माहेराची ओढ लागावी तशीच वारकऱ्यांना पंढरीला जाण्याची ओढ लागली आहे.
पुणे - आपुल्या माहेरा जाईन मी आता ।
निरोप या संता हाती आला ।।१।।
सुख दुःख माझे आइकिलें कानी ।
कळवळा मनी करुणेचा ।। २।।
माहेराची ओढ लागावी तशीच वारकऱ्यांना पंढरीला जाण्याची ओढ लागली आहे. आपले सुख दुःख पांडुरंगाला सांगण्यासाठी अन् भोळ्या भाविकांच्या मनातील करुणा जाणून घेण्याचा कळवळा मायबाप विठ्ठलाला आहे. या संत तुकारामांच्या अभंगातील ओवींप्रमाणे भक्तांची स्थिती असताना आज (गुरुवारी) पुण्यात मुक्कामी असलेल्या लाखो वारकऱ्यांना पुणेकरांनी भरभरून सेवा करत दोन वर्षांची कसर भरून काढली.
कोरोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्ष लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याच्या तीव्र इच्छेला वारकऱ्यांना मुरड घालावी लागली होती. देहू आणि आळंदी तिर्थक्षेत्र वारकऱ्यांच्या अनुपस्थितीने सुनेसुने झाले होते. हीच स्थिती पुण्यात होती. यंदा मात्र भितीचे मळभ बाजूला सारून लाखो वारकरी वारीत सहभागी झाले अन् वारीतील दुसरा मुक्काम पुण्यात केला. पुण्यातील मंदिरे, शाळा, समाजमंदिरे, वाड्यांमध्ये वारकऱ्यांनी मुक्काम केला. गणेश मंडळे, सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष वारकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले.
पहाटेपासूनच वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी तयारीची लगबग सुरू झाली. सकाळी भरपेट नाष्ट्यापासून ते सायंकाळच्या जेवणापर्यंत जय्यत तयारी केली. दिवसभर पंगती बसत असताना पुणेकरांनी आनंदाने सेवा केली. या वेळी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’चा जयघोषही दुमदुमत होता. वारकऱ्यांची फाटलेली बॅग शिवून देणे, आजारी वारकऱ्यांना औषध-गोळ्या देऊन त्यांना लगेच बरे वाटावे यासाठीही डॉक्टरांचे पथक अनेक ठिकाणी व्यस्त होते.
पुण्यात पालखी मुक्कामी असल्याने पुणेकरही माऊली आणि तुकोबांच्या दर्शनाला पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती. शांततेमध्ये प्रत्येकास दर्शन घेता यावे, यासाठी पोलिसांनी व महापालिकेने चोख व्यवस्था केली होती. कपाळी टिळा. पारंपरिक वेश परिधान केलेल्या भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे निवडुंगा विठ्ठल मंदिर आणि पालखी विठोबा मंदिराकडे दर्शनासाठी जात होते. मंदिरांमध्ये घुमणारा टाळ-मृदंगांचा निनाद अन् अतिशय सुंदरपणे होणाऱ्या भजन, कीर्तन, प्रवचनात पुणेकर अन् वारकरी तल्लीन झाले होते. मंदिरांच्या व वारकरी निवासाच्या ठिकाणी आकर्षक रंगबिरंगी रांगोळ्या काढून मंगलमय वातावरणात आणखीन भर पडली होती.
संतांच्या कृपेने पांडुरंगाच्या ओढीने भक्तीमय वातावरणात चिंब झालेले वारकरी नाचत नाचत पंढरीच्या दिशेने जाताना पुण्यात काहीशा विश्रांतीसाठी स्थिरावले आहेत. यातील वारीत सहभागी होणे अन् वारकऱ्यांची सेवा करण्यात जे काही सुख आहे, ते एक भाविकच समजू शकतो. त्याचे दर्शन जणू या ज्ञानोबा, तुकारामांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या निमित्ताने दिसून आले.
लाखो वारकरी पुण्यात आलेले असताना या निमित्ताने पर्यटन करण्याची संधीही सोडली नाही, हे विशेष. शनिवारवाडा, लाल महाल, दगडूशेठ हलवाई गणपती, सारसबाग, पाताळेश्वर या ठिकाणांना भेटी देण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. यामध्ये पुरुषांसह महिला, लहान मुलांचीही संख्या लक्षणीय होती. याशिवाय काही वारकऱ्यांनी मेट्रो सफरीचा आनंद घेतला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.