पुणे/बारामती : आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या पुणे, पिंपरी, बारामती आणि औरंगाबाद येथील सहा कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारी छापे टाकण्यात आले. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बारामती ॲग्रो कंपनीची पुणे, बारामतीसह पिंपरी आणि औरंगाबादमध्ये कार्यालये आहेत. आमदार रोहित पवार या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. राज्य सहकारी बँकेकडून लिलाव प्रक्रियेत बारामती ॲग्रो कंपनीने कन्नड सहकारी साखर कारखाना ५० कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार एका भाजप नेत्याने ईडीकडे केली होती.
दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या पुण्यातील हडपसर, पिंपरी, बारामतीमधील पिंपळी आणि औरंगाबाद येथील कार्यालयांची झडती घेतली. सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर अधिकारी कार्यालयात दाखल झाले. या पथकाने बारामतीतील कंपनीच्या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे सुरू होते.
या संदर्भात बारामती ॲग्रो कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही. रोहित पवार सध्या परदेशात आहेत. रोहित पवार यांनी नुकतीच पुणे ते नागपूर युवा संघर्ष पदयात्रा काढली होती. त्यानंतर ईडीने बारामती ॲग्रो कंपनीवर केलेल्या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांच्या नुकत्याच संपलेल्या ‘युवा संघर्ष यात्रे’मुळे भाजपमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) दिली आहे.
‘‘हा स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा आहे. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल,’’ असे ट्विट रोहित पवार यांनी शुक्रवारी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.