लोणावळा - भुशी धरणामागील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या हडपसरमधील पाच जणांपैकी चौघींचा मृत्यू झाला, तर एक जण बेपत्ता आहे. सर्व जण एकाच परिवारातील असून, ही घटना रविवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
शाहिस्ता अन्सारी (वय ३७), अमिना सलमान ऊर्फ अदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), उमेरा सलमान ऊर्फ अदिल अन्सारी (वय ७) अशी मृतांची नावे आहेत, तर अदनान अन्सारी (वय ४) हा बेपत्ता आहे. अंधार पडल्याने बचाव कार्य थांबविण्यात आले. धरण भरल्याच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली.
लोणावळा परिसरात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यटकांचे पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो झाले. धरणाच्या पाठीमागे धबधबा आहे. या ठिकाणी पर्यटक जात नाहीत. रविवारी हडपसरमधील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी येथे आले होते. दुपारी पाण्यात भिजण्याचा आनंद घेत होते.
अतिउत्साहीपणा बेतला जिवावार
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, याची अन्सारी कुटुंबास कल्पना नव्हती. दरम्यान पाण्याचा अचानक लोंढा आल्याने पाचजण प्रवाहात वाहून गेले. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. कुटुंबातील वाहून जाणाऱ्या अन्य तिघांनी आपला जीव वाचविला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिस, शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ संस्थांच्या सदस्यांसह आयएनएस शिवाजी केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
दुपारी सव्वाचारच्या सुमारास शाहिस्ता अन्सारी, अमिमा अन्सारी व उमेरा अन्सारी यांचे मृतदेह शिवदुर्गच्या बचाव पथकांना आढळून आले. आयएनएस शिवाजी केंद्राच्या स्कुबा डायव्हिंग जवानांनी पाण्याच्या तळाशी मृतदेहांचा शोध घेतला. पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने दोघांचे मृतदेह आढळले नाहीत. अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले. सोमवारी (ता. १) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येईल, असे लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.
पर्यटकांनो अशी घ्या खबरदारी -
१. अनोळखी ठिकाणी जाताना माहिती घ्या किंवा माहितगार बरोबर न्या
२. प्रथमोपचाराचे साहित्य बरोबर ठेवा
३. पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करा
४. पाण्यात उतरणे टाळा
५. मद्यपान टाळा
६. मदत पथक, पोलिस, स्थानिकांचे संपर्कक्रमांक बरोबर ठेवा
७. धुक्यात वावरताना सावधानता बाळगा
८. शेवाळलेल्या जागा, पायऱ्यांवर जपून चाला
९. अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळा
१०. पर्यटनस्थळी हुल्लडबाजी, स्टंटबाजी, अतिउत्साह, साहस टाळा
डोळ्यांदेखत पाच जण गेले वाहून
पाण्याचा प्रवाह वाढल्याने अन्सारी परिवारातील पाच जण वाहून गेले. सदस्यांनी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र ते निष्फळ ठरले. दुर्दैवाने तीन मुलींसह एका महिलेचा यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हडपसरच्या सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
पर्यटनस्थळी अशी घ्या काळजी
१. सध्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू होण्याच्या घटनांचा आलेख वाढत आहे. अतिउत्साहामुळे तरुणाई अविचाराचा बळी ठरत आहे.
२. पावसाळ्यात पर्यटन करताना काळजी घेणे आवश्यक असते.
३. पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर काळजी घेतली नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. हे अपघात काही वेळा मानवी चुकांमुळे;
तर काही वेळा नैसर्गिक आपत्तींमुळे होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.