पुणे - मूळचे महाराष्ट्रीय असलेले, मात्र उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने कॅलिफोर्नियात स्थायिक झालेल्या ‘वारकऱ्यां’ना पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाची आस लागली. लाखो वारकरी करीत असलेल्या आषाढीवारीत पायी चालण्यासाठीची मानसिक व शारीरिक साधना पूर्ण करून कॅलिफोर्नियातील बारा वारकऱ्यांनी भक्तीची गोडी चाखण्यासाठी थेट पंढरीची वाट धरली आहे... आळंदी ते पुणे प्रवासात वाटचाल करून भक्तीच्या शक्तीची चुणूक त्यांना मिळाली.
विज्ञानातून भौतिक प्रगती साधल्यानंतर आध्यात्मिक ऊर्जेचा शोध घेण्यासाठी कॅलिफोर्निया ‘सेतू वारी’चे वारकऱ्यांनी विठ्ठलभेटीचा ध्यास घेतला आहे. कॅलिफोर्नियात उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर झालेले हे बारा वारकरी असून, त्यातील सहा महिला आहेत. त्यातील चौघांची स्वतःची कंपनी आहे, तर काही उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
मानसिक तयारी
विजय उत्तरवार आणि त्यांची पत्नी स्मिता, नितीन पाटील आणि त्यांची पत्नी वृषाली यांनी सहा वर्षांपूर्वी आळंदी ते पुणे वारीत चालले. त्यांचे बंधू उद्योजक मोहन उत्तरवार यांच्या मनात पाच वर्षांपासून वारीला जाण्याचा विचार सुरू होता.
मात्र, कोरोनामुळे दोन वर्षे शक्य झाले नाही. गेल्यावर्षी केवळ चर्चा झाली, मात्र यंदा जानेवारी महिन्यात वारीत सहभागी होण्याचा निर्णय झाला. त्याला लगेच समविचारी मित्र परिवारातील बारा जण एकत्र आले आणि ‘सेतू वारी’ नावाने गट तयार केला. आयुष्यातील सर्व गोष्टी विठ्ठलावर सोपवून लाखो भाविक इतके दिवस एकत्र कसे राहू शकतात आणि त्यांचा विठोबा ते कशात पाहतात, हे पाहण्यासाठी हे वारकरी वारीत सहभागी झाले आहेत.
शारीरिक तयारी
वारीमध्ये जाण्यासाठी चालायची सवय हवी, म्हणून त्यांनी दर शनिवार-रविवारी तेथील एका मंदिरापासून दुसऱ्या मंदिरापर्यंतचा मार्ग ठरवून पाच, अकरा, वीस आणि ३२ किलोमीटर चालून आपली क्षमता जोखली. त्यानंतरच वारीला जाण्याचा निर्णय झाला, तसेच ते सर्व आरती, प्रार्थना, हरिपाठ, अभंगही म्हणू लागले. अभंगवाणीचे कार्यक्रमही होऊ लागले. त्यातून अध्यात्माची गोडी अधिकच वाढू लागली. त्यानंतर ज्ञानेश्वरी वाचनही सुरू केले.
दरम्यान, वारीची संस्कृती पाश्चिमात्य देशात रुजावी तसेच जे आषाढी वारीला महाराष्ट्रात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी बे एरिया महाराष्ट्रीय मंडळाचे प्रमुख भास्कर रानडे आणि वीणा उत्तरवार यांनी दहा जून रोजी सिलिकॉन
व्हॅली परिसरात ‘विठोबा वारी’ सुरू केली. येथे सुमारे चारशे वारकरी अकरा किलोमीटर अंतर दर शनिवार-रविवारी चालत असून, हा उपक्रम आषाढीपर्यंत सुरू राहणार आहे, तसेच हे बारा जण प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
आध्यत्मिक प्रवास...
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात जायचा निर्णय झाल्यानंतर त्यांचे मुंबईत राहणारे नातेवाईक नितीन पाटील आणि प्रशांत खडके यांनी आळंदी ते पंढरपूर या वाटचालीची पाहणी करून खाण्याची व राहण्याची व्यवस्था केली. प्रस्थानाच्या दिवशी आळंदीतील मंदिरात दाखल झाल्यानंतर तेथील लाखो वारकऱ्यांना पाहून, त्यांची विठ्ठलाप्रती भक्ती पाहून सर्वांची वारीविषयीची उत्सुकता शिगेला पोचली. त्यांनी वारीत चालताना काय काय पाहायचे आहे, याचेही निरीक्षण केले आहे. वारीतील अबालवृद्ध पाहून त्यांना वारी पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. त्यांना आस आहे ती विठ्ठलाच्या भक्तीची.
वीस वर्षांपूर्वी एका यशस्वी उद्योजकाला विचारले होते, ‘तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट कसे करता?’ त्यावेळी त्यांनी सांगितले की, वर्षातील ४९ आठवडे आपले जीवन जगावे आणि तीन आठवडे विठ्ठलाची वारी केल्यास तुमचा तणाव कमी होतो. त्याचे कारण एका ध्येयाने विठ्ठलाकडे जाताना सर्व गोष्टींचा आपोआपच विसर पडतो. भाव एका विठ्ठलावर समर्पित होतो आणि ताण कमी होऊन जीवन स्फूर्तिदायक होते. त्यांच्या या अनुभवाने आम्हाला पंढरीच्या वारीची ओढ लागली.
- मोहन उत्तरवार, उद्योजक, कॅलिफोर्निया, अमेरिका
यांचा सहभाग
मोहन उत्तरवार, स्मिता उत्तरवार, राजीव पुराणिक, मनिषा पुराणिक, मनोज बेटावर, निलिमा उत्तरवार, विजय देशपांडे, मृदुला रथकंठिवार, आशुतोष कापूसकर, प्रशांत खडके, माया भोगवार, विजय उत्तरवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.