पिंपरी - पाश्चात्त्य संगीताचा पगडा वाढत असताना भारतीय संगीत बाजूला पडते की काय, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. मात्र, संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना भारतीय संगीतामध्ये पाश्चात्त्य संगीताला टक्कर देण्याची क्षमता आहे, असे ठामपणे वाटते. मेहनत, चिकाटी, सातत्यपूर्ण रियाज या बळावर तरुणाईला शास्त्रीय आणि सुगम संगीतात उत्तम "करिअर' करणे शक्य आहे, हे या कलाकारांनी स्वतः सिद्ध केले आहे. आज (गुरुवार) जागतिक संगीत दिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
वर्षा तेंडुलकर (शास्त्रीय गायिका) : सध्याच्या बदलत्या युगात तरुणाईचा कल हा काही प्रमाणात पाश्चात्त्य संगीताकडे असला तरी अभिजात संगीत हाच आपला पाया आहे. त्यामुळे कालांतराने ही तरुणाई अभिजात संगीताकडेच वळणार आहे. त्याशिवाय, दुसरा पर्याय नाही. पाश्चात्त्य संगीत हे नशा आणणारे संगीत आहे. मात्र, भारतीय संगीतामुळे आपण आत्मिक शांततेकडे प्रवास करतो.
रोहिणी कुलकर्णी (कथक नृत्यांगना) : सध्या पाश्चात्त्य संगीताचा पगडा वाढत असला तरी तरुणाईमध्ये शास्त्रीय नृत्याविषयीची ओढ कमी झालेली नाही. आजही शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठी तरुण-तरुणी उत्सुक असल्याचे पाहण्यास मिळते. मध्यंतरी शास्त्रीय संगीताविषयीचा ओढा काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा शास्त्रीय नृत्य शिकण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे.
नंदीन सरीन (गायक, सुगम संगीत) : भारतीय संगीत पाश्चात्त्य संगीताला शंभर टक्के टक्कर देऊ शकते. मात्र, आधुनिक काळानुसार बदल केला पाहिजे. बंदिशी व ख्याल यांच्या रागांचा विस्तार अपेक्षित आहे. शास्त्रीय संगीतात संथ लयीऐवजी वेग वाढवावा. सुगम संगीत शिकणाऱ्या गायकांनाही खूप वाव आहे. यू ट्यूब चॅनेलद्वारे कलाकार स्वतःची स्वतंत्र ओळख करू शकतात.
संतोष साळवे (तबलावादक) : नव्या पिढीकडून शास्त्रीय संगीताचा वारसा जपला गेला पाहिजे. सध्याच्या पिढीचा "फ्युजन'कडे कल वाढला आहे. शास्त्रीय संगीतामागील शास्त्र टिकवून ठेवणे गरजेचे आहे. मेहनत व चिकाटीने काम केल्यास शास्त्रीय संगीतात उत्तम करिअर घडू शकते. शास्त्रीय संगीत, जुनी चित्रपट गीते, भजन वारंवार ऐकले जातात. त्यामुळे व्यक्तीला दिवसभराचा उत्साह येतो.
अनुजा बोरुडे (पखवाज वादक) : भारतीय संगीत शिकण्यासाठी जगभरातून लोक भारतात येतात. सध्या पाश्चात्त्य संगीताएवढा शास्त्रीय संगीताला देखील वाव आहे. ध्रुपदसारख्या अवघड गायकीकडे तरुणांचा ओढा वाढतो आहे. प्रत्येक क्षेत्रात सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. पखवाज वादनाचे क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. या क्षेत्रात देखील तरुणी पखवाज वादन शिकू लागल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.