमवारी (ता.१२) सकाळी ९ वा. कुंभारवळण येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शरद कृषी भवन आणि ग्रामसचिवालयाच्या इमारतीचा लोकार्पण माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या हस्ते आणि आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होते आहे. याचदिवशी दुपारी ४ वा. शिवरी स्टॅण्ड येथे शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे तसेच सायंकाळी ५ .३० वाजता वाघापूर चौफुला येथे पारगाव - माळशिरस प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते तसेच पुणे जि.प.चे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आदींसह तालुक्यातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकांच्या उपस्थितीत होणार आहे.
पारगाव - माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ६२ कोटी २० लाख रूपये खर्चाची असून यामध्ये नायगाव, पारगाव, सिंगापूर, गुरोळी, राजेवाडी, वाघापूर, पिसर्वे, मावडी, राजुरी, माळशिरस, टेकवडी, आंबळे, रिसे, पिसे या गावांचा समावेश आहे. नाझरे धरणातून होणाऱ्या या योजनेतून दर माणशी दररोज ५५ लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना २७ कोटी १२ लाख रुपये खर्चाची असून यामध्ये शिवरी, खळद, तक्रारवाडी, वाळूंज, निळूंज, मुंजवडी व एखतपूर या गावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील पिलाणवाडी धरणातून पाणीपुरवठा होणार असून दर माणशी दररोज ५५ लिटर पाणी मिळणार आहे. याबरोबरच दिवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना १५ कोटी १६ लाख रुपयांची असून यामध्ये दिवे, सोनोरी, झेंडेवाडी या गावांचा समावेश आहे. या योजनेच्या कामाचा कार्यादेश देण्यात आला आहे. तर राख प्रादेशिक पाणीपुरवठा योजना १२ कोटी ५७ लक्ष रुपयांची असून यामध्ये राख, हाकेवस्ती, अलगुद्दारा वस्ती आदी १३ वस्त्यांचा समावेश आहे. या प्रादेशिक योजनांबरोबरच इतर बहुतांशी प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठा योजना होणार आहे. पुरंदर तालुक्यातील ९२ गावांसाठी सुमारे ३३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे नागरीकांच्या पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
``केंद्र आणि राज्य शासन जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील सर्व गावांतील प्रत्येक घरात नळाने स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पेयजल पुरवठा करण्याचे निश्चित केले. गावठाण, वाड्या वस्त्यांसाठी स्वतंत्र पाझर विहिर, नवीन पंपगृह, स्वतंत्र साठवण टाक्या व पंपिंग मशिनरींचा समावेश आहे. ग्रामीण पाणीपुरवठा.. विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून या नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.``
- संजय जगताप, आमदार पुरंदर-हवेली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.