सोमेश्वरनगर : गायरानात रहायला टाकलेलं कुडाचं पाल..., पदरात पाच मुली आणि एक मुलगा... गावागावात फिरून सौदा (मसाल्याचे पदार्थ) विकायचं आणि कसंबसं दोन वेळेला जेवायचं एवढाच संसार, अशा बिकट परिस्थितीतही दुसऱ्यानं टाकून दिलेलं पोर जिवापाड सांभाळणारे एक जोडपे निंबूत छप्री (ता. बारामती) येथे आहे.
सुमन बामणे आणि अरविंद बामणे हेच त्या मनाने श्रीमंत असलेल्या गरीब जोडप्याचे नाव! पंचवीस वर्षापूर्वी काटवनात फेकून दिलेलं दोन-तीन दिवसाचं बाळ कोल्ह्या-कुत्र्याच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी उचलून आणलं. पदरात सहा पोरं असताना आणखी सातवं पोर पोटचंच समजून त्याचा सांभाळ केला. हे समजल्यावर आज खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी त्या जोडप्याचा सत्कार केला. हे जोडपे मुलांसह पाटस (ता. दौंड) गावात परंपरागत सौदा विक्रीसाठी स्थलांतरित झाले.
गायरानात छोटी झोपडी बांधून राहत होते. बामणे एकदा सौदा विकायला रोटी घाटातून सायकलवर निघाले होते. घाटात काटवनात रडण्याचा आवाज आला. थांबून झुडपात डोकावून पाहिले तर दोन दिवसांच्या बाळाचा आकांत चालला होता. नाळही तशीच होती. शर्ट काढून बाळाभोवती लपेटला आणि झोपडीवर नेऊन बायकोच्या वट्यात दिले. चार दिवस दोघेही झोपू शकले नाहीत. दोन महिने चौकशी करूनही सुगावा लागला नाही. अखेर या जोडप्याने बाळाला घेऊन निंबूत छप्री गाठले आणि बाळाचे नवनाथ नामकरण होऊन तो कुटुंबाचा अविभाज्य भाग झाला.
एक मुलगी आजाराने गेली. मोठीचे लग्न झाले. उरलेल्यांपैकी दोन मुली आणि मुलगा यांना पाडेगावच्या आश्रमशाळेत टाकले. तर एक मुलगी नवनाथ बाळाला सांभाळायला घरी ठेवली. सौदा विक्री, खूरपण, बिगारीकाम करून जोडपे कुटुंब चालवायचे कधी भिक्षा मागण्याचीही वेळ आली पण नवनाथचे कधीही ओझे वाटले नाही. आता मुलींची लग्न झालीत. मोठा भाऊ किसन व नवनाथ गवंडी-बिगारीकाम व शेतीची कामे करतात. किसनचेही लग्न झाले. नवनाथचे नातेगोते कुणी काढत बसू नये म्हणून सुमनबाईंनी भावाचीच मुलगी सून म्हणून घरात आणली. आजही कुटुंब नीरा डावा कालव्याकडेला पाटबंधारेच्या जागेत सपरात राहत आहेत.
सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. अजित पवार यांनी सुमन बामणे यांचे कौतुक करत सत्कार केला. तसेच त्यांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचाही आदेश दिला आहे.
पहिल्यांदा पोरगं पोटाशी धरलं तवाच त्याची आय झाले. सव्वा महिन्याचा ईटाळ पाळला. कोरडंच पाजायची. पेज, दूध पाजून जगवलं. तीन वर्षापर्यंत कधीपण दवाखान्यात पळवावं लागायचं. त्याच्यावरचा जीव कमी होईल अन् स्वतःच्या पोरांवर राहील म्हणून तीन पोरं आश्रमशाळेत ठेवली. ह्याला जवळ ठेवला. पाचवीपर्यंत त्याच्यासंगं साळंत जायची. बाहेर बसून राहायची.
- सुमन बामणे
हे आईबाप नाहीत असं मनातसुद्धा येत नाही. काटवानात घावलाय अशी माणसं चिडवायची. आई त्यांच्याशी खूप भांडायची. आमच्या भावा-बहिणीत कधीच वाद झाले नाहीत. एका जीवानं सगळे राहतो. आईबापानं हे दिस दाखवल्यात. मरेस्तोवर त्यांना चांगलं सांभाळणार.
- नवनाथ बामणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.