UPSC Exam : ‘यूपीएससी’च्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह;पारदर्शकतेसाठी कठोर कारवाईची विद्यार्थ्यांची मागणी

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी ऐन उमेदीची वर्षे पणाला लावतात. त्यासाठी दिवसरात्र कठोर परिश्रम घेतात. पालकही पोटाला चिमटा देत त्यांच्या शिकवणीची आणि अभ्यासाची व्यवस्था करतात.
UPSC Exam
UPSC Exam sakal
Updated on

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी ऐन उमेदीची वर्षे पणाला लावतात. त्यासाठी दिवसरात्र कठोर परिश्रम घेतात. पालकही पोटाला चिमटा देत त्यांच्या शिकवणीची आणि अभ्यासाची व्यवस्था करतात. पूजा खेडकर प्रकरणानंतर मात्र विद्यार्थ्यांसह पालकही हवालदिल झाले आहेत. सनदी अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कार्यपद्धतीवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

देशभरात सुरु असलेल्या पेपरफुटीच्या, परीक्षा रद्द होण्याच्या प्रकारांनी विद्यार्थी त्रस्त आहेत. अशातच ‘यूपीएससी’सारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षेतही बनावट कागदपत्रांच्या आधारे होणारी निवड विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक आणि निराशाजनक ठरली आहे. ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्या पदाचा लाभ मिळणे अपेक्षित आहे, ते अशा प्रकारामुळे लाभापासून वंचित राहणार आहेत.

या प्रकरणाची केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी राज्यभरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.

बनावट कागदपत्रांमुळे निवड होऊ शकते ही बाबच माझ्यासाठी धक्कादायक आहे. ज्यांना खरोखर आरक्षणाचा लाभ मिळायला हवा आणि जे या पदांसाठी पात्र आहेत अशा उमेदवारांना बनावट दाखल्यांमुळे संधी गमवावी लागत आहे. आता विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न आहे...

- सुमीत उके, (नाव बदलले) उमेदवार

प्रामाणिकपणे अनेक वर्षे अभ्यास केल्यानंतरही पदरी अपयश येते. ‘यूपीएससी’ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत जागा खूप कमी आहेत. त्यामुळे एखाद्या प्रामाणिक विद्यार्थ्यांची जागा लबाडी करून कोणी बळकावत असेल तर हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळच आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

- आकाश पाटील, (नाव बदलले) उमेदवार

‘यूपीएससी’ परीक्षेत अशा प्रकारची प्रकरणे समोर येत असतील तर आम्ही चार-पाच वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर विश्वास कसा ठेवायचा? ‘यूपीएससी’साठी ‘एथिक्स’ या विषयाचाही अभ्यास करावा लागतो. ज्यामुळे नागरिकांच्या हिताचे आणि योग्य निर्णय घेता येतील. परंतु चुकीच्या पद्धतीने झालेले अधिकारी नागरिकांच्या भल्याचा कसा विचार करतील?

- आरती कांबळे, (नाव बदलले) उमेदवार

‘यूपीएससी’ ही परीक्षा पास होण्यासाठी संघर्ष करत असतो. या मुलांचा प्रशासनावरचा, आयोगावरचा विश्वास उडाला तर देशाची किंवा नागरिकांची सेवा करण्याच्या उद्देशाला तडा जाईल. कोणी खोटी कागदपत्रे वापरून उत्तीर्ण होत असेल तर नक्कीच त्याची त्या पदावर काम करण्याची योग्यता नसते. यामध्ये पात्र विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान आहे.

- सुयश कोल्हे, (नाव बदलले), उमेदवार

खोटी प्रमाणपत्रे सादर करून कोणी अधिकारी होत असेल तर कोणावर विश्वास ठेवावा की नाही? सरकारकडे माहिती असेल तर कठोर कारवाई करायला हवी. परत कोणी अशी चूक करणार नाही. केवळ केंद्रीय लोकसेवा आयोग नाही तर राज्य लोकसेवा आयोगानेही चौकशी करायला हवी. सध्याच्या अध्यक्षांनी जरी राजीनामा दिला असला तरी यातील बहुतेक प्रकरणे १०-१२ वर्षांपूर्वीची आहेत.

- सूरज जाधव, (नाव बदलले) उमेदवार

‘यूपीएससी’च्या अभ्यासासाठी मी तीन वर्षे दिल्लीत होतो. लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करत असतात, अशा प्रकरणांमुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. दिव्यांगांबरोबरच खेळाडूंची प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणावर काढली जातात. विशेष म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांची यात आघाडी आहे.

- सागर वैद्य, (नाव बदलले), उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.