कोळवण (पुणे) : शेती विकायची नसते...ती राखायची असते, असा संदेश आपल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटातून देणारे अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी हाच संदेश थेट कृतीतून दिला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या मुळशी तालुक्यातील शेतात कुटुंबिय व मुळशी पॅटर्न चित्रपटाच्या टिमसह भात लागवड केली.
मुळशी तालुक्यातील अत्यंत सर्वसामान्य वारकरी परंपरा असलेल्या शेतकरी कुटुंबात प्रविण तरडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल बजाज ऑटोमध्ये मध्ये नोकरीला होते. प्रवीण यांना दोन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. ते सर्व उच्चशिक्षित आहेत. प्रवीण तरडे यांच्यावर शेती व वारकरी परंपरेचा प्रभाव आहे. त्यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे. त्यांची मुळशी तालुक्यातील जातेडे या गावात शेती आहे. त्यांचे वडिल विठ्ठल तरडे हे दरवर्षी पंढरपूरच्या पायी वारीला जाता. यंदा कोरोनामुळे वारी नाही आणि शेतात काम करायला मजूरही मिळत नाही. त्यामुळे प्रवीण तरडे हे वडील विठ्ठल, आई रुक्मिणी, पत्नी व हंबिरराव चित्रपटाच्या नायिका स्नेहल, बंधू योगेश, वहिनी सुवर्णा, तसेच त्यांच्या मुळशी पॅटर्न चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर यांच्यासह भाताच्या लावणीसाठी शेतात उतरले.
या वेळी प्रवीण तरडे यांनी वडिल विठ्ठल तरडे यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे आपल्या चाहत्यांशी संवादही साधला. ते म्हणाले की, मजूर मिळत नाहीत. त्यामुळे मी आपल्या कुटुंबियांसोबत शेतात भात लावणी करायला आलो आहे. तसेच, कोरोनामुळे यंदा वारी झाली नाही. त्यामुळे आई, वडील शेतात राबत आहेत. अन्यथा ते शेतातील कामं आटोपून वारीला निघालेले असतात.
शहरात कामासाठी गेलेल्या प्रत्येकाने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपावे. तसेच, त्यांनी लॉकडाउनच्या काळात शेतकरी ज्या पद्धतीने कष्ट करतो आहे, त्याला यावेळी सलाम केला. मराठीतील भव्यदिव्य असा ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
मुळशी पॅटर्न या चित्रपटामुळे प्रविण विठ्ठल तरडे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचले. त्याचबरोबर मुळशी तालुकाही. एकेकाळी पहिलवानांचा तालुका अशी ओळख असलेला मुळशी तालुका गुंडगिरीमुळे बदनाम झाला. धरणग्रस्तांसाठी देशातील सर्वात पहिला लढा दिलेला हा तालुका वेगळ्याच वाटेला लागला होता. त्यातून एक पिढी बरबाद झाली. ज्या तालुक्यातील घरोघरी कोण किती जोर- बैठका मारतय, याच्या पैजा लागायच्या, तिथे कोणी किती जणांची गेम वाजवली, याच्या चर्चा रंगू लागल्या. टोळीयुद्धातून एेन तारुण्यात अनेकांचे मुडदे पडले.
मुळशी तालुक्याचे हे वास्तव प्रविण तरडे यांनी आपल्या मुळशी पॅटर्न चित्रपटातून मांडले. भाईगिरीचा शेवट किती खतरनाक असतो व त्यातून काहीही साध्य होत नाही. तसेच, आपली शेती ही काळी आई आहे. तिला विकायची नाही, तर राखायची आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी या चित्रपटातून केला. अत्यंत वास्तवादी वाटावे, असे कथानक त्यांनी मांडले. त्यातून फक्त मुळशी तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातील तरुणाईला वास्तवाचे भान आले. चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलेला तरुण बाहेर पडताना अंतर्मुख झालेला दिसायचा.
या चित्रपटानंतर महाराष्ट्रभर प्रविण विठ्ठल तरडे या नावाचे गारुड निर्माण झाले. कुंकू, पिंजरा, दिल्या घरी तू सुखी रहा..., तुझं माझं जमेना, अग्निहोत्र, दुर्वा, अनुपमा, मेंदीच्या पानावर.. या मालिका; किंवा कुटुंब, अजिंक्य, रेगे, पितृऋण या चित्रपटांच्या यशातही प्रवीण तरडे यांचा सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे मुळशी तालुक्याची त्यांची नाळ एवढी जोडली आहे की, ते आपल्या प्रत्येक चित्रपटात किंवा मालिकेत मुळशी तालुक्याचा किमान ओझरता उल्लेख तरी करतात. आताही त्यांनी भात लागवड करून आपली येथील मातीशी नाळ जोडली गेली असल्याचे पुन्हा दाखवून दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.