पुणे : तहसीलदाराकडून काम करून देतो, असे सांगत एका नागरिकाकडे सहा लाख रुपयांची लाच मागणाऱ्या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) खडक पोलिस ठाण्यात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीस शुक्रवारपर्यंत (ता.18) पोलिस कोठडी सुनावली आहे.
राजेंद्र बाळासाहेब मोरे (रा.फुरसुंगी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मोरेसह गुंजाळ नावाच्या व्यक्तीविरुद्ध (पूर्ण नाव माहित नाही) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांची फुरसुंगी गावात जमीन आहे. त्यांच्या जमीनीवरील इनामी शेरा रद्द करण्याचे प्रकरण तहसील हवेली कार्यालय येथे प्रलंबित आहे.
दरम्यान, जमीन खरेदी आणि विक्रीशी संबंधीत व्यवहाराची तसेच महसूल विभागाशी संबंधीत कागदपत्रे मिळवून देण्याचे काम मोरे आणि गुंजाळ करतात. संशयित आरोपींनी तक्रारदाराशी संपर्क वाढविला, त्यानंतर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रभावाचा वापर करुन लोकसेवक तहसीलदार हवेली यांच्याकडून काम करुन देतो, असे सांगून जमिनीवरील इनामी शेरा रद्द करण्यासाठी नोंद घेण्याबाबतचे पत्र तक्रारदाराला मिळवून दिले. त्यानंतर त्यांच्याकडे सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याप्रकरणी 'एसीबी'कडे तक्रार केली. त्यानंतर 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये 'एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पडताळणी केली, त्यानंतर बुधवारी याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील बिले करीत आहेत. आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
"जमिनीवरील इनामी शेरा रद्द करण्यासाठी आरोपींनी सहा लाखांची मागणी केली. त्यानुसार, एकास अटक केली आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाशी अन्य कोणाचा संबंध आहे का? याची पडताळणी करण्यात आली. मात्र अन्य कोणाचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे.''
- श्रीहरी पाटील, पोलिस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited By: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.