Ajit Pawar : एकत्र येण्याबाबत केवळ माध्यमांतच चर्चा;खासदार शरद पवार यांच्यासोबत जाण्याबाबत अजित पवार यांचे स्पष्टीकरण

विकासाचा मुद्दा घेऊन महायुतीमध्ये आम्‍ही सहभागी झालेलो आहे. नागरिकांच्‍या हिताची कामे करायची आहेत. त्‍यामुळे साहेबांसोबत (खासदार शरद पवार) एकत्र येण्याबाबतच्‍या चर्चा केवळ प्रसिद्धी माध्यमांमध्येच आहेत,’’
Ajit Pawar
Ajit Pawar sakal
Updated on

पिंपरी : ‘‘विकासाचा मुद्दा घेऊन महायुतीमध्ये आम्‍ही सहभागी झालेलो आहे. नागरिकांच्‍या हिताची कामे करायची आहेत. त्‍यामुळे साहेबांसोबत (खासदार शरद पवार) एकत्र येण्याबाबतच्‍या चर्चा केवळ प्रसिद्धी माध्यमांमध्येच आहेत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यासाठी अजित पवार रविवारी काळेवाडीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जाण्याबाबतचा मुद्दा खोडून काढला. ते म्‍हणाले, ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र बसून जागा निश्‍चिती करू.’’ पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. विधानपरिषद निवडणुकीलाही माझे आठ आमदार फुटतील, असे सांगितले जात होते, तसे झाले नाही. शिवाय, भोसरीतील सर्व सेलचे प्रमुख माझ्यासोबत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

वादग्रस्‍त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्‍याबाबत पुणे पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार चौकशी करत आहेत. त्‍यांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगून ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाच्या त्यांच्या शहरातील पोस्‍टरबाबत अजित पवार म्‍हणाले, ‘‘भावनेच्‍या भरात कार्यकर्त्यांकडून असे लिहिले जाते. मुख्यमंत्रिपदासाठी बहुमत आवश्‍यक असते.’’ विधानपरिषद, महामंडळ किंवा इतर पदांबाबत पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांना न्‍याय देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘पिंक ड्रेस’मुळे पोटात दुखतंय

गुलाबी रंगाचा वापर करत असल्‍याने विरोधकांकडून ट्रोल होत असलेले अजित पवार म्‍हणाले, ‘‘ज्‍याला जे पटते ते तो ड्रेस घालतो. अशा वेळी विरोधकांच्‍या पोटात का दुखतं?, कळत नाही. कोण कसल्‍या रंगाचे कपडे घालतो? यापेक्षा विकासाचा लाभ मिळतो का, हे बघणे गरजेचे आहे.’’

पवारांबाबत चुकीचे नॅरेटिव्ह

जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीत खासदार शरद पवार यांचा अवमान केल्‍याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘‘पवारसाहेब आमचे दैवत आहेत. त्‍यामुळे त्‍यांचा अपमान केल्‍याचे चुकीचे नॅरेटिव्‍ह पसरविले जात आहे. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीत विरोधकांना बोलू दिले नाही, असे खोटे सांगितले जात आहे. मी सगळ्यांना बोलायची संधी दिली. निधी वाटपाबाबत ‘मावळ’ला अधिक निधी दिला, असा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांचा होता. पण, मावळ, शिरूर, बारामती हे सर्व विभाग पुण्याचेच आहेत. मावळमध्ये लोणावळा व इतर काही कामे असल्‍याने तिथे निधी दिला.’’

ऑक्‍टोबरअखेर विधानसभा निवडणूक

ऑक्‍टोबरअखेरपर्यंत विधानसभा निवडणूक होईल. त्‍यापूर्वी राज्‍यातील पदाधिकाऱ्यांचे एक शिबिर घेऊ. नंतर महाराष्ट्रभर दौरे करणार असल्‍याचे अजित पवार यांनी सांगितले. संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा देत असल्‍याचे लोकसभा निवडणुकीत चुकीचे सांगण्यात आले. त्‍यामुळे अल्पसंख्याक समाज महायुतीपासून दुरावला, असे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘‘राज्‍यातील शेतकऱ्यांना वीज माफी दिली. महिला, तरुणांसाठी योजना आणल्‍या. मुलींच्‍या मोफत शिक्षणाची घोषणा केली. तरीही विरोधक टीका करतात, अजून कसा अर्थसंकल्प मांडायला हवा होता?’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.