पुणे हे राहण्यासाठी देशातील एक सर्वोत्तम शहर आहे... आणि याच शहरात कोरोनाचा फैलाव सर्वाधिक आहे... दोन वेगवेगळ्या सर्वेक्षणांतील हा निष्कर्ष म्हणजे टोकाचा विरोधाभास आहे. सर्व क्षेत्रांतील उच्च शिक्षणाची सुविधा, रोजगाराच्या संधी, अत्याधुनिक रुग्णालये आदी विविध कारणांनी पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे राज्यभरातून, देशाच्या वेगवेगळ्या भागांतून, परदेशांतून लोकांची सतत ये-जा सुरू असते. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास ही परिस्थितीही कारणीभूत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउन शिथिल झालेला असताना पुणेकरांनी अतिशय जबाबदारीने वागणे आवश्यक आहे; पण सर्व निर्बंधांना तिलांजली देत येथील व्यवहार चालू झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बाधितांची संख्या एक लाखावर, तर जिल्हाभरातील आकडेवारी दोन लाखांवर पोचली आहे. तरीही त्याचे गांभीर्य सार्वजनिक व्यवहारांत कोठेही दिसत नाही. सरकारी वा खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्यांची संख्या एवढी वाढली आहे, की कोरोनाबाधितांना त्या ठिकाणी सहजासहजी बेड मिळत नाहीत. त्याबद्दल सरकार, प्रशासन, रुग्णालये सगळ्यांना दोष दिला जात आहे; पण रुग्णसंख्या वाढण्यास ही यंत्रणा कारणीभूत आहे का?... वस्तुतः स्वयंशिस्तीचा अभाव, हे या भीषण संकटाचे मुख्य कारण आहे.
मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष
पुण्यातील बाधितांचा आकडा वाढण्यामागे गणेशोत्सवात रस्त्यांवर झालेली गर्दी कारणीभूत आहे किंवा कसे, यावर आता चर्चा होत आहे. यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. कोणत्याही मंडळाने नेहमीप्रमाणे सजावट केली नव्हती वा देखावे उभारले नव्हते. तरीही उत्सवाच्या शेवटच्या काही दिवसांत रात्री मध्यवस्तीत बेगुमानपणे हिंडणारी अनेक टोळकी दिसत होती. बेलबाग चौक, महात्मा फुले मंडई, तुळशी बाग, लक्ष्मी रस्ता या भागांत अकारण एवढी गर्दी झाली होती, की सोशल डिस्टन्सिंग केवळ अशक्य होते. गर्दीतील निम्मे अधिक लोक मास्क न वापरणारे.
अनेकांनी हे मास्क नाका-तोंडाऐवजी गळ्यात अडकवले होते. मास्क हा गळ्यात मिरविण्याचा अलंकार नसून, ते कोरोना प्रतिबंधक साधन आहे, हे त्यांच्या गावीही नव्हते. अशा अनियंत्रित वातावरणात कोरोनाचा फैलाव होईल, की तो रोखला जाईल?
बेजबाबदार वर्तन
रस्त्यांवर फिरणाऱ्या बेफिकीर लोकांना गणेशभक्त म्हणणे अजिबात सयुक्तिक होणार नाही. ‘भक्त’ वेगळे आणि ‘प्रेक्षक’ वेगळे! बरीचशी मंडळी देवदर्शनाच्या उदात्त हेतूने हिंडत नसतात. त्यांच्यात भक्तिभाव अभावानेच आढळेल. गावच्या जत्रेत टवाळक्या करीत मुशाफिरी करणाऱ्यांत आणि यांच्यात तसा फार फरक नसतो. उगाचच मोठा आवाज करीत, एकमेकांना टाळ्या देत, गळ्यांत गळे घालून हिंडणाऱ्या या प्रेक्षकांनी घडविलेले बेजबाबदारीचे दर्शन काळजी वाढविणारे होते.
सगळीकडेच जोखीम
विविध सरकारी कार्यालये, बॅंका येथेही बेशिस्तीचा अनुभव येत आहे. अनेक बॅंका सरसकट सर्वांना आत प्रवेश देत नाहीत. एकेकाचे काम झाल्यावर पुढच्या ग्राहकाला संधी, असे काम चालते. त्यामुळे बॅंकेत एका वेळी ठरावीकच खातेदार असतात. मात्र, प्रवेशद्वारावर लोक ज्या पद्धतीने गर्दी करतात, त्यामुळे या सगळ्या दक्षतेवर पाणी पडते. जे शिस्तीत वागू इच्छितात, त्यांनाही सगळीकडेच जोखीम पत्करावी लागत आहे. त्यांनी स्वतःपुरती काळजी घेतली, तरी भोवतालच्या बजबजपुरीने त्यांनाही असुरक्षितेला तोंड द्यावे लागत आहे. हे म्हणजे रस्त्यावर वाहन चालविण्यासारखे आहे. तुम्ही सर्व नियम पाळले, तरी सुरक्षित राहतातच असे नाही. कारण दुसऱ्या वाहनचालकाने नियम झुगारले, तर अपघाताचा धोका संभवतोच!
अनुत्तरीत प्रश्न
एखाद्या रुग्णाची अवस्था कितीही गंभीर असो, पुण्यातील कोणत्याही रुग्णालयात त्याला प्रवेश मिळेलच याची शाश्वती नाही. ‘जागा नाही’ हेच उत्तर थेट मिळते. कोणा उच्चपदस्थाशी संपर्क झाल्यावर मोठ्या मुश्किलीने काही ‘भाग्यवंतां’साठी दरवाजा खुला होतो. यात प्रश्न असा उपस्थित होतो- जर रुग्णालयात जागा नसेल, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसेल तर लोकांच्या पाठपुराव्यानंतर हे सर्व कोठून निर्माण होते?.. की आधी दाखल झालेल्या रुग्णाची सुविधा काढून नव्यांची व्यवस्था केली जाते?.. या विषयात जेवढे खोल जावे, तेवढे अनुत्तरीत प्रश्न पुढे येत राहातात! सध्या सुरक्षित राहायचे असेल, तर कोरोनाच नव्हे, अन्य कोणत्याही गंभीर आजाराला आमंत्रण मिळेल, असे बेशिस्त वर्तन आपणाकडून घडणार नाही, याची काटेकोर दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी. यात थोडाही निष्काळजीपणा झाल्यास पुढचे सर्व ‘रामभरोसे’ असेल, याची जाणीव ठेवावी!
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.