उंडवडी : बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार , वेळ सायंकाळी सहाची एक चारचाकी काळ्या रंगाची कार ( हुंडाई कंपनीची वेरणा )अत्यंत वेगात अचानक गावात घुसली. गावात भैरवनाथाची पालखी सोहळा दसऱ्यानिमित्ताने निघालेला. अशावेळी वेगवान कार गावातील बोळी - बोळीतील रस्त्याने पळत होती. चारचाकी गाडीची गती बघून अनेकांनी रस्ता मोकळा करुन दिला. जवळपास दहा मिनिटे गावातच चारचाकीने गाडीने धुराळा उडवल्याने सगळेच भयभीत झाले होते. यावेळी गाडी अंगावर येईल, या भितीने चार जण रस्ता सोडून बाजूला पळताना पडून जखमी झाले.
आज सायंकाळी सहाच्या दरम्यान बारामती एम. आय. डि. सी कडून गोजुबावी मार्गे - पाटस - बारामती रस्त्याकडे एक काळ्या रंगाची चारचाकी कार अफाट वेगात निघाली होती. ही बाब गोजुबावीकरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उंडवडी कडेपठारच्या ग्रामस्थांना कळविले. त्यानुसार उंडवडी कप येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर थांबून रस्ता बंद केला. त्यामुळे भरधाव कार गावातच घुसली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सुदैवाने पालखी सोहळा गावातील बाजूच्या रस्त्याने गेला आणि भरधाव शेजारील रस्त्याने गेली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र ही भरधाव कार पाहिल्यानंतर अनेकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला.
कार गावातील रस्त्यावर मोठा धुराळा उधळत होती. गावात कार फिरुन गेल्यानंतर गावकरी भयभीत झाले होते. भरधाव कार शिर्सुफळ रस्त्याने वेगात निघून गेली.
मात्र भरधाव कार कुणाची होती. चालक भरधाव वेगाने का चालवत होता. हे रात्री उशिरापर्यंत कुणालाच समजले नाही. गाडीवर पाठीमागील काचेवर "आमदार " असे लिहले होते. कारमध्ये फक्त चालक एकटाच होता. असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र या चारचाकी कार बाबत वेगवेगळे तर्क वितर्क लोकांकडून काढले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.