लष्कर भरतीच्या नावाखाली तरुणांना गंडा; महाराष्ट्रासह अन्य राज्यातही ‘नेटवर्क’

army admission fraud with youth network Maharashtra and other state
army admission fraud with youth network Maharashtra and other state
Updated on

पुणे : लष्कर भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थाचालकांकडून लष्करात भरतीचे आमिष दाखवीत अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला. अशा संस्थांचे महाराष्ट्रासह अन्य राज्यातही ‘नेटवर्क’ असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

लष्करामधील आजी-माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींसाठी लष्कराकडून घेतल्या जाणाऱ्या ‘रिलेशन आर्मी शिपाई भरती’साठी २८ फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फुटल्याप्रकरणी गुन्हे शाखेने काही जणांना अटक केली होती. या प्रकरणी वानवडी व विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, या प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोध घेत लष्करातील आजी-माजी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लष्करी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था चालविणाऱ्या ११ जणांना अटक केली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी होते फसवणूक
ग्रामीण भागातील तरुणांचा लष्कर भरतीकडे ओढा असतो. हे लक्षात घेऊन लष्करातून निवृत्त झालेले अनेक अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी लष्कर भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था सुरू करतात. बहुतांश संस्थाचालक उमेदवारांची चांगली तयारी करून घेतात. त्यांना भरतीसाठी प्रामाणिकपणे प्रोत्साहन देण्याचे काम ते करतात. तर काही प्रशिक्षण संस्थाचालक उमेदवारांकडून दोन ते तीन लाख रुपये घेऊन लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवितात. त्यासाठी त्यांची मुळ कागदपत्रे ताब्यात घेतली जातात. त्यानंतर लष्करातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांशी साटेलोटे करून रातोरात प्रश्‍नपत्रिका फोडली जाते. ही प्रश्‍नपत्रिका संबंधित उमेदवारांना देऊन त्यांना लेखी परीक्षेला पाठविले जाते. उमेदवार पात्र झाल्यानंतर त्याच्याकडून ठरलेली रक्कम घेऊन संस्थाचालक त्यांना मूळ कागदपत्रे देतात.

‘नेटवर्क’' महाराष्ट्रासह परराज्यातही
लष्कर भरती पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये काही लष्कर भरती प्रशिक्षण संस्था चालविणाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये बारामतीमधील माळेगावच्या किशोर गिरी, फरारी असलेला फलटणमधील कुमार परदेशी या दोघांसह अन्य काही संस्थाचालकांची नावे पोलिसांच्या तपासामध्ये पुढे आली आहेत. विशेषतः गिरीच्या संपर्कात पुण्यासह महाराष्ट्रातील काही संस्थाचालक होते. त्यांनाही तो लष्कर भरतीचा पेपर पुरविणार होता. संबंधित परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावरील असल्याने केवळ महाराष्ट्रातच नाही, तर अन्य राज्यांतील काही लष्कर भरती प्रशिक्षण संस्थाचालकांचे मोठे जाळे असण्याची शक्‍यता पुढे आली आहे.

'कोरोना प्रतिबंधासाठी सुक्ष्म नियोजन करा'; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे झेडपीला आदेश

''लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी स्थानिक पातळीवर लष्कर भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था चालवतात. यातील अनेक संस्था चांगले काम करतात. मात्र काही संस्थाचालक भरतीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करतात. त्यांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.''
-लक्ष्मण बोऱ्हाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

-अशी घ्या काळजी.
- लष्करात भरती करून देण्याच्या आमिषाला बळी पडू नका
- स्वतःची शैक्षणिक व अन्य मूळ कागदपत्रे कोणालाही देऊ नका
- स्वतःची शारीरिक क्षमता व बुद्धिमत्तेवर विश्‍वास ठेवा
- फसवणूक होत असल्याचा संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.