Murlidhar Mohol : देशात एक हजार नवी विमाने येणार;केंद्रीय राज्‍यमंत्री मोहोळ यांची माहिती,‘पॅनासोनिक एव्हिऑनिक्‍स’ केंद्राचे उद्‌घाटन

देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्र वेगाने वाढत असून, आगामी पाच ते सात वर्षांत एक हजार नव्या विमानांची भर पडेल. त्यामुळे या क्षेत्रात मोठी संधी आहे, असे प्रतिपादन नागरी विमान वाहतूक व सहकार राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे केले.
Murlidhar Mohol
Murlidhar Moholsakal
Updated on

पुणे: देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्र वेगाने वाढत असून, आगामी पाच ते सात वर्षांत एक हजार नव्या विमानांची भर पडेल. त्यामुळे या क्षेत्रात मोठी संधी आहे, असे प्रतिपादन नागरी विमान वाहतूक व सहकार राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे केले. हिंजवडी येथील पॅनासोनिक एव्हिऑनिक्‍स कॉर्पोरेशनच्या नव्या सॉफ्टवेअर डिझाइन व विकास केंद्राचे उद्‌घाटन त्यांच्‍या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला पॅनासोनिक एव्हिऑनिक्‍स कॉर्पोरेशनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी केन सैन, पॅनासोनिक लाइफ सोल्‍यूशन्‍स इंडिया व साउथ एशियाचे अध्‍यक्ष व पॅनासोनिक एव्हिऑनिक्‍स इंडियाचे संचालक मनीष शर्मा आणि चीफ टेक्‍नॉलॉजी ऑफिसर सत्‍येन यादव उपस्थित होते. मोहोळ पुढे म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांपर्यंत देशात केवळ ४०० विमाने होती, आज ही संख्या ७३० वर गेली आहे. विमान प्रवाशांची संख्या सहा कोटींहून अधिक असून, आगामी काळात ही संख्या आणखी वेगाने वाढणार आहे.

प्रवाशांना आरामदायी, आनंददायी विमानप्रवासासाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. त्यात ‘पॅनासोनिक एव्हिऑनिक्‍स’सारखी कंपनी मोलाचे योगदान देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत आणि पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात प्रत्येक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यात नागरी विमान वाहतूक क्षेत्राचाही समावेश आहे. सरकारही या क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, विमानतळ, नवे विमानमार्ग यासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. गेल्या दहा वर्षांत विमानतळांची संख्याही १४९ वर गेली आहे. आगामी काळात १०० मार्गांवर ‘सी-प्लेन’ सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या पॅनासोनिकसारख्या कंपन्याचे योगदान महत्त्वाचे आहे.’’

पुणे शहरात कंपनीने देशातील पहिले जागतिक केंद्र उभारल्याने रोजगारनिर्मितीला आणि देशातून होणाऱ्या सॉफ्टवेअर निर्यातीलाही चालना मिळेल. त्यामुळे हे केंद्र महत्त्वाचे आहे, असेही मोहोळ यांनी नमूद केले. केन सैन म्‍हणाले, ‘‘ पॅनासोनिक एव्हिऑनिक्‍स प्रवाशांचा विमानप्रवासाचा अनुभव अधिकाधिक सुखकर करण्यासाठी त्यांना मनोरंजनाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करत आहे. त्यासाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि देखभाल सुविधा कंपनी देत आहे. सध्या ३०० पेक्षा अधिक विमानकंपन्या आमचे ग्राहक असून, त्यांनी इन-फ्लाइट एंगेजमेंट, सॅटेलाइट वाय-फाय कनेक्‍टीव्‍हीटी आणि डिजिटल सेवा वापरली आहे.’’

‘‘आज, भारत संपूर्ण जगाला आयटी सपोर्ट व सेवा देत आहे. त्यात पुण्याची भूमिका महत्त्वाची आहे. हे केंद्र भारतातील पहिले केंद्र आहे. सध्या या केंद्रात सध्या २०० हून अधिक कुशल अभियंते काम करत असून, आगामी काळात ही संख्या ४०० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. या केंद्रात इन-फ्लाइट एंगजेमेंट अँड कम्‍युनिकेशनसाठी नावीन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍सची निर्मिती करण्यात येणार असून, विविध बाजारपेठा व विमानकंपन्यांच्‍या गरजांची पूर्तता येथून केली जाईल. या केंद्राच्‍या विकासाला गती देण्‍यासाठी कंपनी राज्‍यातील, तसेच देशभरातील विद्यापीठांबरोबर सहयोग करत आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल’’, असे सत्‍येन यादव म्हणाले.

सुविधांचे निर्मिती केंद्र

‘पॅनासोनिक एव्हिऑनिक्‍स’ विमान प्रवासाचा अनुभव सुखकर करणाऱ्या विविध सुविधांची म्हणजे इन-फ्लाइट एंगेजमेंट अड कम्‍युनिकेशन (आयएफईसी) सिस्टिमची निर्मिती करते. यात सीटसमोरील मोठी स्क्रिन आणि त्यावर उत्कृष्ट दर्जाच्या वैविध्यपूर्ण कंटेटंचा अनुभव घेण्याची सुविधा, मनोरंजनासाठी विविध मोबाईल अॅपची उपलब्धता, विविध डिजिटल सोल्युशन्स, वायफाय कनेक्टिव्हिटी, कम्युनिकेशन सेवा अशा विविध सुविधांचा समावेश आहे. पुण्यातील या केंद्रात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नावीन्यपूर्ण सुविधांचे डिझाइन आणि संशोधन व विकास करण्यात येणार आहे. आधुनिक युगातील जेन झी ग्राहकांच्या विमानप्रवासातील अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाचे आहे. या सुविधांमुळे विमानप्रवासाच्या अनुभवामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.