तळेगाव दाभाडे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीला जाणाऱ्या कोकणातील दिंड्यांच्या संख्या अधिक असून, त्यांच्या रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भरधाव वेगाने वाहणाऱ्या या महामहामार्गावर वारकऱ्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असून, पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी सातत्याने होत आहे. हजारो वारकरी पालखीसोबत दिंड्या काढून कार्तिकीला दरवर्षी आळंदीला येतात.
खोपोलीहून जुन्या घाटरस्त्याहून लोणावळ्यात येतात. वाकसई, पाथरगाव, कामशेत, कान्हे, वडगाव, तळेगाव, इंदोरी, भंडारा डोंगर पायथा, देहूफाटा अशा अती वर्दळीचा, रहदारीचा धोकादायक अपघातप्रवण पट्ट्यात दिंडीकरी जीव मुठीत धरुन चालतात.
दिंडीमध्ये सर्वांत पुढे पताकाधारी चालतात, त्यामागे टाळकरी, विणेकरी आणि त्यामागे तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि भाविक असा क्रम असतो. पुढे पताकाधारी चालत असल्याने दिंडी वाटचाल करीत आहे, हे लक्षात येते.
मात्र, मागील बाजूने सहजासहजी लक्ष वेधणारे इशारा फलक नसतात, त्यामुळे दिंडी उशिरा लक्षात येते. महामार्गावर चुकीच्या बाजूने वाहन ओलांडणारी भरधाव वाहने दिंडीत घुसल्याचे आतापर्यंत झालेल्या अपघातातून लक्षात येते. दिंड्या पहाटे मार्गस्थ होतात.
वाहनचालकांची साखरझोपेची वेळ अपघातास कारणीभूत ठरते. दरवर्षी या दिंड्यांमधील वारकऱ्यांवर अपघाताची टांगती तलवार कायम आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत आळंदी कार्तिकी यात्रा नियोजनाच्या बैठकीत दिंड्यांच्या रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांचा विषय कधीही प्राधान्याने आणि प्रकर्षाने चर्चिला गेलेला दिसत नाही.
त्यामुळे पायी चालणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याने पुणे-मुंबई महामार्गावर कार्तिकी दिंड्यांची वाट बिकट तितकीच अपघाती ठरत आहे. शेकडो वर्षांची दिंडीची परंपरा अलीकडील काळात महामार्गावर वाढलेल्या रहदारीमुळे होणाऱ्या अपघातांनी चर्चेत आणि धोक्यात आली आहे.
तिकडे पंढरपूर पालखी मार्गावर करोडो रुपये खर्च करणारे सरकार इतर महत्त्वाच्या दिंडी मार्गांवर साधी रस्ते सुरक्षेची आणि तात्पुरत्या सुविधांची हमी लेखी देऊ शकत नाही, याबद्दल वारकरी खंत व्यक्त करताना
दिसतात. शनिवारी (ता. ९) होणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी मुंबई-पुणे महामार्गावरुन कोकणातील अनेक दिंड्या आणि हजारो वारकरी आळंदीकडे जात आहेत. रस्ता ओलांडून अंधारात प्रातर्विधीसाठी जागा शोधणाऱ्या वारकऱ्यांना देखील बऱ्याच वेळा अपघात होतात.
दिंडी रस्ते सुरक्षा अभियान राबवून पोलिसांकडून जनजागृतीची गरज
छेद रस्ते आणि मुख्य रहदारीच्या चौकात वारीकाळात २४ तास वाहतूक पोलिसांनी नियमन करावे
मागे-पुढे पोलिस बंदोबस्त ठेवून लोकवस्ती आणि रहदारीची ठिकाणे दिंडीला पार करून द्यावीत
दिंडीमार्गावर फिरत्या अथवा तात्पुरत्या प्रसाधनगृहांची व्यवस्था गरजेची
दिंडीमागच्या काही वारकऱ्यांनी रिफ्लेक्टर आणि चमकणारे जॅकेट घालून झेंडे हाती घेऊन चालावे
दिंडी काळात अवजड वाहनांच्या रहदारीचे योग्य ते नियमन व्हावे
तळेगाव वाहतूक विभागाने कार्तिकी वारीसाठी गस्ती पथक नियुक्त केली असून, वडगाव ते देहू फाटा दरम्यान दिंड्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक पोलिस मदत करणार आहेत, तसेच भंडारा डोंगर पायथा आणि देहूफाटा येथे पोलिस आणि वाहतूक सहायक बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत. दिंडीतील वारकऱ्यांनीही रस्त्यावरून चालताना काळजी घ्यावी.
- विशाल गजरमल, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
लोणावळ्यामधून कार्तिकी वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यांना मार्ग करून देण्याची काळजी संबंधित पोलिस अधिकारी घेतील. वरसोली टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच पुणे ग्रामीणमधील लोणावळा, कामशेत आणि वडगाव मावळ पोलिस ठाण्यांना दिंड्यांच्या रस्ते सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- सत्यसाई कार्तिक, सहायक पोलिस अधीक्षक, लोणावळा उपविभाग
आपल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिंडीच्या मागे-पुढे चोपदार ठेवून स्वयंसेवकांद्वारे आम्ही काळजी घेतो.
वळणाच्या, अंधाराच्या ठिकाणी अपघाताचा धोका संभवतो. धर्माचे रक्षण करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या रक्षणाची जबाबदारी अथवा दखल सरकार घेत नाही, याची खंत वाटते. दिंडीमार्गावरील स्थानिक पोलिसांनी त्यांच्या हद्दीत वारकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन वाहतूक नियमन केल्यास अपघात कमी होतील.
- ज्ञानदीप महाराज ठाकूर, श्री संत सेवा मंडळ पालखी प्रमुख, खारघर-पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.