स्वयंरोजगारातून साधली आर्थिक प्रगती

वैदू समाज म्हटले की, अशिक्षित , भटकंती करून डबे -चाळण , सुई- दाभण, वाळ्या-पोत विकून उदार निर्वाह करणारा समाज, असे चित्र आपल्यासमोर उभे राहते.
durga nimbalkar and savita rama shinde
durga nimbalkar and savita rama shindesakal
Updated on

वैदू समाज म्हटले की, अशिक्षित , भटकंती करून डबे -चाळण , सुई- दाभण, वाळ्या-पोत विकून उदार निर्वाह करणारा समाज, असे चित्र आपल्यासमोर उभे राहते. मात्र डोर्लेवाडी येथील वैदू समाजाने काळाबरोबर बदलत आणि पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वयंरोजगार निर्मितीतून तसेच अनेक छोटे-मोठे उद्योग व्यवसाय करून कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

डोर्लेवाडी येथे दीड हजाराहून अधिक लोकसंख्या असलेली वैदू समाजाची लोकवस्ती. या समाजाचा पारंपारिक व्यवसाय डबा -चाळण करणे, घराच्या पन्हाळांची दुरुस्ती करणे, सुया- पोत विकणे असाच होता. मात्र नवीन पिढीने पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत व्यवसायात बदल करून आर्थिक उन्नती साधली आहे.

सध्या या समाजातील शंभराहून अधिक जोडपी दररोज डोर्लेवाडीतून बारामती, इंदापूर, फलटण, दौंड तालुक्याच्या परिसरात गावांत जाऊन घरोघरी फिरून बेन्टेक्स दागिने, प्लास्टिक गृहपयोगी वस्तू , केसांवर स्टीलची भांडी, भंगार, डबे, चाळण, सुई, दाभण, पोत, आदी साहित्यांची विक्री व पन्हाळे दुरुस्ती, गॅस शेगडी,स्टोव्ह ,कुकर दुरुस्तीचा व्यवसाय करीत आहेत.

दीडशेहून अधिक कुटुंबे मुळशी,कात्रज, हडपसर, वारजे, घोटावडे फाटा, सासवड, जेजुरी, शिरूर, मलठण, तळेगाव, न्हावरा, उरळी कांचन, यवत, नसरापूर ,भोर ,शिरवळ, लोणंद, वाठार स्टेशन, वाई, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी मुक्कामी राहून परिसरातील गावांमध्ये फिरून हा व्यवसाय करीत आहेत.

या व्यवसायासाठी पती पत्नी दोघेही सकाळी लवकर एकत्र दुचाकीवर घराबाहेर पडतात. पती हा पत्नीला वाटेतील एका गावात सोडून पुढे काही किलोमीटर अंतरावर दुसऱ्या गावात जातो. दोघे मिळून दिवसभरात तीन ते चार हजार रुपयांचा व्यवसाय करून खर्च वजा जाता अंदाजे हजार ते बाराशे रुपये मिळवत आहेत. हा व्यवसाय करण्यात पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त आहे.

महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव असला तरी त्यांच्यात व्यावहारिक ज्ञान जास्त आहे. अनेक अशिक्षित महिलाही पुरुषांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतात. व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू पुण्यावरून ठोक दराने आणतात. तर या समाजातीलच काही नागरिकांची गावात व बारामती शहरात होलसेल विक्रीचीही दुकाने आहेत.

पूर्वी या समाजातील ज्येष्ठ लोकं जंगलातून व इतर भागातून औषधी वनस्पती आणून त्याचे आयुर्वेदिक औषधे तयार करून ते गरजू लोकांना अल्पदरात विक्री करीत होते.याच व्यवसायामुळे या समाजाला वैद्य असे नाव पडले, अशी या समाजातील जुनी लोक सांगतात.अजूनही काही लोकांनी हा व्यवसाय जपला आहे.

उच्च शिक्षित अन्‌ जबाबदारीत वाढ

मागील दोन पिढ्यांपूर्वी या समाजात शिक्षणाचा फार मोठा अभाव होता. गावोगावी भटकंती करून उदरनिर्वाह करावा लागत असल्याने मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते.अलीकडील काळात मात्र या समाजाला शिक्षणाचे महत्त्व कळाले आहे.

याच समाजातील सुनील श्यामराव निंबाळकर याने सी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्वतंत्र व्यवसाय सुरु केला आहे. सिंधु शंकर शिंदे ही शिक्षिका होणारी या समाजातील पहिली मुलगी आहे. गावातील अनेक तरुण मंडळी आता शिक्षणामुळे दूध संघ, साखर कारखाना अन्य कंपनीत नोकरी करत आहेत.

आमच्या समाजाला शेती व इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही.शिवाय शिक्षणाचा अभाव असल्यामुळे नोकरीतही कमीच संधी असते.त्यामुळे आम्ही जुन्या व्यवसायाला नवीन जोड देत दैनंदिन जीवनात गरजेचे आहे त्या गृहपयोगी साहित्यांची घरोघरी जाऊन विक्री करत आहोत.

- राहुल यल्लाप्पा शिंदे, विक्रेता

पूर्वी जुना व्यवसाय करत असताना अनेक अडचणी यायच्या. काही वर्षापूर्वी तहसीलदारांनी ओळखपत्र दिल्याने आमची अडचण दूर झाली. आता आम्ही व्यवसायातही बदल केल्याने नागरिक विश्वास ठेवून वस्तू घेतात.

- गौरी शंकर शिंदे, माजी सरपंच, डोर्लेवाडी

सामुदायिक विवाहाची परंपरा

डोर्लेवाडी येथे वैदू समाजाचे ८५० पेक्षा जास्त मतदान आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत या समाजाचा उमेदवार कायम असतो. सदस्य,उपसरपंचासहित गौरी शंकर शिंदे या महिलेला ग्रामस्थांनी सरपंचपदी काम करण्याचीही संधी दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून या समाजात बालविवाहाची प्रथा रूढ होती.

मात्र अलीकडच्या काळात या समाजात जागृती होऊन व्यापक बदल झाला आहे. सामुदायिक विवाहाची परंपरा मात्र या समाजाने अनेक वर्षांपासून जपली आहे.दरवर्षी गावात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.जात पंचायत देखील येथे कार्यरत होती.मात्र काळानुरूप कायद्यात बदल होत गेल्याने येथील जात पंचायत संपुष्टात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.