पुणे : भरधाव मोटारचालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने आयटी अभियंता तरुण-तरुणी जागीच ठार झाले. ही घटना येरवडा परिसरातील कल्याणीनगर जंक्शनजवळ रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणात संशयित अल्पवयीन आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला काही अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला.
अनिष अवधिया (वय २४, रा. पाली, मध्य प्रदेश) आणि सहप्रवासी अश्विनी कोस्टा (वय २४, रा. जबलपूर, मध्यप्रदेश) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी संशयित अल्पवयीन मोटारचालकास (वय १७ वर्षे, आठ महिने) येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी अल्पवयीन मोटारचालक हा एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन अधिनियम कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अकीब रमजान मुल्ला (वय २४, रा. मथुरानगर, चंदननगर, मूळ रा. सोलापूर) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे संशयित अल्पवयीन आरोपी आणि त्याचे मित्र हॉटेलमध्ये पार्टी करून घरी निघाले होते. कल्याणीनगर येथील लॅन्डमार्क सोसायटीजवळ एअरपोर्ट रस्त्यावर आलिशान मोटारीने अनिष अवधियाच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. तसेच, इतर दोन वाहनांना धडक दिली.
मोटारीची धडक एवढी जोरात होती की, दुचाकीस्वार अनिष आणि त्याची मैत्रीण अश्विनी दूरवर फेकले गेले. त्यात दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या वेळी नागरिकांनी आलिशान मोटारचालकाला पकडून चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
अपघाताची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राहुल जगदाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेवरून शनिवारी रात्री दीड वाजल्यानंतरही उशिरापर्यंत पब, बार सुरू असल्याचे समोर आले आहे.
अल्पवयीन चालकाला जामीन मंजूर
भरधाव मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संशयित अल्पवयीन आरोपीला न्यायालयाने येरवडा वाहतूक विभागातील पोलिसांसोबत १५ दिवस काम करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणात संशयित अल्पवयीन आरोपीने अॅड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. त्यावर बाल न्याय मंडळात सुनावणी झाली. संशयित अल्पवयीन आरोपीविरोधात लावलेले कलम जामीनपात्र आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून तपास सुरू आहे. तो न्यायालयांच्या तारखेला हजर राहील; तसेच तपासास सहकार्य करेल, असा युक्तिवाद ॲड. पाटील यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज काही अटी-शर्तींवर मंजूर केला.
न्यायालयाने दिलेली शिक्षा
१५ दिवस वाहतूक नियोजनाचे काम
वाहतूक जागृतीबाबतचे फलक रंगविणे
अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा
दारूचे व्यसन सोडण्यासाठी डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत
मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेत अहवाल सादर करावा
या प्रकरणात पोलिसांनी संशयित मोटारचालक अल्पवयीन मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा (३०४अ) गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याच्या रक्तचाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. याप्रकरणी बाल न्याय कायद्यानुसार मोटार मालक आणि पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर
अश्रू पाहून उपस्थितांचे मन हेलावले
अनिष अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे संगणक अभियंता होते. अनिष हा कल्याणीनगरमधील जॉन्सन कंट्रोल्स आयटी कंपनीत नोकरीस होता, तर अश्विनीही त्याच कंपनीत नोकरीला होती. तिने काही दिवसांपूर्वी तेथील नोकरी सोडली होती. अश्विनीचे पालक सायंकाळी पुण्यात दाखल झाले. त्यांचे अश्रू पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.
पुण्यात रात्री दीड वाजल्यानंतरही पब, बार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले व्यसनांच्या आहारी जात असून अपघातांच्या घटना घडत आहेत. याबाबत पालकांनीही सजग राहण्याची गरज आहे. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.