पुणे - स्वमग्न (ऑटिझम) मुलांमध्ये नीट ऐकू न येणे, भावनांचा गोंधळ उडणे या व अशा अन्य समस्या आढळतात. या मुलांमधील आरोग्य घटक, चेहऱ्यावरील हावभाव व मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून अशा समस्या अचूक ओळखणारी ‘सेन्सर प्रोसेसिंग डिसऑर्डर’ ही खास संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) पुण्यातील संशोधक डॉ. सुरुची देडगावकर यांनी तयार केली आहे. अचूक निदान होऊन मुलांना लवकरात लवकर या विकारातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल.
देडगांवकर यांनी केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनावरील शोधनिबंध अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर त्यांना भारतासह दक्षिण आफ्रिकेचेही पेटंट मिळाले आहे. स्वमग्न मुलांकडून ऐकणे, आवाजाचा गोंधळ उडणे, कोणीतीही घटना बघितल्यानंतर त्यानुसार कृती करण्यासाठी असमर्थता दर्शविली जाते. या समस्येवर तत्काळ उपचार होणे आवश्यक असते.
यासाठी पालकांना अनेकदा वैद्यकीय तज्ज्ञांकडे जाऊन मोठ्या प्रश्नावलीला सामोरे जावे लागते. ही प्रश्नावली पूर्णपणे पालकांच्या निरीक्षणावर अवलंबून असल्याने पालकांसाठी ही प्रक्रिया मानसिकदृष्ट्या अवघड ठरते.
पालकांची ही नाजूक स्थिती समजून घेत ‘व्हीआयआयटी’तील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुरुची देडगावकर यांनी त्यावर सप्टेंबर २०१७ मध्ये संशोधन सुरू केले. डॉ. देडगावकर यांनी लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी येथील संचालक डॉ. रजनीशकौर सचदेव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डिझाईन ॲन ॲनॅलिसिस ऑफ अ सपोर्ट सिस्टीम बेस्ड ऑन सेन्सरी पॅरामीटरर्स फॉर ऑटिस्टीक पीपल’ या विषयावर संशोधन सुरू केले.
असा केला अभ्यास
डॉ. देडगांवकर यांनी मुलांची निरीक्षणे नोंदविण्याबरोबरच त्यासंबंधीची दहा हजारांहून अधिक रेकॉर्डस्चा अभ्यास केला. या विषयातील तज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांच्याशी चर्चा केली. स्वमग्न मुलांचे आरोग्य घटक, चेहऱ्यावरील हावभाव, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे अल्गोरीदम, मशिन लर्निंग तंत्रज्ञान वापरून ‘सेन्सर प्रोसेसिंग डिसऑर्डर’ हे सॉफ्टवेअर तयार केले.
प्रत्यक्ष वापर केल्यानंतर त्याद्वारे ९७ टक्के अचूक निदान होत असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. देडगांवकर यांचे संशोधन इंटरनॅशनल स्कोप्स जर्नल पेपर्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स पेपर्स, भारतीय कॉपीराइट, डेटासेट अशा नामांकित नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
असा होईल फायदा
मुलांचे निरीक्षण करण्याची गरज नाही
या प्रणालीमुळे अचूक निदान होणार
पालकांचा ताणतणावही कमी होणार
उपचारांच्या खर्चातही बचत
मुलांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत
आपल्या देशात स्वमग्नतेविषयी अजूनही पुरेशी माहिती नाही. विकाराचे निदान झाल्यानंतर मुलांना उपचारासाठी तत्काळ संधी मिळू शकते. या प्रणालीचा उपयोग स्वमग्न मुले, त्यांच्या पालकांना होईलच, त्याशिवाय डॉक्टर, अभ्यासक व संशोधकांनाही नक्कीच फायदा होईल.
- डॉ. सुरुची देडगावकर, संशोधक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.