पारगाव - दगड फोडणारे कणखर हात आता करणार कायदा सुव्यवस्थेचे रक्षण. आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक गावातील गेली अनेक पिढ्या माती दगड काम करणाऱ्या वडार समाजातील उच्च शिक्षण घेतलेला मोहन शांताराम धोत्रे व अस्मिता वामन शिंदे हे दोघेही होमगार्डमध्ये भरती झाल्याने परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वडार समाजाचा पिढीजात व्यवसाय म्हणजे दगड फोडणे, ते घडवणे, खडी फोडणे, टिकावाने खोदकाम करणे या समाजात जन्मल्यापासून त्यांचे माती व दगडाशी नाते जुळलेले असते. या समाजातील अनेक कुटुंबात शिक्षणाचा अभाव दिसतो.
या प्रतिकूल परिस्थितीत मोहन शांताराम धोत्रे या तरुणाने आई-वडिलांना दगड, माती कामात मदत करत जिद्दीने शिक्षण घेतले. कला शाखेची पदवी संपादन केल्यानंतर त्याने पोलीस व होमगार्ड भरतीची तयारी सुरु केली. सप्टेंबर महिन्यात त्याची होमगार्डसाठी भरती झाली असुन सध्या मुंबई येथे तो प्रशिक्षण घेत आहे.
अस्मिता वामन शिंदे हिच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी आई हिराबाई शिंदे यांच्यावर आली. आईने कष्ट करून कुटुंबाचा गाडा चालवत मुलांना शिक्षण दिले. अस्मिताने सुट्टीच्या दिवसात आईला माती कामात मदत केली.
लग्नसराईच्या दिवसात मंगल कार्यालयात जेवण वाढण्याचे काम करून शिक्षण सुरु ठेवले. बारावीनंतर तिची सप्टेंबर महिन्यात होमगार्डमध्ये भरती झाली आहे. सध्या ती सांगलीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. मोहन धोत्रे व अस्मिता शिंदे या दोघांनीही सांगितले आम्ही यापुढे आमचा अभ्यास व प्रयत्न सुरु ठेवणार असून, पोलीस भरती किंवा इतर पदासाठी स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मच्छिंद्र जाधव (उद्योजक, अवसरी बुद्रुक) -
मोहन धोत्रे व अस्मिता शिंदे या दोघांच्याही कुटुंबाना मी जवळून पहिले आहे. सकाळपासून रात्रीपर्यत काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडार समाजातील या तरुणांनी जिद्दीने शिक्षण घेऊन मिळवलेले यश त्यांच्या समाजातील इतर तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.