बारामती - फिटनेस हा हल्लीच्या युगात परवलीचा शब्द बनला आहे. या फिटनेससाठी अनेकांचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरु असतात. बारामतीतील एक कुटुंबही फिटनेसच्या या ध्यासातून एक वेगळा विक्रम करण्याच्या तयारीत आहे.
बारामतीचे पहिले आर्यनमॅन सतीश ननवरे यांनी बारामतीत युवक युवतींमध्ये फिटनेस असावा या उद्देशाने आयर्नमॅन स्पर्धेचे प्रशिक्षण सुरु केले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा अभिषेक हाही अत्यंत कमी वयात ट्रायथॉलन करुन आयर्नमॅन झाला, आता त्यांची मुलगी वैष्णवी ही येत्या 2 जुलै रोजी कझाकिस्तानमध्ये होणा-या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होत आहे.
वडील आणि मुलापाठोपाठ आता मुलगीही आय़र्नवुमन बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने हे कुटुंब या निमित्ताने एक वेगळा विक्रम प्रस्थापित करणार आहे. सतीश ननवरे यांनी आपल्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना फिटनेसचा मंत्र दिला असून त्यांच्या पत्नी सपना ननवरे याही सायकल चालवितात.
तीनदा आयर्नमॅन झाल्यानंतर सतीश ननवरे यांनी बारामतीतील अनेक युवक युवतींना या बाबत प्रशिक्षण सुरु केले आहे. येत्या 2 जुलै रोजी कझाकिस्तानमधील नूर सुलतानमध्ये होणा-या स्पर्धेत बारामतीतून बारामती स्पोर्ट्स फौंडेशनचे सदस्य राहुल पाटील (इंडियन रेल्वे सर्विसेस्), तुषार चव्हाण (इंडियन फॉरेस्ट सर्विसेस्), राहुल मोकाशी (इंजिनिअर), मच्छिंद्र आटोळे (ग्रामसेवक), सादिया सय्यद (अल्ट्रा रनर , इंजिनिअर), अजिंक्य साळी (क्रीडा शिक्षक) आणि वैष्णवी ननवरे (आर्किटेक्ट) हे सहभागी होत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून हे सर्व सदस्य खडतर मेहनत घेत आहेत.
अशी असते आयर्नमॅन स्पर्धा...
शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी, जगातील सर्वात खडतर स्पर्धांपैकी आयर्नमॅन ही स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेत स्पर्धकांना 4 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे हे क्रीडा प्रकार सलग करायचे असतात. 16 तासांच्या आत ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकास आयर्न मॅन कितीब देऊन गौरविण्यात येते.
यश मिळवूनच परत येऊ...
कझाकिस्तान येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आम्ही एक आठवडा आधीच तिथे जात असून, पुढील आठवडा तेथे सराव करणार आहोत. सदस्यांनी केलेली मेहनत आणि आहाराचे योग्य नियोजन आणि तमाम बारामतीकरांच्या सदिच्छा यांच्या बळावर हे सदस्य यश प्राप्त करतील असा आम्हाला विश्वास वाटतो.- सतीश ननवरे, प्रशिक्षक. बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.