पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुणे : राज्यातील महाविद्यालये सुरू केली जात नसल्याने या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) शहरातील अनेक महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी न खेळता त्वरित महाविद्यालये सुरू करा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
गेल्या महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून महाविद्यालये सुरू करण्याची चर्चा सुरू आहे. बैठका होत आहेत, पण निर्णय होत नाही. शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल करता येत नाहीत, त्यांचे प्रोजेक्ट रखडले आहेत, कॅम्पस प्लेसमेंटसाठीही अडचणी येत आहेत. त्यामुळे महाविद्यालये सुरू करणे गरजेचे आहे. दुकाने, मॉल, चित्रपट गृहे यासह सर्व गर्दीची ठिकाणे सुरू झाली, पण शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे केवळ आश्वासन देत आहेत, पण महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेत नाहीत, त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले, असे अभाविपचे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी सांगितले.
अभाविपतर्फे सर परशुराम महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, जेएसपीएम, व्हीआयटी, सिंहगड इन्स्टिट्यूट, एमएमसीसी अभियांत्रिकी महाविद्यालय या आठ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. सप महाविद्यालय येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. विद्यार्थ्यांना महाविद्यालये सुरू करावीत म्हणून आंदोलन करावी लागणे व त्यांना पोलिसांनी ताब्यात घेणे ही वाईट परिस्थिती या सरकारमुळे ओढवली आहे, अशी टीका भुतकर यांनी केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.