कात्रज : समाज म्हणून एकत्र येऊन एका ध्येयाने एखादी गोष्ट पुढे घेऊन जाणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मत गायक अतुल गोगावले यांनी व्यक्त केले. फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला गायक अजय आणि अतुल गोगावले प्रमुख पाहुणे म्हणून आले असता ते बोलत होते. फिरोदिया करंडकाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. याप्रसंगी अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, एचसीएल फाउंडेशनच्या सिमी सूरी, गणेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी यंदाच्या फिरोदिया करंडक स्पर्धेत विविध विभागात पारितोषिके पटकावलेल्या विद्यार्थ्यांना अजय-अतुल यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
अजय-अतुल यांनी थेट प्रश्नांना उत्तरे दिली. विद्यार्थ्यांचे आजचे प्रदर्शन पाहून आमच्याकडून काही देण्यापेक्षा तुमच्याकडून काहीतरी घेऊन जात आहे. कमीत कमी गोष्टीच्या माध्यमातून सांभाळलेल्या तांत्रिक बाबी अफलातून असल्याचे अतुलने म्हटले. तर, अजयने जुन्या आठवणींना उजाळा देताना एकदा फिरोदिया करंडकमध्ये काम केले. पण, त्यावेळी आमची निवड झाली नव्हती. १९९६ ते आजपर्यंतचा काळ हा मोठा आहे. या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून यायला २८ वर्षे लागल्याचेही त्याने म्हटले.
करंडकाचे यंदापासून स्वरूप बदलण्यात आले असून तो आता फिरता करंडक असणार आहे. त्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना या स्पर्धेचे मुख्य संयोजक सूर्यकांत कुलकर्णी यांनी पन्नास वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, अजय-अतुल हे पुढील काळात नक्की ऑस्कर मिळवतील असा विश्वास अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केला.
मागील पन्नास वर्षात फिरोदिया करंडकासाठी काम करत राहिलेल्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. पन्नास वर्षांच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर, दिग्दर्शक सतीश देशमुख, अभिनेत्री अनुजा साठे, परीक्षक पौर्णिमा मनोहर यांच्यासह तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या हर्षवर्धन पाठक, प्रशांत कांबळे, रवी पाटील, चेतन रायकर, वैखरी कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल सोलापूरकर यांनी केले.
टाळ्या शिट्ट्या आणि जल्लोष
अजयकडे गाणे गाण्याची इच्छा व्यक्त करताच टाळ्या आणि शिट्ट्यानी सभागृह दणाणून गेले. विद्यार्थ्यांचा जल्लोष पाहून अजयने रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या हे गाणे गायले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.