Hadapsar : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा योगिनी एकादशीला (२ जुलै) हडपसर येथे विसावा घेऊन पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे.
एकाच दिवशी सकाळच्यावेळी हा दोन्हीही पालखी सोहळा येथे येत असल्याने संतांच्या दर्शनासाठी शहर व पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यांना चांगल्या सुविधा कशा पुरविता येतील, यासाठी वेगवेगळे प्रशासन व कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलविण्यात आली होती. आमदार चेतन तुपे पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे महाराज, संतोष मोरे महाराज, संजय मोरे महाराज, भानुदास मोरे महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ महाराज, सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, माजी महापौर वैशाली बनकर, अमर तुपे, भारती तुपे, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे, डॉ. स्नेहल काळे, पाणी पुरवठा विभागाचे सुभाष पावरा, आरोग्य निरीक्षक संजय धनवट, शाखा अभियंता पूनम गायकवाड आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पालखी सोहळ्यात होणारा माशांचा व डासांचा उपद्रव थांबविण्यासाठी साखर गोळ्या वाढवाव्यात, औषध फवारणी करावी, मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची कटिंग करावे, मुख्य मार्गासह पदपथावरील अतिक्रमणे काढावीत, परिसरात आदल्या दिवशी काही दिंड्या उतरत असल्याने पाणीपुरवठा वाढवावा, आरोग्य सुविधा केंद्रे व फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी.
रूग्णवाहिकांना तातडीने रस्ता मोकळा करावा, यावर्षी पावसाचे प्रमाण असल्याने वारकऱ्यांसाठी सर्दी, खोकला, ताप यासाठी औषधाच्या बाटल्या पुरवाव्यात, घसरून अपघात होत असल्याने केळी वाटपावर बंदी करावी, विविध संस्था, संघटना, मंडळांकडून उभारले जाणारे व्यासपीठ रस्त्यावर नसावे, तेथे लावण्यात येणाऱ्या ध्वनीवर्धकाचा आवाज मर्यादित असावा, कर्नकर्कश्य पिपाणी विक्रेत्यांना बंदी घालावी.
होर्डिंग्ज व फलकांची तपासणी करून धोकादायक होर्डिंग्ज व फलक काढून टाकावेत, सोलापूर व सासवड रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी करावी, पोलिसांनी टवाळखोरांवर तात्काळ कारवाई करावी, आदी सूचना सुनील बनकर, नंदा लोणकर, संजीवनी जाधव, दिपाली झेंडे, अविनाश काळे, योगेश गोंधळे, दिगंबर माने, अनील मोरे, राकेश वाघमारे, तुषार पायगुडे आदींनी प्रशासनासमोर मांडल्या.
पालिकेचे सहाय्यक आयुक्त ढवळे यांनी पालिकेच्या विविध विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती दिली. तसेच आढावा बैठकीतील सूचनांवरही कार्यवाही केली जाईल, असे यावेळी सांगितले.
पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे महाराज म्हणाले, "लोकप्रतिनिधी म्हणून आमदार तुपे पाटील गेली दोनतीन वर्षापासून घेत असलेल्या आढावा बैठकीमुळे सोहळ्यातील अनेक समस्या कमी होत आहेत. हरिद्वारी प्लास्टिक मुक्त वारी, ही संकल्पना सर्वांनी राबवावी. अन्नदानाबरोबरच वृक्षारोपनाचे काम वारकऱ्यांसाठी सेवा देणाऱ्या संस्था, संघटना व मंडळांनी करावे.' तर भानुदास महाराज मोरे म्हणाले, "पालखी रथ व दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये अंतर ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा. त्यामुळे पालखी दर्शन अधिक चांगले होईल.' डॉ. शंतनु जगदाळे यांनी या बैठकीचे संचालन केले तर माऊली कुडले यांनी आभार मानले.
"पालखी सोहळा प्रस्थानात महापालिका, पोलिस, अग्निशमन, आरोग्य व वाहतूक या प्रशासकीय विभागांची महत्वाची भूमिका आहे. पालखी सोहळा प्रमुखांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा. दोन्हीही पालखी विसावास्थळी टाकण्यात येणारे मंडप समान दर्जेदार असावेत. तेथे जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे या दृष्टीने पोलिस व पालिका प्रशासनाने पालखीचा वेग वाढविण्यासाठी रस्त्यावर पांढरे पट्टे मारून रस्त्याने दर्शन घेणारे नागरिक व पालखी रथातील अंतर राखण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी हडपसरमध्ये येणारा हा पालखी सोहळा चांगल्या पद्धतीने मार्गस्थ होण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे.'
पंढरपूरहून परतणारा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हडपसर येथे मुक्कामी राहत असे. मात्र, काही वर्षांपूर्वी सोहळ्याने हा परतीचा मुक्काम बंद केला आहे. पालखी सोहळा प्रमुखांनी तो पुन्हा सुरू करावा, अशी विनंती आमदार चेतन तुपे यांनी गेल्यावर्षी केली होती. याही वर्षीच्या आढावा बैठकीत त्यांनी ही मागणी पुन्हा केली केली आहे. मुक्कामात आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाण्याचा पुनरोच्चारही त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.