पुणे : शहरात एकीकडे एके 47 बंदुकीतुन झाडलेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास लागत नसतानाच शुक्रवारी जनता वसाहतीमध्ये एका दिव्यांग महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली. महिलेचा आराडाओरडा ऐकून स्थानिक नागरीकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर दत्तवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून महिलेची सुटका केली आणि हे कृत्य करणाऱ्या चौघांना अटक केली. (Pune News)
श्रीकांत सुरेश सरोदे (वय 36), आदित्य ऊर्फ मन्या सुरेश पवार (वय 19), दुर्वेश ऊर्फ पप्पू संतोष जाधव (वय 36), आशिष ऊर्फ विजय (रड्या ) राकेश मोहिते (वय 18, सर्व रा. गल्ली क्रमांक 8, जयभवानी नगर,जनता वसाहत पर्वती) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार अमोल झणझणे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जनता वसाहतीमधील एका बंद घरातुन महिलेचा मोठ्या प्रमाणात आरडाओरडा येत असून महिलेस पोलिसांच्या मदतीची गरज असल्याची खबर मिळाली.
त्यानंतर नियंत्रण कक्षातुन तत्काळ दत्तवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर दत्तवाडी पोलिस ठाण्याचे बीट मार्शल, तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी तत्काळ जनता वसाहतीमध्ये दाखल झाले. जनता वसाहतीचा संपुर्ण परिसर पोलिसांनी पिंजुन काढला. त्यावेळी जनता वसाहतीमधील जयभवानी नगर येथील गल्ली क्रमांक आठमधील पर्वती टेकडीकडे जाणाऱ्या डोंगराच्या बाजुकडील एका घराजवळ लोकांची गर्दी दिसली. पोलिसांनी गर्दी हटविली, त्यावेळी पोलिसांनाही तेथून एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा चौघे आरोपी पळून जाण्याच्या तयारी होते. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. त्यावेळी चौघांनी संबंधीत महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. संबंधीत महिला प्रचंड घाबरलेली असल्याने आणि बोलण्याच्याही मनस्थितीत नसल्याने तिला नागरीकांच्या मदतीने वैद्यकीय उपचारांसाठी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पिडीत महिला दिव्यांग
आरोपींनी पिडीत महिलेस स्वारगेट येथून उचलून नेले. त्यानंतर त्यांनी महिलेवर सामुहिक अत्याचार केला. दरम्यान, हि घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यावेळी संबंधीत महिला दिव्यांग असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने खुन, खुनाचे प्रयत्न, जबरी चोऱ्या, घरफोड्यांपासून ते गंभीर गुन्हे घडत आहेत. तडीपारची कारवाई केलेले गुन्हेगार कोयता, पिस्तुलसारखी हत्यारे बाळगून सर्रासपणे फिरत आहेत. अल्पवयीन गुन्हेगारांकडून सातत्याने गंभीर गुन्हे केले जात आहेत. असे असतानाही पोलिसांकडून मात्र गुन्हेगारांवर वचक नसल्याची सद्यस्थिती आहे. विशेषतः दिव्यांग महिलेस टोळक्याकडून उचलून नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कारासारखी गंभीर घटना घडतानाही पोलिसांना भणक लागत नाही. नागरीक व पोलिस नियंत्रण कक्षाच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
आरोपी श्रीकांत सरोदे सराईत गुन्हेगार
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी श्रीकांत सरोदे हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा,जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.