एकमेकांना गद्दार म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का? कुणी कसंही माणसं फोडतंय. लोकशाहीचा पार खेळखंडोबा झालाय. आणि म्हणतात सर्वसामान्यांचं सरकार आहे; माणसं सभेला आपणहून आली होती. अरे आपणहून आलेली माणसं मग उठून का गेली? अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदेसरकारचा समाचार घेतला. तसेच 'हे पांढरे कपडे घालून आले, गाडीतून उतरले, पायऱ्या चढले, आता वर आले असं काय काय सांगून दसऱ्यादिवशी नको नको केलं. महागाई, बेरोजगारीवर कुणी बोलायला तयार नाही अशा शब्दात माध्यमांनाही फटकारले.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 61 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते.
दोन लाख तरूणांना रोजगार देऊ शकणारा वेदांता का गेला, कांदा उत्पादकांच्या व्यथा, केंद्राचा साखर कोटा बंद करू याबाबत कुणी बोलायला तयार नाही. कुणीही काहीही करतंय. स्थिरता नसल्याने अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत चाललीय. कोण कीती दिवस खुर्चीवर बसेल हेच त्यांना कळेना. माझ्या आजच्या सभेला शेवटचा माणूस सुध्दा उठला नाही कारण मी गद्दारी करून इथं बसलो नाही, अशी पवार यांनी शालजोडीतून लगावली. याप्रसंगी आमदार संजय जगताप, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी आभार मानले.
केंद्राची उत्तरप्रदेशावर मेहेरनजर
केंद्रसरकार उत्तरप्रदेशाला डोळ्यापुढे ठेवून साखर निर्यातीचा कोटा कारखान्यांना ठरवून देत आहे. युपीला बंदर जवळ नसल्याने निर्यात न करता कोटा विकतात. त्याचा महाराष्ट्राला टनाला शे-दोनशे रूपये प्रतिटनाचा फटका बसतो, असा स्पष्ट आरोप अजित पवार यांनी केला. मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अतुल सावेंना सांगितलं दिल्लीत जाऊन अमित शहा, पियुष गोयल यांना बोला. गेल्यावर्षीप्रमाणेच कारखान्यांना आपापल्या पध्दतीने निर्य़ात करण्याची परवानगी द्या. महाराष्ट्राचे वर्चस्व असलेली साखरेची कलकत्ता बाजारपेठ युपीने काबीज केलीय आपल्याला लोकल मार्केट उरलेय. त्यामुळे कोटा पध्दतीचे धोरण आजिबात नको अन्यथा राज्याचा साखर उद्योग धोक्यात येईल, अशी भूमिका मांडली.
शिंदे सरकारने आमच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिल्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत. असा भेदभाव कधी होत नव्हता. उद्या सत्ताबदल झाल्यावर तुम्हालाही त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. तसेच आमचं सरकार असताना कधी वाटलं नाही एकनाथरावांना मुख्यमंत्री व्हायचंय. नाहीतर उध्दवजींना सांगितलं असतं आता शिंदेंना करू. पण कधी निघून गेले कळलंच नाही, अशी खिल्लीही उडविली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.