Ad. Rohini Khadse : पडत्या काळात साथ देणाऱ्या शरद पवार यांना सोडून जाणे मला पटत नाही

'मी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेला मानते. आमच्यासाठी त्यांची विचारधारा महत्त्वाची आहे.
Ad. Rohini Khadse
Ad. Rohini Khadsesakal
Updated on

पुणे - 'मी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेला मानते. आमच्यासाठी त्यांची विचारधारा महत्त्वाची आहे. शरद पवार यांनी मागील साडे तीन वर्षात आम्हाला खूप मोठी साथ दिली आहे. म्हणूनच पवार यांना सोडून जाणे माझ्या मनाला पटत नाही, त्यामुळे मी याच पक्षात थांबले आहे.

पक्षात यापुढेही जोमाने काम करून उमेदवार निवडून आणणार आहे.' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी सोमवारी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली.

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार निश्‍चितीसाठी सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी बैठक घेण्यात आली. पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी खडसे उपस्थित होत्या.

रावेरच्या उमेदवारीबाबत खडसे म्हणाल्या, 'रावेर लोकसभा मतदारसंघासाठी पक्षातील इच्छुक उमेदवारांसमवेत पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्षांनी चर्चा केली आहे. रवींद्र पाटील, संतोष चौधरी व श्रीराम पाटील यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे. मंगळवारी उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल. आमचे तीन उमेदवार आग्रही आहेत. तिघांपैकी कोण उमेदवार असेल, हे मंगळवारी समजेल.'

भाजपच्या वाटेवर असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ॲड. खडसे म्हणाल्या, 'एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला, हे सांगण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका मांडलेली आहे.

मला भाजपची विचारधारा आवडत नाही म्हणून नव्हे, तर मी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेला मानते. म्हणून मी पक्ष सोडलेला नाही. पवार यांनी मागील साडे तीन वर्षात आम्हाला खूप मोठी साथ दिली आहे. आमच्यासाठी त्यांची विचारधारा महत्त्वाची आहे. पवार यांना सोडून जाणे मला पटत नाही.'

'अनेक वर्ष खडसे साहेबांसोबत काम करत आले आहे. त्यांच्या निर्णयामुळे वडील व माझे राजकारणातील आदर्श म्हणून आज एकटे पडल्यासारखे वाटत आहे. पण माझ्या मतदारसंघातील जनता, नेते माझ्यासोबत आहेत. मी अनेक वर्ष राजकारणात आहे, त्यामुळे कोणत्या पक्षात थांबायचे, याबाबत निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात आहे. कुठे काम करावे आणि कुठे काम करू नये, याबाबत मला कळते.' असेही खडसे यांनी सांगितले.

दिवसभर चर्चा, रावेरचा उमेदवार काही ठरेना!

रावेर लोकसभा मतदार संघात कोण उमेदवार असणार, याविषयी मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. सोमवारी पुण्यात शरद पवार, जयंत पाटील हे इच्छुक उमेदवारांसमवेत चर्चा करणार असल्याने दिवसभर त्यावरुन तर्कवितर्क लढविले जात होते. रात्रीपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र दिवसभर चर्चा होऊनही उमेदवाराचे नाव निश्‍चित झाले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. आता मंगळवारी (ता.९) उमेदवाराच्या नावाची घोषणा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.