सासवड : जिथे गायरान क्षेत्र असूनही खडकाळ माळामुळे व पर्जन्यमान घटल्याने कुसळही येत नव्हते. अशा ठिकाणी आव्हान स्विकारुन चक्क चांबळी (ता. पुरंदर) येथे `कडजाई देवराई` प्रकल्प हाती घेतला होता. आता तिथे गवताचे जंगल तयार होऊन झाडे आकार घेऊ लागली असून झाडांची संख्या चार हजारांच्या घरात गेली आहे. तर यंदाही अजून 400 झाडांची भर पडून.. अजूनही 400 झाडे लावली जाणार आहेत.
पुरंदर तालुक्यातील ग्राम गौरव प्रतिष्ठान, पाणी पंचायत संस्था व ग्रामपंचायत चांबळी यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2017 मध्ये चांबळी गावच्या गावठाणापासून दूर डोंगराकडे असलेल्या गायरान क्षेत्रामध्ये `कडजाई देवराई` हा प्रकल्प हाती घेतला होता. छोट्या जंगलांचा शास्त्रीय अभ्यास करून या देवराईचे नियोजन करण्यात आले होते. देवराई म्हणजे गावातील असे क्षेत्र की.. जेथील जमीन ही देवासाठी म्हणूनच राखून ठेवली जाते. या देवराईतील एक गवताची काडी किंवा झाडाची फांदी सुद्धा गावकरी घरी किंवा अन्य वापराला घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आपोआपच या क्षेत्रांमध्ये गवत, झाडे, विविध पक्षी, जीवांचे सरंक्षण होते. या क्षेत्रात जैवविविधता हळू हळू वाढून तिचे जतन व रक्षण होताना दिसते. गावच्या शिवारात जणु निसर्गदैवता वास करते आणि नैसर्गिक सौंदर्य खुलून जाते. नवी पिढी त्यातून देवराईद्वारे पर्यावरण रक्षणाचे धडे घेती.
चांबळीच्या या देवराई प्रकल्पामध्ये सुमारे 20 एकर क्षेत्र ग्रामपंचायतीकडून तीन वर्षासाठी संबंधीत संस्थेकडे कराराने 2017 मध्ये घेण्यात आले. संपूर्ण क्षेत्राला तार कंपाउंड करुन.. सलग समतल चर पद्धतीने खोल चर खोदुन नैसर्गिक पद्धतीने देखील कंपाऊंड केले. मग आतील क्षेत्रात टप्प्या - टप्प्याने वृक्षारोपण करून त्याला ठिबक सिंचन संचाद्वारे पाण्याची व्यवस्था केली. देवराईची देखभाल करण्यासाठी रखवालदाराची नियुक्ती केली. सुमारे चार हजार झाडे या ठिकाणी लावण्यात आली. अशाप्रकारे छोटेखानी जणु जंगल निर्माण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी संस्थेने ग्रामपंचायतीच्या मदतीने तेथे केल्या. वृक्ष लागवड करताना स्थानिक आणि देशी जातीच्या झाडांना प्राधान्य दिले.
आज सुमारे तीन - चार वर्षानंतर तिथे आपल्याला लावलेली रोपे झाडे म्हणून आकार घेताना दिसत आहेत. गवत जागेवर कुजून त्याचे नैसर्गिक खतही मिळत आहे. गावातील लोकांनाही हे पाहून हुरूप आलेला आहे. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, तसेच विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी देवराई पाहण्यासाठी येत आहेत. गावातील शाळेतील मुले अनेक संस्थांचे स्वयंसेवक यांनीदेखील वृक्षारोपण करून या कामी आपले योगदान मागील तीन वर्षात दिलेले आहे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी पुण्यातील रमा पुरुषोत्तम फाऊंडेशनने निधी उपलब्ध करून दिला. हा प्रकल्प उभा करण्यासाठी रघुनाथ ढोले, पाणी पंचायतच्या विश्वस्त श्रीमती कल्पनाताई साळुंखे, कार्यकारी विश्वस्त डॉ. सोनाली शिंदे, श्रीपाद जोशी, निरंजन देशपांडे आणि अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे कार्यकर्ते प्रशांत बोरावके, चांबळीच्या तत्कालीन सरपंच शकुंतला कटके आणि नंतरचेही पदाधिकारी, गावकरी, कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष देवराई उभी करण्यामध्ये सहभाग दिला आहे.
"हा चांबळीचा देवराई प्रकल्प म्हणजे अनेक गावांच्या दृष्टीने एक पथदर्शी प्रकल्प ठरु शकणार आहे. ज्या गावांमध्ये अशा गावच्या गायरान, माळरानाच्या रिकाम्या जागा असतील, अशा ठिकाणी याच पद्धतीने देवराई आपल्याला पुनर्प्रस्थापित किंवा निर्माण करता येऊ शकतात. तर पुरंदरसारख्या कमी पावसाच्या क्षेत्रात देखील आपण देवराई निर्माण करू शकतो हे या प्रकल्पामुळे साध्य झाले आहे."
- डॉ. सोनाली शिंदे, कार्यकारी विश्वस्त, ग्राम गौरव प्रतिष्ठान.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.