मांजरी : फक्त एकदीड किलोमीटरच्या कामाला लोटलेला तब्बल चार वर्षाहून अधिक काळ, त्यातही ते अपूर्णच, महिनोंमहिने वाहतूक सुरक्षेशिवाय रखडून ठेवलेले काम, त्यामुळे होणारे छोटेमोठे अपघात आणि प्रवाशांसह स्थानिकांना सहन करावा लागत असलेला त्रास, यामुळे येथील नागरिक व प्रवाशांच्या मनात प्रचंड चिड निर्माण झाली आहे.
पीएमआरडीए प्रशासनाने आता ठेकेदाराचे लाड बंद करून रेल्वे उड्डाणपूल ते मुळामुठा नदीपर्यंतच्या रस्त्याच्या रूंदीकरणासह काँक्रीटीकरणचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी त्यांच्याकडून होत आहे.
येथील रेल्वे उड्डाणपूल ते स्मशानभूमी या अंतरातील रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रीटीकरण गेली चार वर्षांपासून रेंगाळत सुरू आहे. ठेकेदाराने ठीकठिकाणी अर्धवट काम केले आहे. विविध ठिकाणी रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे साहित्य पडून ठेवले आहे.
बेल्हेकर वस्ती, गावठाण परिसरात ठिकठिकाणी रस्ता उकरून ठेवला आहे. संपूर्ण रस्त्यावर कोठेही वाहनचालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेलेली नाही. पर्यायी मार्गही उखडून ठेवला आहे. येथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. स्मशानभूमीच्या वळणावर काही महिन्यांपासून रस्त्याच्या कामाला उरक नसल्याने या ठिकाणी वारंवार छोटेमोठे अपघात होत आहेत.
"आगोदरच रेल्वे उड्डाणपूलाच्या कामामुळे गेली पाच वर्षांपासून प्रवासात मोठ्या अडथळ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्गही दूररून असून सुरक्षीतही नाहीत. मुख्य रस्ताही दुचाकीवरून किंवा पायी प्रवास करायला तो ठिकठिकाणी खोदून ठेवल्याने धोकादायक आहे. पीएमआरडीए व महापालिका प्रशासन याकडे मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष करीत आहे. आम्ही आजून किती दिवस जीव धोक्यात घालून प्रवास करायचा,' असा संतप्त सवाल प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केला आहे.
निकृष्ट दर्जाचे काम
कोट्यावधी रूपये खर्चून होत असलेला हा रस्ता व त्या संबधीत सर्व कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. ठेकेदार मनमानी पध्दतीने काम करीत आहे. काय काम केले जाते, ते कधी सुरू होते, कधी बंद होते, त्याची गुणवत्ता काय आहे, याकडे पीएमआरडीएकडून संपूर्ण दुर्लक्ष होत आहे.
कामाचा कालावधी अनेकदा संपून पुन्हा मुदत वाढवली जात आहे. पीएमआरडीएचे अधिकारी व ठेकेदाराचा समन्वय नसल्याने कामाची गुणवत्ता ढासळली आहे. पदपथ, ड्रेनेज, त्याचे चेंबर, दुभाजक ठिकठिकाणी तुटले आहेत. कोणतेही काम सलग होत नसल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थी, कामागारांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
रस्त्याचे काम सलग सुरू नसल्याने तो वेगवेगळ्या अंतरावर खोदून ठेवला आहे. ज्या ठिकाणी काँक्रीटीकरण झाले आहे, त्याच्या सुरूवातीला व शेवटी आडवे खड्डे आहेत. काही ठिकाणी चेंबर खचले आहेत. विद्यूत खांब, डीपी अद्याप रस्त्यातच आहेत. पदपथ सलग नाहीत. दुभाजक तुटून रस्त्यावर पडले आहेत. या सर्व ठिकाणाहून दुचाकीचालक व पादचाऱ्यांना कसरत करीत व जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामध्ये विद्यार्थी व कामगारांचे प्रमाण मोठे आहे.
"महापारेषणचे खांब, डीपी बॉक्स स्थलांतरीत झालेले नसल्याने तसेच ठेकेदाराकडून काम थांबविले जात असल्याने काम रखडले होते. त्याबाबत संबंधित ठेकेदाराला दंडही करण्यात आला आहे. यापुढेही काम थांबविल्यास ठेकेदाराला कारवाईची सूचना दिली आहे. सध्या काम सुरू करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी ठेकेदाराला सूचना करण्यात आलेल्या आहेत.
- विजय कांडगावे कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.