पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात सोमवारी (ता. १२) आगमन होत आहे. सहभागी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदी रस्त्यावरील येरवडा क्षेत्रीय कार्यालयातर्फे कळस येथे सकाळी ११.३० वाजता स्वागत होईल. तुकाराम महाराज पालखीचे बोपोडी येथे दुपारी एक वाजता स्वागत केले जाईल. या दोन्ही ठिकाणी आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते स्वागत होईल.
दोन्ही पालख्या सोमवारी आणि मंगळवारी पुण्यात मुक्कामी असतील. बुधवारी सकाळी पालख्यांचे प्रस्थान होईल. दोन दिवस लाखो वारकरी पुण्यात मुक्कामी असताना त्यांचा निवास, आरोग्याची काळजी घेतली जाईल. या काळात शहर स्वच्छ असावे यासाठी पथके तैनात केली आहेत.
शाळांमध्ये मुक्कामी असणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी स्वच्छतागृहाची सोय आहे. सॅनिटरी नॅपकिन व्हेडींग मशीनही लावण्यात आली आहेत. निवडुंगा विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर या दोन ठिकाणी स्वतंत्र महिला कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तेथे स्त्रीरोग तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट असतील. या भागात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी आरोग्य विभाग घेणार आहे.
पालखी सोहळ्यामुळे १२ ते १३ जून या तीन दिवसाच्या कालावधीत महापालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालय, नर्सिंग होम येथे नोंदणीशुल्क माफ करण्यात आले आहे. सर्वांना मोफत उपचार दिले जातील. भवानी पेठेतील सोनवणे रुग्णालयासह इतर दवाखाने २४ तास खुले असतील. शहरात पालखी मार्गावर २० ठिकाणी महापालिकेच्या मांडवात आरोग्यपथक असेल. त्यांच्याकडे औषधांसह ओआरएसची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर ९० जणांचे, तर तुकाराम महाराज पालखीमार्गावर ८६ जणांचे वैद्यकीय पथक असेल.
शहरात सोहळ्याचे आगमन झाल्यापासून हडपसर येथून बाहेरपडेपर्यंत वारकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी विविध ठिकाणी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. तेथेही टँकरद्वारे पाणी पुरविले जाईल. सोमवार ते बुधवार या काळात शहरातील पाणीपुरवठा विस्कळित होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे.
पथ विभागाने पालखी मार्गावरील खड्डे बुजविले असून, राडारोडा उचलण्यात आलेला आहे. अग्निशामन विभागाने पालख्यांचा मुक्काम असलेल्या पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंगा विठोबा मंदिर येथे आगप्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. दोन्ही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर सर्व शाळांमध्ये लगेच स्वच्छता केली जाईल. नाना पेठेतील पालखी विठोबा आणि निवडुंगा विठोबा मंदिराच्या परिसरात सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणेवर लक्ष ठेवले जाईल.
क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार तीन हजार 93 फिरती शौचालये उपलब्ध असतील. भवानी पेठ, कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दिंड्या मुक्कामी असतात. तेथे स्वच्छतागृह दिवसातून तीन वेळा यांत्रिकी पद्धतीने स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापनाचीही तयारी पूर्ण झाली आहे. दिवसातून तीन वेळा कचरा उचलण्यात येईल.
- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.