९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार

pune
pune
Updated on

किवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून चित्रे काढण्यास सुरुवात केली. आणि उतारवयातही ते पट्टीचे चित्रकार झाले. ९० व्या वर्षापर्यंत एकाहून एक सरस चित्रकृती त्यांच्या कुंचल्यातून साकारल्या आहेत. वडिलांच्या अनोख्या कलाकृतीसाठी मुलगी गीता बालगंगाधरण यांनी राहत्या घराच्या टेरेसचे रूपांतर आर्ट ऑफ गॅलरीत केले असून त्यास कलाप्रेमी आवर्जून भेट देत आहेत.

आपल्या प्रतिभा शक्तीमुळे वयाच्या ७८ व्या वर्षी दामोदरन हे चित्रकला शिकले. मूळचे केरळचे असलेले दामोदरन केंद्रीय आयुध भांडारातील (सीओडी) नोकरीच्या निमित्ताने देहूरोड येथे स्थलांतरित झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. १९८२ साली ते सीओडीतील लेखा विभागातून सेवानिवृत्त झाले.

२००१ साली बेळगावमधील केंद्रीय विद्यालयात गीता बालगंगाधरण मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या. मुलगी आणि पत्नीसह दामोदरन हे बेळगावला आले. २००२ मध्ये समता कुलकर्णी यांनी शिक्षक पदासाठी केंद्रीय विद्यालयात अर्ज केला. यानिमित्ताने ओळख झाल्याने मुलीसोबत दामोदरन समता यांच्या घरी त्यांच्या चित्रकृती पाहण्यासाठी गेले. समता यांच्या चित्रकृती पाहून दामोदरन अवाक झाले. ७८ वर्षाच्या दामोदरन यांनी प्रेरणा घेत चित्रकृती निर्माण करण्याचा ध्यास घेतला.शालेय जीवनात चित्रकलेच्या तासाला पेन्सिल धरलेला हात कुंचल्याकडे वळला. रोज तीन तास साधना, कलाशिक्षिका समता यांचे मार्गदर्शन यामुळे दामोदरन अवघ्या दोन वर्षात पट्टीचे चित्रकार बनले. आज विविध विषयांवरील दर्जेदार अशा शंभराहून अधिक चित्रकृती त्यांनी तेलरंगातून साकारल्या आहेत.

दरम्यानच्या काळात बेळगावच्या कन्नड साहित्य भवनात दामोदरन यांच्या चित्रकृती प्रदर्शनाने चांगलीच गर्दी खेचली होती. एक वृद्ध इतक्या पराकोटीची कला साधना करू हे पाहून अनेकांना थक्क व्हायला झाल. कन्नड लेखक व चित्रकार चंद्रकांत कुसनूर यांनी प्रदर्शनाचे उदघाटन केले होते.  दामोदरन यांनी बर्ड (पक्षी), लँडस्केप (सिनरी), पोर्ट्रेट (हुबेहूब फोटो), महापुरुष, गीता उपदेश, श्रीकृष्ण अर्जुन उपदेश अन्य देवदेवता आदी चित्रे आपल्या कुंचल्यातून साकारली आहेत.

घराच्या टेरेसचे आर्ट ऑफ गॅलरीत रूपांतर :
सी के दामोदरन हे मामुर्डी शितळानगर भागात वास्तव्यास आहेत. पत्नी, मुलगी, जावई असे एकत्रित सर्वजण राहतात. कन्या गीता यांनी वडिलांची कला जतन करण्याच्या उद्देशाने स्वखर्चातून घराच्या टेरेसचे आर्ट ऑफ गॅलरीत रूपांतर केले आहे. दामोदरन सध्या ९४ वर्षाचे आहेत. नजर कमी झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यांनी आता चित्रे साकारणे थांबवले आहे. गॅलरीला कलाप्रेमी आवर्जून भेट देतात. मार्केटमध्ये अनेक चित्रांना मागणी होती. पण आम्ही न विकता गॅलरीला प्राधान्य दिले. वडील चित्रे काढत असताना चित्राच्या आकारानुसार वेळ लागत असे. एकावेळी अनेक चित्रे काढत असताना काही चित्रांना एक महिन्याचाही अवधी लागत होता. असे बालगंगाधरण यांनी सकाळशी बोलताना सांगितले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.