बारामती : राज्यातील शेतमाल व फळांचे काढणीपश्चात होणारे नुकसान टाळून निर्यातीस चालना मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या हाताळणी सुविधा केंद्राचे भूमीपूजन, बाजार समितीच्या वजनकाट्याचे उदघाटन शनिवारी (ता. 28) पवार यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. पणनमंत्री बाळासाहेब पाटील, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पणन संचालक सतीश सोनी, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, प्रकल्प संचालक (मॅग्नेट प्रकल्प) दीपक शिंदे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत गावडे, सचिव अरविंद जगताप आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, शेतक-याच्या शेतापासून ते ग्राहकांच्या दारापर्यंत शेतमाल किंवा फळे जाईपर्यंत 60 टक्के नुकसान होते, काढणीपश्चात नुकसान प्रचंड असून ते टाळल्यास निर्यातीला चालना मिळेल व बाजारभावही चांगले मिळू शकतील. नुकसानीच्या दुष्टचक्रातून शेतक-याला बाहेर काढण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. यात 70 टक्के निधी आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरुपात उभारला जाणार असून 30 टक्के निधी राज्य शासन देणार आहे. उच्च मूल्य देणा-या बाजारपेठेत माल पाठविण्यातील अडचणी यातून दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे.
दरम्यान जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचा माल जावा व त्याला उत्तम मूल्य मिळावे, असा या योजनेचा हेतू असल्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नमूद केले. बारामतीत याचा पहिला प्रकल्प सुरु होत असून पंचक्रोशीतील शेतक-यांना याचा उपयोग होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी अनुपकुमार यांनीही शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला, सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले.
बारामतीच्या प्रकल्पाचे स्वरुप
• 700 मेट्रीक टन क्षमतेचे शीतगृह
• 30 मेट्रीक टन क्षमतेचे प्रशीतकरण केंद्र
• 12335 चौ.फूटांचे संकलन व प्रतवारी केंद्र
• 6921 चौ. फूटांचे डाळींब प्रक्रीया केंद्र
• दोन मेट्रीक टन प्रति तास क्षमतेची द्राक्ष, केळी व डाळींब हाताळणी यंत्रणा
• 25 मेट्रीक टन क्षमतेचे फ्रोजन फ्रूट स्टोअर
• 5 मेट्रीक टन प्रति बँच क्षमतेचा ब्लास्ट फ्रीजर.
• वजन मापन व तात्पुरता साठवणूक कक्ष, पॅकींग मटेरीयल साठवणूक कक्ष
• प्रयोगशाळा व माल आवक जावक स्वतंत्र विभाग.
बारामतीच्या प्रकल्पाचा उद्देश
• डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरु, चिकू, स्ट्रॉबेरी, भेडी व मिरची तसेच फुले पिकांच्या मूल्य साखळीमध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करुन शेतकरी उत्पन्न वाढविणे.
• फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व साठवणूक क्षमता वाढविणे
• मालाची मूल्यवृध्दी करणे व अन्नवितरण व्यवस्था कार्यक्षम करणे.
• शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढविणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.