Baramati Loksabha Election : देशातील सर्वात हाय व्होल्टेज लढत बारामतीत होणार....

बारामती लोकसभा मतदारसंघात देशातील सर्वात हाय व्होल्टेज लढत अपेक्षित असून या मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहणार आहे.
Supriya Sule and Sunetra Pawar
Supriya Sule and Sunetra Pawarsakal
Updated on

बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीत शनिवारपासून (ता. 16) आचारसंहिता लागू होत आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात देशातील सर्वात हाय व्होल्टेज लढत अपेक्षित असून या मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहणार आहे. या लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर व खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असला तरी दोन्ही बाजूंकडून बारामती व इंदापूरवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाण्याची अपेक्षा आहे.

विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची घोषणा झाली असून सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

दोघीही नणंद भावजयांनी गेल्या पंधरा दिवसांपासूनच लोकसभा मतदारसंघात विविध माध्यमातून प्रचार सुरु केला असून लोकांपर्यंत चिन्ह व काम पोहोचविण्यासाठी दोन्ही बाजूंकडील कार्यकर्ते आतापासूनच मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दोन्ही बाजूंचे फ्लेक्स अनेक ठिकाणी लागलेले असून सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आपापले मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यावेळी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा 1 लाख 55 हजार मतांनी विजय झाला. त्यातील 1 लाख 27 हजाराचे लीड एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे होते. इंदापूर मतदारसंघातून 70938 मतांचे मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळालेले होते. इंदापूरमध्ये 71 हजार, पुरंदरमध्ये 9 हजार व भोरमध्ये 18 हजारांचे तर बारामतीतून सर्वाधिक म्हणजे जवळपास 1 लाख 28 हजारांचे मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळाले होते.

गत निवडणूकीचा विचार करता बारामतीतून मिळणारे मताधिक्य टिकविण्याचा सुप्रिया सुळेंचा प्रयत्न असेल तर हेच मताधिक्य सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात पडावे या साठी अजित पवारांनी व्यूहरचना सुरु केलेली आहे. त्या मुळे या निवडणूकीत बारामती व इंदापूर तालुक्यातील मतदारांच्या भूमिकेवरच निकालाचे बरेचसे भवितव्य अवलंबून असेल असे म्हटल्यास ते वावगे ठरु नये.

एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास प्रारंभ केला असताना अजित पवारांनीही एकाच दिवसात सात सभा घेत बारामतीतील वातावरण ढवळून काढले. आचारसंहिता लागून प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचार आणखी गतीमान होणार आहे.

सुप्रिया सुळे यांच्या साठी महाविकास आघाडीतील तर सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीतील सर्वच स्टार प्रचारक बारामतीत प्रचाराच्या निमित्ताने हजेरी लावणार हेही निश्चित झालेले आहे. या निवडणूकीमध्ये कोणत्या मुद्यांवर प्रचार होणार हे येत्या दोन चार दिवसात स्पष्ट होईल. सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही जागा राखणे तर अजित पवार यांच्यासाठी ही जागा खेचून आणणे महत्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.