शिरुर- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज खासदार अमोल कोल्हे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. शरद पवार उत्तर पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पवारांनी आज अमोल कोल्हेंच्या नारायणगावमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात ही अनेकांच्या भुवया उंचावणारी गोष्ट ठरली.
अतुल बेनके हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम केलं ते आमचे. ज्यांनी आमच्यासाठी काम केलं ते आमचे होतील. त्यांच्या हिताची जपवणूक करण्याची जबाबदारी आमची असेल, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
आम्ही लोकसभेला १० जागा लढल्या, त्यातील ८ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे स्ट्राईक रेटनुसार आम्ही एक क्रमांकाचा पक्ष आहोत, असं देखील ते म्हणाले. शरद पवार आज जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी शरद पवार आले असताना अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके देखील आले होते. बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या उड्या आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाला पिंपरी चिंडवडमध्ये मोठे खिंडार पडले आहे. गव्हाणे यांच्यासह २४ पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी तुतारी हाती घेतली आहे. शरद पवारांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश झाला. विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या तोंडासमोर ठेवून राजकीय लाभासाठी राजकीय लोकांच्या उड्या आपल्याला येत्या काळात आणखी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.