चुकांची ‘उत्सवी’ पुनरावृत्ती ठरेल घातक...

Mob
Mob
Updated on

कोणताही लोकोत्सव, सोहळा सार्वजनिक स्तरावर- रस्त्यावर साजरा करण्याला आता खूप मर्यादा आहेत. त्या ठिकाणी जमणारी गर्दी हे संभाव्य आजाराचे एक लक्षण ठरत आहे. म्हणून उत्सवी कार्यक्रमांसाठीचा आग्रह तूर्त सोडला पाहिजे... 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. ‘कोरोना’मुळे अनेक निर्बंध आले. रस्त्यांवर अनियंत्रित गर्दी वाढेल आणि त्यातून आजाराचा आणखी फैलाव होईल, म्हणून ही काळजी घेण्यात आली. तथापि, गर्दीवर काबू ठेवण्यासाठी किंवा ती होऊच नये, म्हणून घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली का? सर्वसामान्य लोकांनी शिस्तीचे पालन करून प्रशासनाला सहकार्य केले का?...या प्रश्‍नांचे उत्तर होकारार्थी नाही. 

निर्बंध असूनही गर्दी 
अनेक मोठ्या मंडळांनी भव्य मंडपांऐवजी त्यांच्या गणेश मंदिरांतच मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. ‘श्रीं’च्या स्वागतात खंड पडू नये, ही त्यामागची भावना होती. लोकांनी कुटुंबासह ‘गणपती पाहायला’ बाहेर पडावे, असा श्रीमंती डामडौल कोठेही नव्हता; तरीही ‘दर्शनाला गेलेच पाहिजे’ असे निमित्त करून अनेक जण रात्री शहरात फिरत राहिले. काही गणपती नवसाला पावतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अगदी नेहमीसारखी नसेल; पण गर्दी झालीच. त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या की नाही माहीत नाही; पण ‘मास्क’ला दिलेला फाटा, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा, काही ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था असूनही त्याचा वापर करण्याकडे दुर्लक्ष आदी कारणांमुळे आजाराच्या संसर्गाला वाव मिळाला. 

सार्वजनिक शिस्तीचा अभाव 
हा ऊहापोह करण्यामागील आताचे औचित्य म्हणजे, नवरात्राचा सण जवळ आला असून, घटस्थापना ता. १७ ऑक्‍टोबरला आहे. (अधिक मासामुळे यावेळी महिनाभराचा विलंब झाला.) या उत्सवाचे नियोजन संबंधित संस्था- मंडळांनी सुरू केले आहे. ‘त्याची नियमावली आताच जाहीर करा, म्हणजे त्यानुसार कार्यवाही करता येईल,’ अशी विनंती काहींनी विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आदींना केली आहे. गणेशोत्सवात आलेला अनुभव लक्षात घेता, प्रशासनाने नवरात्राविषयी अधिक काटेकोर आणि ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. कारण अल्पसंख्य जबाबदार नागरिकांचा अपवाद वगळता, आपल्याकडे एकंदर सार्वजनिक शिस्तीचा अभाव आहे. संकटाच्या काळातदेखील तीत बदल घडताना दिसत नाही, हे खेदजनक आहे. 

‘आम्ही सर्व नियम पाळतो, गर्दीवर नियंत्रण ठेवतो, उपस्थितांच्या आरोग्याची काळजी घेतो, आम्हाला कार्यक्रम घेण्याची परवानगी घ्या..’ अशी भूमिका नवरात्राबाबत काही संयोजकांकडून घेतली जाऊ शकते. यात ‘साधेपणा’ जपण्याचे आश्‍वासन असले, तरी प्रत्यक्षात त्याची कार्यवाही नीट होतेच असे नाही. कारण अतिउत्साही लोकांमुळे परिस्थिती आयोजकांच्याही आवाक्‍यात राहात नाही, हे नुकतेच स्पष्ट झाले आहे. त्याचे दुष्परिणाम दिसत असताना पहिल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ देता कामा नये. 

सामंजस्याची गरज 
धार्मिक विषय असला, की रुढी-परंपरा हे मुद्दे हमखास पुढे आणले जातात. तथापि, जीवन-मरणाचा प्रश्‍न निर्माण झालेला असताना, अशा बाबी बाजूला ठेवल्या पाहिजेत. पंढरपूरच्या वारीला काही शतकांची परंपरा आहे. लाखो वारकऱ्यांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा आविष्कार तीत दिसतो. यावेळी पायी वारी निघू शकली नाही. भाविकांनी त्याचे कारण समजून घेऊन सरकारला पूर्ण सहकार्य केले. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आगामी सर्व सार्वजनिक उत्सवांच्यासंदर्भात ही भूमिका स्वीकारली पाहिजे. 

एरवी नवरात्रोत्सव म्हटले, की त्यानिमित्त उभारला जाणारा मंडप, मिरवणूक, गरबा नृत्याचे आयोजन, कार्यक्रमासाठी रस्ता बंद करणे.. हे सगळे यथासांग घडते. मध्यंतरी याच दरम्यान ‘तोरणांच्या मिरवणुका’ हा प्रकार जोमात सुरू झाला होता. ‘पहिली माळ’,  ‘तिसरी माळ’, ‘सातवी माळ’ या प्रकारचे मुहूर्त काढून मंडळे वाद्यांच्या, ध्वनिवर्धकांच्या दणदणाटात जंगी मिरवणुका काढत असत. त्यातून अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला. त्याबद्दल कोणी आवाज उठविल्यास ‘ही तर आमची परंपरा’ असे समर्थन केले जात असे; पण पोलिसांनी खंबीर भूमिका घेतल्यामुळे हा कथित ‘वारसा’ खंडित झाला! 

नियम फक्त कागदावर 
हे ठाम धोरण सद्यःस्थितीतही आवश्‍यक आहे. ‘गर्दीला आमंत्रण म्हणजे संकटाला निमंत्रण’ हे पक्के लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे एखादा उत्सव बंदिस्त जागेत असो वा रस्त्यावर, त्याला परवानगी देताना त्याच्या परिणामांचादेखील विचार करायला हवा. कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींची कमाल संख्या कागदोपत्री निर्धारित केली, तरी त्याचे पालन सहसा होत नाही. पन्नास वऱ्हाडी मंडळींसाठी अर्ज करायचा आणि प्रत्यक्ष लग्नात शंभरच्या पटींतील पाहुण्यांसाठी जेवणाच्या पंगती (किंवा बुफे) उठवायच्या, असे प्रकार शहरी-ग्रामीण भागात सर्रास होत आहेत. नवरात्रांत असा नियमभंग कोठे दिसणार नाही, अशी आशा करूयात!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.